Sunday, July 22, 2018

अभंगाची दिंडी - दिवस १८

संत ज्ञानेश्वर माऊली
खालील दोन ओळी ज्या प्रार्थनेतून (अभंग)  येतात मला वाटतं याशिवाय चांगली विश्वप्रार्थना होऊ शकत नाही. ही प्रार्थना ज्या दिवशी विश्वप्रार्थना होईल त्या दिवशी मराठी झेंडे खर्‍याअर्थाने अटकेपार फडकले असे म्हणता येईल.

चंद्रमे जे अलांछन। मार्तंड जे तापहीन ।
ते सर्वांही सदा सज्जन । सोयरे होतु ।।

वाक्यार्थ: कोणताही डाग नसलेले चंद्र व ताप नसलेले सूर्यासारखे असणारे सज्जनांचे सर्वांचे मित्र आहेत.
भावार्थ: माऊलीनी चंद्र व सूर्याच रूपक म्हणून उपयोगिल आहे. चंद्र म्हणजे कलाकार जो लांछन विरहित आहे. सूर्य म्हणजे नेता (राजकारणी, समाजकारणी, कार्यालयातील अधिकारी) हे तापहिन आहेत. म्हणजेच यांच्या जवळ जाताना अंग भाजत नाही. हे सज्जनाचे मित्र असतील तर ते राज्य आदर्श राज्य असेल.

राम कृष्ण हरी

Saturday, July 21, 2018

अभंगाची दिंडी - दिवस १७

संत बहेणाबाई
बहेणाबाई कुलकर्णी यांचे अभंगात आपल्याच मनाची परिस्थितीचे वर्णन केले आहे की काय असे वाटते. त्यांचे माया व ब्रह्म या विषयीचे अभंग अप्रतिम आहेत.
ज्यांना देवाविषयी विचारायला जातो त्याला अभिमान झाला आहे. ज्यांना माहीत आहे ते सांगत नाहीत. कोणी सांगत ध्यान करा तर कोणी उपासना तर कोणी मंत्र तर कोणी तिर्थाटन.

जेथे पुसो जावे तेथे अभिमान । आपुलेचि ज्ञान प्रतिष्ठी तो ॥१॥
जाणोनि अंतरी न सांगती कोणी । कोणाचे वचनी स्थिर राहो ॥२॥
लय हे लक्षण सांगती धारणा । नाना उपासना नाना मंत्र ॥३॥
एक ते संगती पंचमुद्रा जप । एंव खटाटोप आसनाचा ॥४॥
एक ते सांगती तीर्थे तपे व्रत । एक ते अनंत पूजाविधि ॥५॥
बहेणि म्हणे आता नव्हे स्थिर मन । जेथे तेथे गुण अविद्येचा ॥६॥

याच बहेणाबाई यातून सुटण्याचा मार्ग पण सांगतात.

माया हे सावेव किंवा निरावेव । न कळे याचे ठाव कोणेपरी ॥५॥
बहेणि म्हणे याचे कर्म कळावया । वोळंगावे पाया सद्गुरूच्या ॥६॥

सावेव— साकार
निरावेव -निराकार
ओळगणे: आश्रय घेणे

Friday, July 20, 2018

अभंगाची दिंडी - दिवस १६

संत कान्होपात्रा

कानोपात्रांचे फारच कमी अभंग प्रकाशित आहेत. पण जे आहेत ते सर्व आर्ततेने विठ्ठलाला मारलेली हाक आहे.
स्वःताला गरिबांचा कैवारी म्हणवून घेत असशील तर मग माझ्यावर होणारे अत्याचार हे तुझ्यावरच होत नाही का? सिंहाच्या तोंडांतील घास कोल्हा पळवून नेत असेल तर लाज सिंहाला वाटली पाहिजे?  माझा देहच मी तुला अर्पण करत आहे. स्वःताच्या नावासाठी तरी त्याचा संभाळ कर.

पतित पावन म्हणविसी आधी । तरी का उपाधी भक्तांमागे ।।१।।
तुझे म्हणविता दुजे अंगसंग । उणेपणा सांग कोणाकडे ।।२।।
सिंहाचें भातुकें जंबुकें पै नेतां । थोराचिया माथा लाज वाटे ।।३।।
म्हणे कान्होपात्रा देह समर्पणें। करावा जतन ब्रीदासाठी ।।४।।

अंगसंग: अत्याचार
भातुकें: घास, अन्न
जंबुकें: कोल्हा 

Thursday, July 19, 2018

अभंगाची दिंडी - दिवस १५


संत सावतामाळी महाराज
अतिशय साधी, सरळ व गेयता असलेल्या रचना करण्यासाठी सावता महाराज प्रसिद्ध आहेत. सर्वजण "आपला" दिवस शोधण्यात आयुष्य खर्ची घालतात तर संतासाठी "त्यांचा" दिवस कोणता हे महाराज खालील अभंगातून सांगतात.

समयासी सादर व्हावें । देव ठेविले तैसें रहावें ॥धृ०॥
कोणे दिवशीं बसून हत्तीवर । कोणे दिवशीं पालखी सुभेदार ।
कोणे दिवशीं पायांचा चाकर । चालून जावें ॥ १ ॥
कोणे दिवशीं बसून याचीं मन । कोणें दिवशीं घरांत नाहीं धान्य ।
कोणे दिवशीं द्रव्याचें सांठवण । कोठें साठवावें ॥ २ ॥
कोणे दिवशीं यम येती चालून । कोणे दिवशी प्राण जाती घेऊन ।
कोणे दिवशीं स्मशानीं जाऊन । एकटें रहावें ॥ ३ ॥
कोणे दिवशीं होईल सद्‌गुरूची कृपा । कोणे दिवशीं चुकती जन्माच्या खेपा ।
कोणें दिवशीं सावत्याच्या बापा । दर्शन द्यावें ॥ ४ ॥

Wednesday, July 18, 2018

अभंगाची दिंडी - दिवस १४

संत एकनाथ महाराज
महाराज सद्‍गुरुंची लक्षण सांगत आहेत. गुरू व सद्‍गुरु यामध्ये फरक आहे. ज्याला अभिमान झाला किंवा जो ज्ञान पैशासाठी विकतो किंवा लंपट आहे अशा व्यक्तीला सद्‍गुरु म्हणता येणार नाही. मग "सद्‍गुरु कोण?" हे महाराज खालील अभंगात सांगतात.

शिष्ये करावे माझे भजन । ऐसे वांछी जरी गुरुचे मन ।
तो गुरुत्वा मुकला जाण । अभिमाने पूर्ण नागवला ॥
जगी दाटुगा ज्ञानाभिमान । धनालागी विकती ज्ञान ।
ते जाण शिश्नोदरपरायण । तेथे अर्धक्षण ज्ञान न थारे ॥
मुख्यत्वे गुरुचे लक्षण । ज्ञान असोनि निरभिमान ।
सर्वांगी शांतीचे भूषण । तो सद्‍गुरु पूर्ण परब्रह्म ॥

दाटुगा— श्रेष्ठ; मोठा.
शिश्नोदरपरायण- लंपट 

Tuesday, July 17, 2018

अभंगाची दिंडी - दिवस १३

संत तुकाराम महाराज
महाराज पांडुरंगावर श्रद्धा कशी असावी यासाठी अतिशय समर्पक दुष्टांत देत आहेत. हंड्यावर हंडे ठेवलेली स्त्री भले आपल्या मैत्रिणीशी बोलत असेल पण तिचं लक्ष हंड्यावरच असत. गरीब जेवणाच्या निमंत्रणासाठी आसुसलेला असतो. सावकार दिवसरात्र येण्यार्‍या व्याजाचा विचार आणि हिशोब करत असतो. तसंच मी या संसारात असलो तरी तुझ्या निमंत्रणाची वाट दिवसरात्र पाहत आहे. ते निमंत्रण म्हणजे, 'तुझ्याच चरणी ध्यान लागण्याचं आहे.'

दुडीवरी दुडी । चाले मोकळी गुजरी ॥१॥
ध्यान लागो ऐसें हरी । तुझे चरणीं तैशापरी ॥ध्रु.॥
आवंतण्याची आस । जैसी लागे दुर्बळासी ॥२॥
लोभ्या कळांतराची आस । बोटें मोजी दिवस मास ॥३॥
तुका म्हणे पंढरीनाथा । मजला आणिक नको व्यथा ॥४॥

आवंतण: आमंत्रण; बोलावणें
कळांतर: व्याज

Monday, July 16, 2018

अभंगाची दिंडी - दिवस १२


संत ज्ञानेश्वर माऊली

जैशी स्वप्ना स्वप्नीं महिमा । तमीं मानू असे तमा । तेंवि अज्ञाना गरिमा । अज्ञानींचि ॥३॥
कोल्हेरीचे  असिवारु । न येती धारकीं धरुं । नये लेणां शृंगारु । वोडंबरीचा ॥४॥
हे जाणणेयाच्या घरीं । खोंचिलेंही आन न करी । काई चांदिणां उठे लहरी । मृगजळाची ॥५॥
आणि ज्ञानहि जें म्हणिजे । तें अज्ञानचि पां दुजें । एक लपऊनी दाविजे । एक नव्हे ॥६॥
अमृतानुभव
आत्मज्ञानाचे महत्त्व सांगताना माऊली म्हणतात.
स्वप्नाचे महत्त्व स्वप्नातच, आणि अंधाराचे महत्त्व अंधारातच त्याचप्रमाणे अज्ञानाची थोरवी अज्ञानातच. मातीचे घोडे रणांगणावर नेता येत नाही. मंत्राने केलेले (खोटे)  दागिने घालून मिरवता येत नाही. त्याचप्रमाणे अज्ञानाला ज्ञान म्हणून मिरवता येत नाही. चांदण्यांमुळे (चंद्रामुळे) मृगजळाला लाटा निर्माण होतात का? ही सर्व उदाहरणे देण्यासाठी उच्चकोटीची बुद्धिमत्ता लागते (आधी मृगजळ त्यात लाटा) पण माऊली त्याहूनही एक वाक्य सांगून स्वःताची अलौकिक बुद्धिमत्ता दाखवून देतात.
ज्याला आपण ज्ञान म्हणतो ते पण एक अज्ञानच आहे. ज्ञान आणि अज्ञान या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत.

कोल्हेरी: कृत्रिम मातीची चित्रे
असिवार: घोडेस्वार
धारकी धरणें- मोठ्या संकटांत, पेचांत आणणे
वोडंबरी: गारुडविद्या; जादूगिरी

Sunday, July 15, 2018

अभंगाची दिंडी - दिवस ११


संत रामदासस्वामी
स्वामींनी दासबोधातील एक समास नामस्मरणाचे महत्त्व सांगण्यासाठी खर्ची घातला आहे.
महादेवालासुद्धा नामस्मरणांमुळेच विषाच्या त्रासापासून मुक्ती मिळाली यावरुन नामस्मरणाचे महत्त्व विषद होते. नामामुळेच अनेक पर्वतासारखे दोष नाश पावतात.

नाम स्मरे निरंतर । तें जाणावें पुण्यशरीर । महादोषांचे गिरिवर । रामनामें नासती ॥। २२॥
अगाध महिमा न वचे वदला । नामें बहुत जन उद्धरला । हळहळापासून सुटला । प्रत्यक्ष चंद्रमौली ।। २३ ||

अभंगाची दिंडी - दिवस १०


संत एकनाथ महाराज
ज्ञानेश्वरांना माऊली म्हणलं तर नाथांना मामा म्हणलं पाहिजे. आई इतकाच प्रेमळ पण चेष्टेची झालर असणारा जीवनांतील व्यक्ती म्हणजे मामा.(माझ्या वडिलांची उपमा)
नाथांनी नुसते बोधपर अभंगच लिहले नाहीत तर चेष्टा मस्करी करणारी भारुडं, गौळणी पण लिहल्या. त्यामध्ये असणारं तत्वज्ञान तितकंच शुद्ध आणि खोल आहे. मन व वासनेवरील खालील रचना त्यापैकीच एक

येथुनि पुढे बरें होईल । भक्‍तिसुखे दोंद वाढेल ।
फेरा चौर्‍यांशीचा चुकेल । धन मोकाशी ॥ १ ॥
मी आलो रायाचा जोशी । होरा ऎका दादांनो ॥ध्रु॥
मनाजी पाटील देहगावचा । विश्वास धरु नका त्याचा ।
हा घात करील नेमाचा । पाडील फशी ॥२॥
वासना बायको शेजारिण । झगडा घाली मोठी दारुण ।
तिच्या पायी नागवण । घर बुडविसी ॥३।
एका जनार्दन कंगाल जोशी । होरा सांगतो लोकांसी ।
जा शरण सद्‌गुरुंसी । फेर चुकवा चौर्‍याऎंशी ॥४॥

दोंद: वाढलेलें पोट.
होरा: भविष्य

Friday, July 13, 2018

अभंगाची दिंडी - दिवस ९

संत तुकाराम महाराज

महाराज लीन असण्याचे फायदे सांगत आहेत. धातू भट्टीमध्ये लीन होतो व अशुद्धतेचा नाश होतो. नदीला पुर आल्यावर मोठमोठी झाडे उन्मळून पडतात पण लवाळ मात्र टिकून राहते. हत्ती (शत्रूची) माणसं तुडवतो पण तो मुंगीला तुडवू शकत नाही. हातोडीचे घाव हिरा सोसतो. गारा थोड्याच असे घाव सोसू शकणार आहेत?
तुकोबांची उदाहरणे परस्पर विरोधी वाटत असली तरी लीन, दीन व सहनशील व्यक्तीच भवसागर पार करून जाऊ शकतील, ज्यांच्या डोक्यावर अहंमपणाचा भार आहे ते मात्र नक्कीच बुडतील.

अग्नीमाजी पडे धातु । लीन होउनि राहे अतु । होय शुद्ध न पवे घातु । पटतंतुप्रमाण ॥१॥
बाह्यरंगाचें कारण । मिथ्या अवघें चि भाषण । गर्व ताठा हें अज्ञान । मरण सवें वाहातसे ॥ध्रु.॥
पुरें मातलिया नदी । लव्हा नांदे जीवनसंधी । वृक्ष उन्मळोनि भेदी । परि तो कधीं भंगेना ॥२॥
हस्ती परदळ तें भंगी । तया पायीं न मरे मुंगी । कोण जाय संगी । पाणोवाणी तयेच्या ॥३॥
पिटितां घणें वरि सैरा । तया पोटीं राहे हिरा । तैशा काय तगती गारा । तया थोरा होऊनि ॥४॥
लीन दीन हें चि सार । भव उतरावया पार । बुडे माथां भार । तुका म्हणें वाहोनि ॥५॥
                                                                                                                                (गाथा)
घातु: नाश; नासाडी; विध्वंस
भंगी: भंगणे
पाणोवाणी: पाठोपाठ
सैरा: नीट; चांगलें; सरळ

Thursday, July 12, 2018

अभंगाची दिंडी - दिवस ८

संत  ज्ञानेश्वर माऊली
माऊलींसारखा संन्यास्थ योगी शृंगार आपल्या साहित्यातून कसे प्रगट करू शकतो हे पाहण्यासाठी त्यांच्या विरहणी जरूर वाचाव्यात.
मी अंगणात उभी राहले असताना येणारा जाणार विचारू लागला "विठ्ठल?" आजूबाजूच्या सर्वच गोष्टी "विठ्ठल विठ्ठल" म्हणू लागल्या. तहान भूक तर सोडूनच द्या पण लाज व अभिमानपण राहिला नाही इतकी मला कृष्णाची ओढ लागली. माझा सखा (जिवींचा जिवनु) पांडुरंगच स्वःता येऊन माझं मनोरथ पूर्ण करेल.

पैल निळाचिये वेळीं । आंगणी उभी ठेलिये ।
येतिया जातिया पुसे । विठ्ठल केउता गे माये ॥१॥
पायरऊ जाला संचारु नवल ।
वेधें विंदान लाविलें म्हणे विठ्ठल विठ्ठल ॥२॥
नेणें तहान भूक । नाहीं लाज अभिमान ।
वेधिलें जनार्दनी । देवकीनंदना लागोनी गे माये ॥३॥
बापरखुमादेविवरु | जिवींचा जिवनु ।
माझे मनिंचे मनोरथ | पुरवीं कमळनयनु गे माये ॥४॥

केउता: कसा; कशी
वेधें  चित्ताकर्षकपणा
विंदान : कौशल्य; चातुर्य; कारागिरी; लाघव
वेधिलें: आकर्षिणे


साडीच्या दुकानात प्रत्येक मजल्यावर सुंदर साड्या अशा अनेक मजल्यांच्या दुकानातून एकच साडी घेताना जितका त्रास होतो तितकाच त्रास माऊलींचा एकच अभंग निवडताना होतो. (विरहणी वाचल्यामुळे साडीची उपमा सुचली.) म्हणून काही संताचे एकापेक्षा जास्त अभंग दिंडीत येणार आहेत.

Wednesday, July 11, 2018

अभंगाची दिंडी - दिवस ७


शेख महंमद
विठ्ठलाचे भक्त सर्व प्रातं, भाषा व धर्मामध्ये आढळतात. शेख महंमद हे असंच एक उदाहरण. शेख महंमद उत्कृष्ट रूपकांसाठी प्रसिद्ध आहेत.
शेखसाहेबांनी विठ्ठलांचे हात कमरेवर का आहेत? हे सांगण्यासाठी केलेला कल्पना विलास
कटावरी कर |चंद्रभागा ठाणा |
दावितसे खुणा | भावसिंधुच्या ||
ज्यांनी भक्तिमार्ग स्वीकारला त्याला हा भवसागर, सागर न राहता कमरेइतकाच खोल भासेल, हे सांगण्यासाठी विठ्ठलाची मूर्ती कमरेवर हात ठेवून उभी आहे.
शेख महंमद म्हणतात, जन्ममृत्यूच्या फेर्‍यातून सुटण्यासाठी देवसुद्धा मदत करू शकणार नाही. मग कोण मदत करत?

ब्रह्मा विष्‍णु रुद्र देव तेहतीस कोडी । जरी येऊनि भेटती आवडी । चौर्‍यांशी लक्षींची तोडूं न शकती बेडी । सद्‌गुरु दात्‍याविण ॥७६॥

Tuesday, July 10, 2018

अभंगाची दिंडी - दिवस ६


संत मुक्त्ताबाई

निवृत्तीनाथ हे माऊलीचे गुरू पण  समाजावर चिडून आत्मलीन होऊ पाहणार्‍या माऊलीना ऐकवलेले हे मुक्ताबाईचे ताटीचे अभंग म्हणजे जणू पार्थाला युद्धभूमीवर सांगितलेली गीता.

शुद्ध ज्याचा भाव झाला । दुरी नाही देव त्याला ।।१।।
अवघी साधन हातवटी ।  मोले मिळत नाही हाटी ।।धृ.।।
अहो आपण तैसे व्हावे । अवघे अनुमानूनि घ्यावे ।।३।।
ऎसे केले सतगुरूनाथे । बापरखुमादेवी कांते ।।४।।
तेथे कोणी शिकवावे ।  सार साधूनिया घ्यावे ।।५।।
लडिवाळ मुक्ताबाई ।  जीव मुद्दल ठायीचे ठायी । ।६।।
तुम्ही तरुनी विश्व तारा ।  ताटी उघडा ज्ञानेश्वरा ।।७।।

हातवटी: हातोटी; कौशल्य,  मोले: किंमत देऊन
'अनुमानूनि घ्यावे' ह्या शब्दातून मुक्ताबाईनी केवढा अर्थ सांगून ठेवला आहे!  माऊली मुक्ताबाईंपेक्षा वयाने वडील, पण तरी देखील "तेथे कोणी शिकवावे" म्हणण्याचे धारीष्ट मुक्ताबाई लडिवाळपणे करतात. तसचं "तुम्ही तरुनी विश्व तारा" या चार शब्दातून आपण भवसागरातून तरुन जावा आणि लोकांना पण घेऊन जावा हे किती मार्मिक शब्दात सांगितले आहे.

Monday, July 9, 2018

अभंगाची दिंडी - दिवस ५


संत सोयराबाई

येई येई गरुडध्वजा । विटेसहित करीन पूजा ॥१॥
धूप दीप पुष्पमाळा । तुज समर्पू गोपाळा ॥२॥
पुढे ठेवोनियां पान । वाढी कुटुंबी तें अन्न ॥३॥
तुम्हां योग्य नव्हे देवा । गोड करूनियां जेवा ॥४॥
विदुराघरच्या पातळ कण्या । खासी मायबाप धन्या ॥५॥
द्रौपदीच्या भाजी पाना । तृप्ती झाली नारायणा ॥६॥
तैसी झाली येथें परी । म्हणे चोख्याची महारी ॥७॥

संत चोखामेळायांची पत्नी सोयराबाईंयांचा हा अभंग. स्वःताची एक शैली, एक भाषा त्याहूनही महत्त्वाचे स्वःताचा एक विचार हे सोयराबाईंच वैशिष्टय. शब्दांची रचना अतिशय साधी, सरळ पण त्याचबरोबर एका ओळीवरून दुसरीवर जाताना आपल्या मुद्द्याचं केलेलं प्रतिपादन थक्क करणार आहे. विठ्ठलाच्या एकाही नावाची पुनरावृत्ती केलेली नाही.
माझ्या कुटुंबाचं जेवण तुला वाढणार आहे. ते तुझ्या योग्य नाही पण विदुराच्या कण्या आणि द्रौपदीच्या हातचा एक घास खाऊन तुझी तृप्ती झाली, तसंच तुझं इथंपण होईल.

Sunday, July 8, 2018

अभंगाची दिंडी - दिवस ४

संत जनाबाई

जनाबाईंसाठी विठ्ठलाने अनेक कामे केली आहेत. अशा आशयाचे अनेक अभंग आहेत. ('अ' चा अनुप्रास) आणि जनाबाईंनी विठ्ठलाला शिव्या दिलेले पण अभंग आहेत.
त्या शिव्या म्हणजे दोन जुने मित्र भेटल्यावर दिलेल्या शिव्या आहेत. जितक्या शिव्या जास्त तितकी मैत्री घट्ट. जनाबाईंची सख्य भक्ती (म्हणजेच देव हा आपला मित्र असे मानून केलेली भक्ती) आहे.
पण जनाबाईंनी असं काय केलं होतं की विठ्ठल तिचा मित्र झाला? हे जनाबाईंनीच खालील अभंगात सांगितले आहे. लग्न जरी नवरा नवरीचं असले तरी वर्‍हाडी मंडळीना मिष्टान्न मिळत. एकदा लोखंडाला परीसाचा स्पर्श झाला की लोक त्या लोखंडाला गळ्यात घालून फिरतात. तसच माझं (जनाबाईंच) झाल.

नोवरीया संगें वर्‍हाडीया सोहोळा । मांडे पुरणपोळ्या मिळे अन्न ॥१॥
परीसाचेनी संगें लोहो होय सोनें । तयाचीं भूषणें श्रीमंतासी ॥२॥
जनी म्हणे जोड झाली विठोबाची । दासी नामयाची म्हणोनियां ॥३॥

संताचा सहवास वारी शिवाय अजून कोठे मिळणार? चला आज थोडा संताचा सहवास मिळावा म्हणून दिवेघाटपर्यत जाण्याचा (दरवर्षीप्रमाणे) बेत आहे.

Saturday, July 7, 2018

अभंगाची दिंडी - दिवस ३


संत गोरा कुंभार

गोरोबाकाकांचे अनेक निर्गुणावर अभंग आहेत. असे अभंग आधी मला समजायला पाहिजेत मग दोन ओळी लिहीता येईल. म्हणून त्यातल्या त्यात सोपा अभंग घेतला आहे.

श्रवणें नयन जिव्हा शुद्ध करी । हरीनामें सोहंकारी सर्व काम ॥१॥
मग तुझा तूंचि दिवटा होसीगा सुभटा । मग जासील वैकुंठा हरिपाठें ॥२॥
रामनामें गणिका तरली अधम । अजामिळ परम चांडाळ दोषी ॥३॥
म्हणे गोरा कुंभार विठ्ठल मंत्र सोपा । एक वेळा बापा उच्चारीरे ॥४॥

दिवटा: मोठी मशाल; मोठा पेटविलेला काकडा; (प्रचलित अर्थ नाही  😁 )
सुभटा: १ चांगल्या धाटाचें; मोठें. २ भव्य; चांगलें, सुरेख. ३ शूर.

गोरोबाकाका भागवत पुराणातील दोन दाखले देतात. अजामिळ हा एक पापी होता. त्यांच्या दहव्या मुलाचे नाव 'नारायण' होते. मरताना त्याने नारायणाचे नाव घेतले म्हणून त्यांचा उद्धार झाला. तसेच गणिकेच्या पोपटाचे नाव 'राम' होते ते नाव सतत घेतल्याने तिचाही उद्धार झाला.
अनवधानाने घेतलेल्या नामने उद्धार होत असेल तर वारीत घेतलेल्या नामाने नक्कीच होईल.

Friday, July 6, 2018

अभंगाची दिंडी - दिवस २


संत नामदेव

तरले तरतील हा भरंवसा । पुढती न येती गर्भवासा ॥१॥
वाट सांपडली निकी । विट्ठल नाम ज्याचे मुखीं ॥२॥
तीर्थे इच्छती चरणीचें । रज नामधारकाचें ॥३॥
प्रायश्चित सोडोनीं प्रौढी । जाली दीन रुपें बापुडीं ॥४॥
ऋद्धी सिद्धी महाद्धारीं । मोक्ष वोळंगण करी ॥५॥
नामा म्हणे सुखनिधान । नाम पतित पावन ॥६॥

निकी = चांगुलपण ( निका—पवित्र; शुद्ध)
वोळंगण =आश्रय ?

मला कायम वाटतं चांगल्या कवितेत कमीतकमी शब्दात जास्तीत जास्त अर्थ सांगता आला पाहिजे. नामदेव महाराज 'तरले तरतील' या दोन शब्दात केवढा अर्थ सांगून गेले.
काल चोखोबा म्हणाले जन्म येणार असेल तर कुणाचा यावा. पण आज नामदेव महाराज सांगत आहेत परत जन्म येणारच नाही.
नामाचा महिमा वर्णन करताना, नाम घेण्यामुळे, केलेली पापपण आपल्यापुढे दीन (दिन नाही) होतात असे नामदेव महाराज म्हणतात.

वारी म्हणजेच नाम घेण्याची संधी.

Thursday, July 5, 2018

अभंगाची दिंडी - दिवस १


संत चोखामेळा

माझी आजी म्हणायची "देवा पुढचा जन्मच नको, देणार असशील तर माणसाचाच दे, ते पण शक्य नसेल तर बैल कर पण तो मात्र माऊलींच्या रथचा कर" त्यावेळी हे फार काही समजत नव्हत. हा संत चोखामेळाचा अभंग वाचताना आजीला काय म्हणायचं होत ते थोडफार कळलं.
संत चोखामेळा महाराज म्हणतात "वैष्णव" म्हणजेच वारकर्‍याच्या घरातील कुत्रा, मांजर केल तरी खुप झालं.

श्वान अथवा शूकर हो का मार्जार । परि वैष्णवाचें घर देईं देवा ॥१॥
तेणे समाधान होय माझ्या जीवा । न भाकीं कींव आणिकासी ॥२॥
उच्छिष्‍ट प्रसाद सेवीन धणिवरी । लोळेन परवरी कवतुकें ॥३॥
चोखा म्हणे कोणी जातां पंढरीसी । दंडवत त्यासी घालीन सुखे ॥४॥

धणिवरी: १) अकल्पित लाभ, पुरेसा; २) पोटभर; यथेष्ट.
परवरी : सपाटीचा भाग

वारीला जाणार्‍या सर्वच वारकर्‍यांना दंडवत.🙏🙏🙏🙏

अभंगाची दिंडी



व्हाट्स अप्/फेसबुकवर अभंगाची दिंडी काढावी म्हणतो. उद्या माऊलींच्या प्रस्थानापासून ते माऊली पंढरपूरला पोहचेपर्यंत रोज (एकतरी) मला आवडलेला अभंग टाकण्याचा विचार आहे. माझ्या अल्पबुध्दीनुसार या अभंगाबरोबर त्यातील अप्रचलित शब्दाचा अर्थ व जमल्यास एखादे दुसरे वाक्य जे अभंगाबद्दल काही माहिती सांगेल असे टाकणार आहे.
आपण पण आपल्याला भावलेले अभंग या दिंडीत घेऊन येऊ शकता.

बघू कस जमत आहे ते.