Tuesday, May 1, 2012

महाराष्ट्र देशा

महाराष्ट्र देशा
मानाचा मुजरा माझ्या महाराष्ट्र देशा
मानाचा मुजरा माझ्या महाराष्ट्र देशा ||घृ||
संत ना येथले वैष्णव नुसते
मानवतेचे ते बीज रुजवते 
ज्ञान वैराग्याचे दाते
संत जन्मती कैक येथे, संताच्यादेशा
महाराष्ट्र देशा माझ्या महाराष्ट्र देशा ||१||
कृष्णदेव ते देवगिरीचे
शिवबा तर अवतार शिवाचे
पेशव्यांचे अटकेवर झेंडे
शूर जन्मती कैक येथे, शूरांच्यादेशा
महाराष्ट्र देशा माझ्या महाराष्ट्र देशा ||२||
वासुदेव, उमाजी, तात्या टोपे
टिळक, राजगुरु, सावरकर ते
भारतास दिधले वीर खडे ते
वीर जन्मती कैक येथे, वीरांच्यादेशा
महाराष्ट्र देशा माझ्या महाराष्ट्र देशा ||३||
मेहता, रानडे, गोखले इथले
शाहू, फुले अन् आंबेडकर जे
समतेसाठी अखंड लढले
सुधारकांच्या देशा माझ्या महाराष्ट्रदेशा
महाराष्ट्र देशा माझ्या महाराष्ट्र देशा ||४||
दूरदृष्टीचे इथले नेते
हिमालयाचे आधार खरे ते
बहुजनाचे तेच दाते
अनेक नेते इथे जन्मती, पुढा-यांच्यादेशा
महाराष्ट्र देशा माझ्या महाराष्ट्र देशा ||५||
चित्रमहर्षी अन् गानकोकीळा
पुल असो वा असोत वि.वा.
कित्येक जन्मती नवीन कला
कलाकारांच्या देशा माझ्या महाराष्ट्रदेशा
महाराष्ट्र देशा माझ्या महाराष्ट्र देशा ||६||
नारळीकर वा विजय भाटकर
सचिन तर मास्टर ब्लास्टर
अण्णा आमचे समाजोध्दारक
नवरत्नाच्या खाणी येथे रत्नाकरदेशा
महाराष्ट्र देशा माझ्या महाराष्ट्र देशा ||७||
असतील वा होतील कैक देश
एकमेव पण तू असा प्रदेश
मी तुझाच अन् तु माझा
ज्ञानी, दानी, शूर, वीराच्या महाराष्ट्र देशा
महाराष्ट्र देशा माझ्या महाराष्ट्र देशा ||८||