Saturday, November 27, 2021

चित्रपट K.D. (2019)

 सहसा दाक्षिणात्य चित्रपट बघण्याचं मी टाळतो याचं मुख्य कारण म्हणजे दाक्षिणात्य चित्रपट नसून, दाक्षिणात्य चित्रपट जे हिंदीमध्ये डब केले जातात ते आहे. असो.

K.D. (2019)


 चित्रपटाची सुरुवात एक मुलगी हातात वह्या, पुस्तके घेऊन शाळेकडे जाताना दिसते.  मागील आवाजात व्यक्ती सांगत असते की 'शिक्षण किती महत्त्वाचे आहे आणि त्यातल्या त्यात स्त्रियांचे शिक्षण. दुसर्‍या गावात चालत जाऊन शिक्षण घेणारी ही मुलगी आमच्या भागातील इंदिरा गांधीच होणार.' तेवढ्यात ती मुलगी एका शेताकडे वळते, तिथे एक मुलगा हातात चिंचा, गोळ्या घेऊन बसलेला असतो. ती मुलगी त्यांच्याकडे बघून हसते. मागील आवाज सांगू लागतो. 'हा देश आणखीन एका इंदिरा गांधींना मुकला'. चित्रपटाची एवढी खमंग सुरुवात करून दिग्दर्शक व लेखक मधूमिता या चित्रपटात काय दाखवणार आहे यांची चुणूक प्रेक्षकांना येते.

वर्णन सांगणारा आवाज हा ८० वर्षाच्या म्हातार्‍यांचा (कुरुपुदाई ऊर्फ केडी) याचा असून तो गेले तीन महिने कोमात आहे. त्यांची मुलं 'आता काय करायचं?' या विचारात आहेत 'किती दिवस अजून हा त्रास सहन करायचा.' त्यातूनच तलाईकोतलचा (दयामरण हा थोडासा अयोग्य मराठी शब्द) वापर करावा का? अस सर्वांना वाटत. तलाईकोतल मध्ये व्यक्तीला तेलाने मालीश करून शहाळ्याचे पाणी पाजले जाते. सदर व्यक्ती एक, दोन दिवसात मरण पावते. 

अचानक केडीला जाग येते, आपल्याबद्दल चाललेली चर्चा ऐकून तो फारच अस्वस्थ होतो. आपलीच मुलं आपल्याला मारायला टपली आहेत या विचारांनी घाबरून हा घरातून धूम टोकतो. केडी घरातून निघून गेल्यावर त्याला शोधण्यासाठी घरातील लोक धावाधाव करत असतात. त्याला शोधण्याचे काम एका गुप्तहेराला दिल जात.

  बाहेरच्या जग फारसे पाहिलेलं नसलेला हा केडी, दिसेल त्या मार्गाने घर सोडून पळतो. एका मंदिराजवळ गाडी बंद पडते म्हणून सर्वजण उतरतात तिथे केडीची गाठ नियतीने एका आठ वर्षाच्या अनाथ मुलांबरोबर (कुट्टी) बांधलेली असते. अनाथ असलेल्या कुट्टीला जीवनाने हुशार व चुणचुणीत बनवलेले आहे. 

   या दोघांच्या वयातील अंतर व दोघांचा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन यात जमीन अस्मानाचा फरक पण या दोघांची मैत्री होते. या मैत्रीतही अनेक कंगोरे आहेत कधी एकमेकांशी असलेली घट्ट मैत्री तर कधी एकमेकांत झालेली भांडणं ही चित्रपटात अतिशय सुंदररित्या दर्शवली आहे. केडीच्या कुठल्या कुठल्या इच्छा राहिल्या आहेत त्याची यादी (बकेट लिस्ट) हे दोघे करतात. पुढचे काही दिवस दोघे त्या इच्छा पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करतात. 

अतिशय साधी वाटणारी ही यादीः

बिर्याणी खाणे, MGR, रजनीकांत सारखी भूमिका/अभिनय करणे, विदेशी दारू पिणे, कोट घालणे, मित्राबरोबर गाडी चालवणे, चित्रपटात काम करणे, जुन्या मैत्रिणीला भेटणे.

पुढील काही काळ केडीच्या वरील सर्व इच्छा पूर्ण करण्यासाठी कुट्टी व केडी किती धम्माल करतात हे चित्रपटातच पाहणे गरजेच आहे. या सर्व इच्छा पूर्ण होत असताना त्या वास्तविक दाखवण्याचे शिवधनुष्य दिग्दर्शिकेने सहज पेलले आहे.

 या इच्छा पूर्ण करताना केडी व कुट्टी हे एकमेकाचे अविभाज्य भाग होऊन जातात. पण फोनवरून केडीला कळत कुट्टीची चेन्नईच्या एका शाळेत शिक्षणाची व राहण्याची सोय झालेली असते. घरातील सर्व व्यक्तींनी ज्याच्या मरणाची अपेक्षा केली होती अशा 80 वर्षाच्या म्हातार्‍याच्या जीवनात फक्त आणि फक्त एकच आनंद असतो तो म्हणजे तो कुट्टी. त्यालाच आपल्यापासून दुर ठेवायचे?

केडी त्याला चेन्नईला पाठवतो का? कुट्टी केडीपासून दुर जातो का? केडीचे स्वागत घरी कसे होते हे सर्व चित्रपटातच पहावे.

केडीचे काम करणारे मु रामास्वामी (हे तामिळ चित्रपट व नाट्यकलेतील नावाजलेले नाव) व कुट्टीचे काम करणारा नागाविशाल यांचे अभिनय अप्रतिम आहेत. 

दिग्दर्शिका व लेखिका मधूमिता यांनी या चित्रपटातून नेहमी प्रमाणे आपल्या कामाचा ठसा उमटवला आहे. चित्रपटातील संवाद अतिशय उत्तम आहेत. मला तामिळ भाषा येत नसल्याचा इथे खूप त्रास झाला. इंग्रजी उपशीर्षकावरून (सबटायटल) संवादाची खोली सहज लक्षात येते. 

जीवनात काही कारणाने मनावर मळभ आले असेल तर हा चित्रपट पुन्हा पुन्हा पाहवा.

हा चित्रपट मी १८व्या पुणे आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हल मध्ये चित्रपटगृहात बघितला होता. सदर चित्रपट नेटफ्लिक्सवर आहे.