Monday, June 10, 2019

केल्याने देशाटन - हिमाचल प्रदेश -३

सकाळी (२१ मे २०१९)  उठून मी आणि माझी पुतणी ईशा, आम्ही दोघं मंदिरात गेलो. मंदिरातील वातावरण अतिशय शांत होते. जिवंत असणाऱ्या अनेक आध्यात्मिक गुरुंमध्ये फारच थोड्या लोकांना मी गुरु मानतो. त्यापैकी एक म्हणजे, गुरुजी म्हणजेच सध्याचे दलाई लामा. गुरुजींची बसायची जागा बघून मनाला शांतता मिळाली. मनाच्या परिस्थितीने म्हणा किंवा खरोखरच असणाऱ्या सकारात्मक ऊर्जेचा हा परिणाम.

ईशाला कामानिमित्त पुण्याला यायचं होतं म्हणून तिला घेऊन मी होशियारपूरला जाण्यासाठी निघालो. देवळाच्या परिसरातील वस्तुसंग्रहालय आवर्जून बघण्यासारखे आहे. हे वस्तुसंग्रहालय बघितल्यावर तिबेटी लोकांवर झालेले अत्याचार लक्षात येतात. मराठी माणसांसाठी महाराजांची आग्र्यावरून सुटका जितकी रोमहर्षक आहे तितकाच गुरूजींचा तिबेट ते धर्मशाळा हा प्रवास. जवळ असणारे तळे ही प्रेक्षणीय स्थळ आहे. ईशाला सोडून मी परत धर्मशाळेत आलो. सहलीतून कुणाला तरी मध्येच सोडताना फारच जास्त त्रास होतो.
उद्याच्या दिवसाची तयारी करू लागलो. मंडीला जाण्यासाठी धर्मशाळेतून दोन मार्ग आहेत. एक धवलमार्ग जो डोंगरातून जातो तर एक थोडासा लांबचा मार्ग. आम्ही धवलमार्ग निवडला.
     २२ मे २०१९  पालमपूरमार्गे बीर बिलिंग या ठिकाणी आलो. हे जगातील पैराग्लाइडिंगसाठी नावाजलेले ठिकाण आहे. आम्हाला कोणालाच पैराग्लाइडिंग करायचे नसल्याने आम्ही तेथून नवीन होऊ घातलेल्या बरोट या प्रेक्षणीय स्थळी आलो. बरोटच्या चारी बाजूने डोंगर आहेत व मधून वाहणारी नदी.



   हिमालयातील सर्वच नद्यांचे तळ दिसतात, तसाच या ही नदीचा तळ दिसत होता. नदीच्या पाण्याला चांगलाच दाब होता. चित्रात उडणारे कारंजे हे नदीच्या दबाबावर उडवलेले आहे.
त्यावरून नदीच्या दाबाचा अंदाज येऊ शकतो. जवळ मत्स्यशेती केली जाते. नदीवर छोटेखानी धरण बांधलेले आहे. आजचा प्रवास फारच घाटातून होता. म्हणून आम्ही जेवण टाळत होतो. पण बरोटला आल्यावर भेळपुरीच्या गाडीपाशी आमची पावलं आपोआप थबकली. सैंडविच बनवायला सांगितले. सबवे मध्ये विचारतात तसं कुठला पाव घेऊ? कुठली भाजी घालू असले फालतू प्रश्न न विचारता त्याने 'देसी' सैंडविच बनवायला सुरुवात केली. दोन सैंडविच देवून झाल्यावर त्यांच्या लक्षात आलं तिसरं सैंडविच थोडे जास्त जळाल आहे. मग त्यानं काहीही विचार न करता नवीन सैंडविच बनवून आम्हाला दिल. हा या लोकांच्यातला चांगुलपणा आम्हाला पूर्ण सहलीमध्ये दिसून आला.


सैंडविच खावून आम्ही घतासनी या ठिकाणी आलो. बरेच वेळा आम्ही त्यांचा उच्चार कटासन केल्यामुळे तेथील लोकांना आम्हाला कुठे जायचे ते कळतं नव्हत. घतासनीवरुन आम्हाला मंडीला जायची बस मिळाली.



मंडीमघ्ये बघण्यासारखी मंदिरे, घाट आहेत. पण दुसर्‍या दिवशी आम्हाला प्रवासाला किती वेळ लागेल, हे माहीत नसल्यामुळे आम्ही रात्री झोपून, दुसर्‍या दिवशी सकाळी (२३ मे) लगेचच सैंजसाठी प्रस्थान केले. मंडीपासून आम्ही औतला आलो. औत येण्याच्या आधी तीन किमीचा खूप मोठा बोगदा लागतो. औतवरुन आम्ही सैंज या गावी आलो. “द ग्रेट हिमालईन नॅशनल पार्क” ची सुरूवात येथूनच होते. हे ठिकाण अजून पर्यटकांच्या गर्दीपासून वाचलेलं आहे.



येथे ट्रेक करण्यासाठी वेगवेगळे ग्रुप येतात. सहा, दोन आणि एक दिवस असे सोप्यापासून ते अवघड ट्रेक येथे करता येतात. प्रवासात डाव्या हाताला वाहणारी पार्वती (पार्बती) नदी अतिशय नयनरम्य आहे. एकूणच परिसर फारच छान आहे. ज्यांना लोकांच्या कोलाहलापासून लांब जायचे आहे त्यांच्यासाठी हा परिसर म्हणजे स्वर्गच आहे. सैंजवरून जंगलविभागाचे 'रेस्ट हाउस' ६ कि.मी. वर आहे. त्या भागाला रुपासैंज असे म्हणतात. आपल्याकडील ब्रुद्रक सारखा हा प्रकार असावा. काही लोकांनी आम्हाला चालत जाण्याचा सल्ला दिला. तेथे जाण्यासाठी व येण्यासाठी सकाळी दोन आणि संध्याकाळी दोन बस आहेत. इतर वेळेस चालत. देवकृपेने सैंज येथे खाजगी गाड्या आहेत. आम्ही खाजगी गाडीतून विश्राम गृहावर गेलो.
दहा-बारा खोल्यांचे विश्राम गृह, हे सांभाळायला ठेवलेला एक राखणदार आणि आजूबाजूला घनदाट झाडी. मला येथे आल्यावर कळलं, त्या दिवशी तिथे राहणारे माझे एकच कुटुंब आहे. दुसर्‍या राज्यात असतो तर एकटे राहायचा विचार पण नसता केला. पण हिमाचल प्रदेश याबाबत फारच सुरक्षित आहे.
               सामान खोलीवर टाकले, राखणदारांला जेवण करण्यास सांगितले व जवळच असणार्‍या डोंगरावर एक छोटा ट्रेक करण्यासाठी तयार झालो. पार्वती नदीला मिळणारा एक झरा याच डोंगरावर उगम पावतो तिथपर्यंत जाण्याचं ठरवलं. थोडासा पाऊस चालू झाला होता. पावसाचा अजून त्रास होत नव्हता. डोंगर व तिथे असणारे अनेक विविध पक्षी, झाडे, गुलाबांचे विविध प्रकार या सर्वांनी मन एकदम प्रफुल्लित झाले.  डोंगर चढून वर केव्हा आलो हे आम्हाला कळलेच नाही. हिमाचलचा हा वेगळा रंग होता. हिरवी दाट झाडी, रिमझिम येणार पाऊस, पक्ष्याचे व झर्‍याचा आवाज, एक वेगळेच विश्व.




डोंगर उतरून आम्ही परत खोलीवर आलो, राखणदारांनी आम्हाला जेवण वाढले. बिचारा भाजी आणण्यासाठी सैंजला गेला होता. भरपूर जेवण करून आम्ही थोडी विश्रांती घेतली. पाच वाजता परत चहा, बाजूला डोंगर, व त्यावर उतरलेले पांढरे शुभ्र ढग. अद्भुत वातावरण. जगातील सर्व चिंतांपासून दूर.

संध्याकाळच्या वेळेस हिमाचल मधील रुपासैंज हे शेतकर्‍यांचे गाव बघण्याचा योग आला. प्रत्येकांच्या दारा समोर बाग. बागेत सफरचंद, आलूबुखार व गुलाबांचे हजार प्रकार बघायला मिळाले. तेथून आम्ही पार्वती नदीच्या काठावर फिरायला गेलो. नदीला स्वतःची एक लय असते, गती असते. कधी त्या लयीकडे लक्षच गेलं नव्हत. आज त्या लयीत शास्त्रीय संगीतातील सर्व लयीचा प्रत्यय येत होता. थोडावेळ काठावर बसून आम्ही परत खोलीवर आलो.


थंडी चांगलीच जाणवू लागली होती. रात्रीचे जेवण करून आम्ही झोपी गेलो. सकाळी नेहमी प्रमाणे पक्ष्यांच्या आवाजाने जागे झालो. खिडकी उघडून बघितल्यावर धुके, हिम (बर्फ), हिरवे डोंगर व ढग या सर्वांचा निसर्गाच्या कागदावर चाललेला खेळ पाहतच राहिलो. मस्तपैकी चहा पीत, या खेळात होणारे सूर्याचे आगमन बघत बसलो.
 सकाळी (२४ मे)  आठ वाजता आम्ही सैंज सोडलं. सोडताना या ठिकाणाबद्दल मनात एक कायमची जागा मात्र निर्माण झाली.



अनेक वेळा परत येऊ असं ठरवत सैंजचा निरोप घेतला.

No comments:

Post a Comment