Wednesday, November 20, 2019


माझी नवीन गझल


Thursday, July 11, 2019

समारोप

नमस्कार

गेले १८ दिवस मी संताचे अभंग तुमच्यापर्यंत पोहोचवत होतो. यावर्षी हे कितपत
 जमते या बाबत थोडासा साशंक होतो. पण हे व्रत पूर्ण करून घेतलं गेले. 
हे अभंग वाचून बर्‍याच जणांनी मला प्रतिक्रिया/सूचना (सार्वजनिक अथवा वैयक्तिक)
दिल्या. त्यातील जेवढ्या सूचनांचा  समावेश करण शक्य होतं त्याचा समावेश केला.
फाँन्ट चांगला असूनसुद्धा नीट वाचता येत नसल्याचे बर्‍याच जणांनी मला सांगितले. 
प्रत्येक दिवसादिवशी माऊलींची पालखी कुठून निघाली? कुठे मुक्काम आहे? यांची  
ही माहिती टाकावी अशी सूचना केली गेली. ती लगेच आमलात आणली.
यावर्षी मनात नवविधा भक्तीचे अभंग सादर करावेत असं वाटत होते. निवडलेला 
अभंग हा अनेक भक्ती प्रकाराचे मिश्रण असू शकतो. तरी ही माझ्या 
अल्पबुद्धीने त्यांना नऊ भक्तीमध्ये  टाकण्याचा प्रयत्न केला आहे.
१) श्रवण भक्ती : दिवस ५ संत नामदेव
२) कीर्तन भक्ती : दिवस ११ संत तुकाराम, दिवस १६ संत एकनाथ
३) स्मरण भक्ती :
     दिवस १ संत गोरा कुंभार, 
    दिवस ३ संत चोखामेळा, 
    दिवस १५ संत जनाबाई
४) वंदन भक्ती : 
    दिवस २ संत सावतामाळी,
     दिवस ७ संत ज्ञानेश्वर, 
    दिवस १४ संत सेना महाराज
५) अर्चन भक्ती : दिवस ८ संत मुक्ताबाई, दिवस १० संत एकनाथ
६) पादसंवाहन भक्ती : दिवस ६ संत निव्र्तीनाथ,
७) दास्य भक्ती : दिवस ९ संत कान्होपात्रा, दिवस १२ संत बहेणाबाई
८) सख्य भक्ती :  दिवस ४ संत जनाबाई
९) आत्मनिवेदन भक्ती : दिवस १३ संत सोयराबाई
आपल्या पुढील वर्षीच्या अभंग दिंडीसाठी काही सूचना असतील तर नक्की कळवा.
या वर्षीचे सर्व अभंग एकत्र केले आहेत. त्यांची लिंक
https://drive.google.com/file/d/1mc-Uy6TcUYyD1Bses6f7o6B_QZu8AbMU/view?usp=sharing
मागील वर्षीचे अभंग दिंडी
https://drive.google.com/file/d/1U1b7h74UCCCCPHAL6unENkVgXd4efDsI/view?usp=sharing
कल्याण
9423260836

दिवस १८ - पंढरपूर आषाढी एकादशी


Tuesday, June 11, 2019

केल्याने देशाटन - हिमाचल प्रदेश -४

औटकडून येताना सैंज हे उत्तरेकडील ठिकाण आहे तसेच औटच्या दक्षिणेकडे बंजर हे ठिकाण आहे. खरं तर एक दिवस बंजरला काढण्याचा माझा बेत होता. पण हातात असणार्‍या दिवसात हे बसत नसल्यामुळे तो बेत रद्द करावा लागला. सैंजवरुन औत व तेथून मनाली असा प्रवास करत आम्ही मनालीला २४ मे २०१९ ला पोहचलो.
मनाली आणि सैंज एकमेकांच्या अगदी विरुद्ध. एके ठिकाणी प्रचंड गर्दी तर एके ठिकाणी माणसे नावाला पण नाहीत. एके ठिकाणी पांढरा हिम तर एके ठिकाणी हिरवी साडी नेसलेली वनराई. असो, आपल्याला दोन्ही गोष्टीचा आनंद घेता आला पाहिजे.

सामान खोलीवर ठेवले, तोपर्यंत पाऊस सुरु झाला. मनालीमध्ये फिरण्यासाठी संध्याकाळ ठेवली होती. ती वाया जाते की काय असे वाटतं होते पण,  पावसाचा जोर कमी झाल्यावर आम्ही जवळच असणार्‍या हिडींबा मंदिराकडे निघालो.

हिमाचलमधील मंदिरे ही चौकोनी, लाकडाची व त्यावरच नक्षी केलेली अशी आहेत, म्हणजेच पैगोडा शैलीची. हे मंदिर त्याला अपवाद नव्हत. मंदिराच्या आजूबाजूला देवदार वृक्षांची भली मोठी झाडे होती. हिडींबा देवीला इकडे हिरमा देवीसुद्धा म्हणतात. हे मंदिर साधारण ५०० वर्षापूर्वी राजा बहादुर सिंग यांनी बनवलेले आहे. मंदिराच्या प्रवेश द्वारावर अनेक देवीदेवतांची चित्रे काढलेली बघायला मिळतात. जसं उमाशंकर, म्हैशासुरमर्दनी, लक्ष्मीनारायण. वरच्या काही भागात बुद्धांच्या मूर्ती पण कोरलेल्या आहेत.

हे मंदिर बघून आम्ही मुख्य म्हणजेच माल रोडवर आलो. तुळशीबागेत जेवढी गर्दी असते तेवढीच गर्दी इथे पण होती. दोन दगड वर फेकले तर त्यातील एक दगड मराठी माणसाला लागेल, पाच फेकले तर पुणेरी टोमणापण मिळेल अशी इथली अवस्था. जेवण करून संध्याकाळी झोपी गेलो.

दुसर्‍या दिवशी (२५ मे) सोलांग व नग्गरचा राजवाडा पाहायचा होता. सकाळी दहा वाजता प्रवास सुरू केला. सोलांग हे ठिकाण साधारण १५-२० किमी वर पण आम्हाला तेथे पोचायला साधारण दीड वाजला. रस्ते अतिशय छोटे, भयंकर पर्यटक यामुळे रस्त्यावर दोन-दोन तीन-तीन तास अडकून पडावं लागले.



सोलांग हे अतिशय निसर्गरम्य ठिकाण आहे.  पैराग्लाइडिंगसाठी हेही सुंदर स्थळ आहे. लहान मुलांसाठी मध्यम उंचीवरून, त्यापेक्षा आणखीन जास्त उंचीवरून व पूर्ण डोंगरावरून असे तीन टप्प्यात येथे  पैराग्लाइडिंग केले जाते. पर्यटकांची गर्दी असली तरी इथून दिसणारा हिमालय, आजूबाजूचे डोंगर, समोर पसरलेले गवत यामुळे हे ठिकाण प्रेक्षणीय बनते यात नक्कीच वाद नाही. तास दोन तास थांबून आम्ही इथून नग्गरचा राजवाडा बघण्यासाठी गेलो. राजवाड्याचे सध्या हॉटेलमध्ये रूपांतरण करण्यात आलेले असले तरीही इथून दिसणारा देखावा हा खरोखर नयनरम्य आहे. हा राजवाडा बघण्यासाठी जाण्याची गरज नक्कीच नाही पण इथून दिसणारे निसर्ग सौंदर्य बघण्यासाठी तरी नक्कीच जाण्याचं हे ठिकाण. राजवाडा बघून आम्ही परत मनालीकडे येण्यासाठी निघालो. रस्त्यावर परत प्रचंड गर्दी असल्यामुळे शेवटचे दोन किलोमीटर चालत येणे आम्ही पसंत केले.


 २६ मेला सकाळीच रोहतांग पासला जाण्याचा बेत होता. आठ वाजता बसमध्ये बसून आम्ही रोहतांग पाससाठी निघालो. मनालीपासून रोहतांग पास साधारण पन्नास किलोमीटर.  वाटेत ड्रायव्हरने ओव्हरकोट भाड्याने घेण्यासाठी गाडी थांबवली. ओव्हरकोट, हातात हातमोजे, पायात बूट असा एस्किमो लोकांच्या सारखा पेहराव करून आम्ही बसमध्ये बसलो. आज पण कालच्या सारखीच रस्त्यावर भयंकर रहदारी. त्यामुळे बस सारखी थांबत होती. आम्ही घातलेल्या या सर्व पेहरावामुळे आम्हाला मनालीमध्ये उकडायला लागले. जायचा रस्ता अतिशय अरुंद एखादीच गाडी नीट जाऊ शकेल अशा रस्त्यावरून गाड्या घालणारे आमच्या आणि समोरच्या गाडीचे चक्रधर म्हणजे ड्रायव्हर यांना कोपरापासून नमन. आठ वाजता आम्ही गाडीत बसलेलो दोन वाजेपर्यंत रोहतांग पासला पोहोचलो. रोहतांग पासला बर्फाचे शुभ्र डोंगर आणि ते ही चारी बाजूंनी. हे पाहून केलेल्या प्रवासाचे खरोखरच सार्थक झाले. थोडा वेळ बर्फांत खेळल्यानंतर आपल्याला तेथे फार वेळ खेळता येणार नाही याची जाणीव झाली. आम्ही डोंगर उतरून खाली आलो. हे डोंगर चढायला सोपे असले तरी खाली उतरताना पोटात गोळा येतो व आधीच गार पडलेले पाय अजूनच गार पडतात.




 येथे मॅगी विकण्यासाठी आलेल्या लोकांकडून आम्ही मॅगी विकत घेतली आणि खाल्ली. गार वातावरणात गरम मॅगी म्हणजे पंचपक्वान्नांचे ताट. चार वाजता आमची बस परत निघण्यासाठी सज्ज झाली. येताना जेवढी रहदारी होती, त्यापेक्षा बरीच रहदारी कमी झाली होती. पण मनालीजवळ आल्यावर रहदारीने परत डोके वर काढले. साधारण दीड-दोन किलोमीटर चालत येणेच आम्ही जास्त पसंत केले. मनालीचा रात्री निरोप घेऊन आम्ही कुल्लूला आलो. रात्रीचा मुक्काम आम्ही कुल्लूत केला.
 २७ मेला आम्ही मणिकर्ण बघण्यासाठी बाहेर पडलो. मणिकर्ण हे कुल्लूपासून साधारण पन्नास किलोमीटरवर असलेले गाव. पौराणिक कथेनुसार शंकर आणि पार्वती यांनी येथे अकरा हजार वर्ष तप केलं. एकदा पाण्यात जलक्रीडा करत असताना पार्वतीच्या कानातील चिंतामणी पडला आणि तो तेथून पाताळात गेला. शंकरांनी आपल्या गणांना चिंतामणी शोधायला सांगितला पण त्यांना तो सापडला नाही. शंकराने आपल्या नयनातून नयना देवी तयार केली. त्या देवीने पाताळातील शेषनागाकडून तो मणी परत आणला. चिंतामणी बरोबर शेषनागाने अनेक इतरही मणी दिले होते सर्व मणी त्याने आपल्या फुत्कारातून मणिकर्ण येथे फेकले.
गुरुनानक एकदा त्यांच्या शिष्याबरोबर या ठिकाणी आले होते. शिष्यांना भूक लागली. जवळच तर फक्त कणिक होती. गुरुनानक यांनी तेथील एक दगड बाजूला केला व तेथून उकळत्या पाण्याचा एक झरा उत्पन्न झाला. आपल्या शिष्यांना पोळी करून त्या पाण्यात टाकायला सांगितले. शिष्यांनी पोळी करून पाण्यात टाकली पण ती पाण्यात बुडून गेली. गुरुनानकांनी शिष्यांना सांगितले, जर तू एक पोळी देवाला दिलीस तर सगळ्या तुला परत मिळतील. त्याप्रमाणे शिष्याने एक पोळी देवाला देण्याचे ठरवलं. त्याचबरोबर सर्व तयार झालेल्या पोळ्या या पाण्यावर तरंगू लागल्या. आजही इथे लंगर मध्ये बनवणारे पदार्थ अशाच निसर्गनिर्मित गरम पाण्यावर तयार केले जातात. ही गरम पाण्याची कुंडे येथे पाहायला मिळतात. शंकराची अनेक देवळे ही थंड ठिकाणी असतात. पण माझ्या पाहण्यातले मणिकर्ण हे असे एकमेव मंदिर आहे, जे गरम पाण्याच्या कुंडा जवळ आहे. काही कुंड तर इतकी गरम आहेत ज्यात आपल्याला हातसुद्धा घालवत नाही. त्यातून येण्यार्‍या पाण्यामुळे (गंघकाच्या) दगडाचा रंग लालसर झाला आहे. काही कुंड ही अंघोळ करण्यासाठी योग्य आहेत. गुरुद्वारा आणि शंकराच्या मंदिराचे दर्शन घेऊन आम्ही परत आलो. कुल्लूमध्ये बिजली महादेव नावाचे एक मंदिर आहे ते बघण्याचा बेत होता पण जाऊन परत येणे शक्य नसल्यामुळे तो बेत रद्द करावा लागला. जवळच असणार्‍या नॅशनल पार्कमध्ये तास दोन तास घालवले. तेथून दिल्लीला जाणार्‍या बसमध्ये बसलो व रात्रीच्या प्रवासांची सुरुवात केली.



२८ तारखेला आम्ही दिल्लीला पोचलो. हॉटेलमध्ये सामान टाकले. हा दिवस विश्रांती दिवस म्हणून घालवला.
२९ तारखेला माझ्या व्यावसायिक बैठकी होत्या. त्या बैठकींना उपस्थित राहण्यासाठी म्हणून मी कार्यालयात गेलो.(हे मराठी वाक्य आहे, मिंग्लीश मध्ये बिंझनेस मिंटीग अटेंड करायला ऑफिसला गेलो.)  घरच्यांनी दिल्ली दर्शनाचा आनंद मनसोक्त लुटला.
३० तारखेला संध्याकाळी, आम्ही सरोजिनीनगरमध्ये थोडीफार (खरंतर फारच) खरेदी केली. त्याच रात्री विमानाने पुण्यासाठी निघालो. या प्रवासात विमानाने प्रवास करण्याचे टाळायचे होते पण रविवारी(२ जूनला) दहावीपर्यंतच्या मित्रांचा स्नेहमेळाव्याचा कार्यक्रम असल्यामुळे त्या कार्यक्रमासाठी विमानाने येणं गरजेचे होत. असो, काही नियम हे तोडण्यासाठीच बनवले जातात असं म्हटले जात.
 सदर सहलीत हिमाचलचे वेगवेगळे भाग पाहिले. येथील लोक अतिशय प्रामाणिक, सहदय आणि मैत्री जपणारे आहेत. त्यामुळे येथे अनेक वेळा फिरायला यावं असे वाटते. या सहलीत तिथले अनेक जण माझे मित्र झालेत. सृष्टिसौंदर्याने भरलेल्या हिमाचल प्रदेशाला माझे शतशः नमन
 इति लेखन/प्रवास सीमा.

Monday, June 10, 2019

केल्याने देशाटन - हिमाचल प्रदेश -३

सकाळी (२१ मे २०१९)  उठून मी आणि माझी पुतणी ईशा, आम्ही दोघं मंदिरात गेलो. मंदिरातील वातावरण अतिशय शांत होते. जिवंत असणाऱ्या अनेक आध्यात्मिक गुरुंमध्ये फारच थोड्या लोकांना मी गुरु मानतो. त्यापैकी एक म्हणजे, गुरुजी म्हणजेच सध्याचे दलाई लामा. गुरुजींची बसायची जागा बघून मनाला शांतता मिळाली. मनाच्या परिस्थितीने म्हणा किंवा खरोखरच असणाऱ्या सकारात्मक ऊर्जेचा हा परिणाम.

ईशाला कामानिमित्त पुण्याला यायचं होतं म्हणून तिला घेऊन मी होशियारपूरला जाण्यासाठी निघालो. देवळाच्या परिसरातील वस्तुसंग्रहालय आवर्जून बघण्यासारखे आहे. हे वस्तुसंग्रहालय बघितल्यावर तिबेटी लोकांवर झालेले अत्याचार लक्षात येतात. मराठी माणसांसाठी महाराजांची आग्र्यावरून सुटका जितकी रोमहर्षक आहे तितकाच गुरूजींचा तिबेट ते धर्मशाळा हा प्रवास. जवळ असणारे तळे ही प्रेक्षणीय स्थळ आहे. ईशाला सोडून मी परत धर्मशाळेत आलो. सहलीतून कुणाला तरी मध्येच सोडताना फारच जास्त त्रास होतो.
उद्याच्या दिवसाची तयारी करू लागलो. मंडीला जाण्यासाठी धर्मशाळेतून दोन मार्ग आहेत. एक धवलमार्ग जो डोंगरातून जातो तर एक थोडासा लांबचा मार्ग. आम्ही धवलमार्ग निवडला.
     २२ मे २०१९  पालमपूरमार्गे बीर बिलिंग या ठिकाणी आलो. हे जगातील पैराग्लाइडिंगसाठी नावाजलेले ठिकाण आहे. आम्हाला कोणालाच पैराग्लाइडिंग करायचे नसल्याने आम्ही तेथून नवीन होऊ घातलेल्या बरोट या प्रेक्षणीय स्थळी आलो. बरोटच्या चारी बाजूने डोंगर आहेत व मधून वाहणारी नदी.



   हिमालयातील सर्वच नद्यांचे तळ दिसतात, तसाच या ही नदीचा तळ दिसत होता. नदीच्या पाण्याला चांगलाच दाब होता. चित्रात उडणारे कारंजे हे नदीच्या दबाबावर उडवलेले आहे.
त्यावरून नदीच्या दाबाचा अंदाज येऊ शकतो. जवळ मत्स्यशेती केली जाते. नदीवर छोटेखानी धरण बांधलेले आहे. आजचा प्रवास फारच घाटातून होता. म्हणून आम्ही जेवण टाळत होतो. पण बरोटला आल्यावर भेळपुरीच्या गाडीपाशी आमची पावलं आपोआप थबकली. सैंडविच बनवायला सांगितले. सबवे मध्ये विचारतात तसं कुठला पाव घेऊ? कुठली भाजी घालू असले फालतू प्रश्न न विचारता त्याने 'देसी' सैंडविच बनवायला सुरुवात केली. दोन सैंडविच देवून झाल्यावर त्यांच्या लक्षात आलं तिसरं सैंडविच थोडे जास्त जळाल आहे. मग त्यानं काहीही विचार न करता नवीन सैंडविच बनवून आम्हाला दिल. हा या लोकांच्यातला चांगुलपणा आम्हाला पूर्ण सहलीमध्ये दिसून आला.


सैंडविच खावून आम्ही घतासनी या ठिकाणी आलो. बरेच वेळा आम्ही त्यांचा उच्चार कटासन केल्यामुळे तेथील लोकांना आम्हाला कुठे जायचे ते कळतं नव्हत. घतासनीवरुन आम्हाला मंडीला जायची बस मिळाली.



मंडीमघ्ये बघण्यासारखी मंदिरे, घाट आहेत. पण दुसर्‍या दिवशी आम्हाला प्रवासाला किती वेळ लागेल, हे माहीत नसल्यामुळे आम्ही रात्री झोपून, दुसर्‍या दिवशी सकाळी (२३ मे) लगेचच सैंजसाठी प्रस्थान केले. मंडीपासून आम्ही औतला आलो. औत येण्याच्या आधी तीन किमीचा खूप मोठा बोगदा लागतो. औतवरुन आम्ही सैंज या गावी आलो. “द ग्रेट हिमालईन नॅशनल पार्क” ची सुरूवात येथूनच होते. हे ठिकाण अजून पर्यटकांच्या गर्दीपासून वाचलेलं आहे.



येथे ट्रेक करण्यासाठी वेगवेगळे ग्रुप येतात. सहा, दोन आणि एक दिवस असे सोप्यापासून ते अवघड ट्रेक येथे करता येतात. प्रवासात डाव्या हाताला वाहणारी पार्वती (पार्बती) नदी अतिशय नयनरम्य आहे. एकूणच परिसर फारच छान आहे. ज्यांना लोकांच्या कोलाहलापासून लांब जायचे आहे त्यांच्यासाठी हा परिसर म्हणजे स्वर्गच आहे. सैंजवरून जंगलविभागाचे 'रेस्ट हाउस' ६ कि.मी. वर आहे. त्या भागाला रुपासैंज असे म्हणतात. आपल्याकडील ब्रुद्रक सारखा हा प्रकार असावा. काही लोकांनी आम्हाला चालत जाण्याचा सल्ला दिला. तेथे जाण्यासाठी व येण्यासाठी सकाळी दोन आणि संध्याकाळी दोन बस आहेत. इतर वेळेस चालत. देवकृपेने सैंज येथे खाजगी गाड्या आहेत. आम्ही खाजगी गाडीतून विश्राम गृहावर गेलो.
दहा-बारा खोल्यांचे विश्राम गृह, हे सांभाळायला ठेवलेला एक राखणदार आणि आजूबाजूला घनदाट झाडी. मला येथे आल्यावर कळलं, त्या दिवशी तिथे राहणारे माझे एकच कुटुंब आहे. दुसर्‍या राज्यात असतो तर एकटे राहायचा विचार पण नसता केला. पण हिमाचल प्रदेश याबाबत फारच सुरक्षित आहे.
               सामान खोलीवर टाकले, राखणदारांला जेवण करण्यास सांगितले व जवळच असणार्‍या डोंगरावर एक छोटा ट्रेक करण्यासाठी तयार झालो. पार्वती नदीला मिळणारा एक झरा याच डोंगरावर उगम पावतो तिथपर्यंत जाण्याचं ठरवलं. थोडासा पाऊस चालू झाला होता. पावसाचा अजून त्रास होत नव्हता. डोंगर व तिथे असणारे अनेक विविध पक्षी, झाडे, गुलाबांचे विविध प्रकार या सर्वांनी मन एकदम प्रफुल्लित झाले.  डोंगर चढून वर केव्हा आलो हे आम्हाला कळलेच नाही. हिमाचलचा हा वेगळा रंग होता. हिरवी दाट झाडी, रिमझिम येणार पाऊस, पक्ष्याचे व झर्‍याचा आवाज, एक वेगळेच विश्व.




डोंगर उतरून आम्ही परत खोलीवर आलो, राखणदारांनी आम्हाला जेवण वाढले. बिचारा भाजी आणण्यासाठी सैंजला गेला होता. भरपूर जेवण करून आम्ही थोडी विश्रांती घेतली. पाच वाजता परत चहा, बाजूला डोंगर, व त्यावर उतरलेले पांढरे शुभ्र ढग. अद्भुत वातावरण. जगातील सर्व चिंतांपासून दूर.

संध्याकाळच्या वेळेस हिमाचल मधील रुपासैंज हे शेतकर्‍यांचे गाव बघण्याचा योग आला. प्रत्येकांच्या दारा समोर बाग. बागेत सफरचंद, आलूबुखार व गुलाबांचे हजार प्रकार बघायला मिळाले. तेथून आम्ही पार्वती नदीच्या काठावर फिरायला गेलो. नदीला स्वतःची एक लय असते, गती असते. कधी त्या लयीकडे लक्षच गेलं नव्हत. आज त्या लयीत शास्त्रीय संगीतातील सर्व लयीचा प्रत्यय येत होता. थोडावेळ काठावर बसून आम्ही परत खोलीवर आलो.


थंडी चांगलीच जाणवू लागली होती. रात्रीचे जेवण करून आम्ही झोपी गेलो. सकाळी नेहमी प्रमाणे पक्ष्यांच्या आवाजाने जागे झालो. खिडकी उघडून बघितल्यावर धुके, हिम (बर्फ), हिरवे डोंगर व ढग या सर्वांचा निसर्गाच्या कागदावर चाललेला खेळ पाहतच राहिलो. मस्तपैकी चहा पीत, या खेळात होणारे सूर्याचे आगमन बघत बसलो.
 सकाळी (२४ मे)  आठ वाजता आम्ही सैंज सोडलं. सोडताना या ठिकाणाबद्दल मनात एक कायमची जागा मात्र निर्माण झाली.



अनेक वेळा परत येऊ असं ठरवत सैंजचा निरोप घेतला.