Sunday, March 18, 2012

पुस्तक


परवाच काही पुस्तकं खरेदी केली, पुस्तक खरेदी करण्याचं एक कारण तर पुस्तक प्रदर्शन पण दुसरं फार महत्वाच कारण म्हणजे भावानं ही कविता वाचून दाखवली होती........
एक तर गुलजार म्हणजे माझे आवडते कवी/गजलकार, आणि विषय पुस्तक

पुस्तके वाकून पाहतात
बंद आलमारीच्या काचांआडून
पाहतात मोठय़ा आशेने
आजकाल महिना महिना भेट होत नाही त्यांची
ज्या सायंकालीन वेळा
खात्रीने यांच्या सोबतीत व्यतीत व्हायच्या
त्या आता कॉम्प्युटरच्या पडद्यावरून
सरकून जातात
पुस्तके असतात बेचैन
पाहतात मोठय़ा आशेने
आता तर त्यांना झोपेत चालण्याचीही
सवय झाली आहे
ज्या मूल्यांचा पुस्तके उच्चार करीत होती,
ज्यांची ऊर्जा कधीच संपणार नव्हती
ती मूल्ये आता अदृश्य झालीत घरातून
ज्या नात्यांच्या कहाण्या पुस्तके सांगत होती
ती नातीही विस्कटून गेली आहेत
एखादे पान उलटले तर आता हुंदका ऐकू येतो
शब्दांचे अर्थ पडले आहेत गळून
शब्द बनले आहेत
पर्णहीन सुकलेल्या फांद्यांप्रमाणे
त्यांच्यावर आता कधीच अर्थ उगवणार नाही
अनेक परंपरा मातीच्या भांडय़ांसारख्या
विखरून पडल्या आहेत
ज्यांना काचेच्या ग्लासांनी
निरुपयोगी ठरविले आहे
प्रत्येक पान उलटताना
ओठावर एक नवी चव येत होती
आता बोटांनी क्लिक केल्यावर
एकामागोमाग एक प्रतिमाच फक्त
उलगडत जातात पडद्यावर
पुस्तकांशी जे रक्ताचं नातं आहे
ते तुटलं आहे
कधी पुस्तके छातीवर ठेवून आपण निजत होतो
कधी त्यांना कडेवर घेत होतो
कधी त्यांना गुडघ्यावर ठेवून
प्रार्थना केल्याप्रमाणे वाचत होतो
हवे ते सारे ज्ञान तर पुढेही मिळत जाईल
पण पुस्तकात कधी कधी सापडत होती
सुकलेली फुले
सुवासिक पाने
आणि पुस्तके मागताना, हातून पडताना,
उचलताना
जी नाती जुळत होती, त्यांचे काय?
ती आता कदाचित कधीच जुळणार नाहीत.
                                                                गुलजार