Saturday, June 8, 2019

केल्याने देशाटन - हिमाचल प्रदेश -१

सध्या कामानिमित्त पुणे-दिल्लीवारी चालू आहे. दर सोमवारी विमानात बसायचं, काम करायचं, हॉटेलात रहायचं आणि परत शुक्रवारी पुण्यात यायचं हा माझा आठवडाक्रम ( दिनक्रमाच्या धर्तीवर) गेले कित्येक महिने चालू होता/आहे. नेहमीप्रमाणे याही वेळेस मे महिन्यात कुठे तरी फिरायला जायचा बेत आखला होता. दिल्लीपासून जवळच असं एखादं ठिकाण मी शोधत होतो. "हिमाचल प्रदेश" या नावावर मी येऊन स्थिरावलो.
 आमच्या गावाच्या रथाच्या यात्रेत जास्त साखर घातलेला पेढा मिळायचा, मला तो पेढा नेहमीच्या पेढ्यांपेक्षा जास्त आवडायचा. माझी आजी याला 'भिकेचे डोहाळे' म्हणाायची.  मला असेच 'भिकेचे डोहाळे' प्रत्येक सहलीमध्ये लागतात. जसे की घरगुती पद्धतीचं रहाणं (Home stay), फिरायला राज्य परिवहन मंडळाच्या बस व जायला-यायला रेल्वेचा वापर. एक तर ह्यामुळे पैसे वाचतात व तेथील लोक कसे आहेत, कसे राहतात हे जवळून पहायला मिळत. नाही तर आपण प्रवास कशासाठी करतो? पुणे-दिल्लीवारीमुळे वैतागलेल्या माझ्या मनाने 'भिकेचे डोहाळे' पुरवायचेच असा दृढ निश्चय केला होता.
हिमाचल


हिमाचल प्रदेश निवडला पण 'तेथे कुठे?' हा नेहमीचाच प्रश्न. सहसा मी काही परिचित, काही अपरिचित तर काही नव्याने सुरू असणारी प्रेक्षणीय स्थळ एकत्र करून त्याची भेळ करण्याचा प्रयत्न करतो. यामध्ये कुठल्याही एका जिन्नसाचे प्रमाण जास्त झाले तर भेळेची मज्जा निघून जाते, म्हणून नियोजन योग्य प्रकारे करावे लागते.
 सर्वसाधारण हिमाचल प्रदेश चार वेगवेगळ्या भागात विभागता येतो. धऊलधर (धवलधर) विभाग, बियास विभाग, सतलज विभाग आणि आदिवासी विभाग. यामधील सतलज विभागात सिमला येते. तो भाग काही वर्षेपूर्वी बघितला असल्यामुळे तिथे जाण्याचं टाळलं. घरातील मंडळींबरोबर आदिवासी विभागात जाण अवघड असल्यामुळे तो भाग ही रद्द करावा लागला. रहाता राहिले धऊल विभाग आणि बियास विभाग.

या दोन विभागातील काही प्रसिद्ध, अप्रसिद्ध व काही नव्याने होऊ घातलेल्या पर्यटन स्थळांना भेट देण्याच्या सहलीचे नियोजन केले. माझ्या हातात, १८ मे २८ मे असे साधारण दहा दिवस होते. त्यानुसार नियोजन करून, सहलीचा श्रीगणेशा १८ तारखेला केला.
 मी दिल्लीत असल्यामुळे, माझा प्रवास जरी दिल्लीतून सुरू झाला तरी माझ्या घरच्यांनी आधीपासून म्हणजे सोळा तारखेपासून पुण्यातून जम्मूतावीने प्रवास सुरू केला. मी त्यांना दिल्लीत सतरा तारखेला संध्याकाळी भेटलो. माझ्यासाठी सहल सतरा तारखेला सुरू झाली.
 १८ तारखेला, सकाळी सात-आठ वाजता, आम्ही पठाणकोटला पोचलो. नावावरून खूप मोठे स्टेशन असेल असं वाटलं होत. पण स्टेशन तसं फार मोठं नव्हत. गाडीतून उतरल्यावर डाव्या बाजूला एक मार्ग आहे आणि उजव्या बाजूला स्टेशनमधून बाहेर पडण्याचा मार्ग. एक-दोन लोकांना विचारून आम्ही स्टेशनमधून बाहेर आलो. आम्हाला जायचं होतं चुवाडीला. त्यासाठी रिक्षात बसलो, आणि रिक्षाने आम्हाला स्टेशनच्या दुसर्‍याबाजुला आणून सोडलं. जे अंतर आम्ही सहज चालत येऊ शकत होतो. ते रिक्षातून आलो. चला म्हणजे सहलीची खर्‍या 'अर्थाने' सुरुवात झाली.
 चुवाडी हे गाव चंबा पासून पन्नास किलोमीटर अंतरावरील ठिकाण. हे ठिकाण निवडण्यामागे दोन कारण होते. एक म्हणजे हे फारसं प्रसिद्ध नसलेलं ठिकाण, या ठिकाणावरून डलहौसीला जाणारा एक मार्ग आहे. तसेच या ठिकाणाहून एक पाच किलोमीटरचा अतिशय साधा ट्रेक करता येतो. हा ट्रेक आहे, जोट पास (Jot Pass) ते धानीकुंड/धानकुंड (Dainkund Peak). एकूण अंतर ५.२ कि.मी. समुद्रापासून उंची २४५० ते २७५०. म्हणजेच जास्त चढ नसलेला असा हा ट्रेक.
पठानकोटवरून नुरपुरमार्गे चुवाडीला साधारण दहा वाजेपर्यंत पोचलो. दोन दिवसाच्या प्रवासाचा थकवा काढला आणि बाहेर जाण्यास सिद्ध झालो. येथे आम्ही अंशुमन शर्मांच्या घरी राहणार होतो. दोन दिवस आम्ही त्यांचे पाहुणे होतो. घराचा खालचा मजला अंशुमनसाठी आणि वरचा मजला आमच्यासारख्या पाहुण्यांसाठी. अंशुमनचे घर गावापासून थोडे दूर असल्यामुळे येथे एक वेगळ्या प्रकारचे शांत वातावरण होते. चला पहिले काही दिवस तरी हॉटेलपासून मुक्तता.
 प्रवासाचा बेत ठरवताना, बेत (म्हणजे मराठीत प्लॅन) अ , बेत आ आणि बेत ज्ञ असे अनेक बेत ठरवावे लागतात. आज डलहौसी, तर उद्या ट्रेक असा बेत 'अ' ठरला होता. पण अंशुमननी सांगितलं, चम्बां घाटात दरड कोसळली आहे, त्यामुळे तो घाट ५ दिवस बंद आहे.
असो आजचा हा बेत डलहौसी बघण्याचा होता म्हणून आम्ही अंशुमन यांच्या घरातून निघालो. अंशुमन यांनी आम्हाला त्यांच्या घरापासून जवळच असणाऱ्या लाहडू (म्हणजे फक्त १० किमी) या ठिकाणापर्यंत त्यांच्या गाडीने सोडले. गाडीने लाहडूपर्यंत पोहचलो पण तोपर्यंत बस तेथून पुढे निघून गेली होती. अंशुमननी क्षणाचाही न विचार करता, आम्हाला परत गाडीत बसायला सांगितले. पुढे गेलेल्या गाडीचा पाठलाग सुरू झाला. आमची इच्छित गाडी आमच्या अगदी नजरे समोर होती. ती घाटाच्या दुसर्‍या टोकाला असल्यामुळे आमच्यातील अंतर फक्त २० कि.मी. होते.  पुढच्या वीस मिनिटात हिमाचलमधील चित्रविचित्र घाटांच्या डोंगरातून अंशुमन यांनी गाडी पळवत, गाडी उडत नाही म्हणून फक्त मी पळवत असे म्हणालो. खरं तर गाडी उडवतच, आम्हाला वीस मिनिटांत त्यांनी बसपुढे नेऊन उभे केले. आम्हा सर्वांना बसमध्ये बसून देऊन अंशुमनभाऊ परत आपल्या घराकडे निघून गेले. अंशुमनच्या जागी पुणेरी माणूस असता तर!!!! लाहडूपर्यत कसं जायचं यांच्यावर १० मिनिट सुंदर व्याख्यान दिल असत.
डलहौसीकडे जाताना




आमचा पुढचा प्रवास बसने सुरू झाला. वाटेत बसलेले अतिशय रम्य डोंगर, लांबवर दिसणार्‍या धरणाचा पाणीसाठा यामुळे हे वातावरण अतिशय निसर्गरम्य होतेच त्याचबरोबर आजूबाजूच्या माणसांशी संवाद साधणे हे ही मजेशीर होते.









डलहौसी
डलहौसी रस्त्यावरुन
आम्ही साधारण दोन अडीच वाजता डलहौसीला पोहोचलो. सर्वांना भूक लागलेली असल्यामुळे दुपारचे जेवण करून आम्ही डलहौसी बघायला सुरुवात केली. डलहौसी हे डोंगरावर वसलेले, थंड हवेचे ठिकाण. या ठिकाणाची निर्मिती डलहौसीसाठी केली होती असे येथील लोक सांगतात पण स्वतः डलहौसी येथे कधीच रहायला आले नाहीत. सुभाष चौक, गांधी चौक, एक-दोन चर्च अशा प्रेक्षणीय स्थळांचे हे गाव. शहराभोवती असलेल्या गोल रस्त्यावरून कारण नसताना फिरत राहणे हेच डलहौसीचे वैशिष्ट्य. डलहौसी रस्त्यावरून आम्ही फिरायला सुरुवात केली, डोंगरावरून दिसणारे नयनरम्य सृष्टिसौंदर्ये असले तरी आजूबाजूने जाणाऱ्या वाहनामुळे या सृष्टिसौंदर्याला थोडेसे गालबोट लागत होते.

परत येताना
संध्याकाळी डलहौसी बघून आम्ही बनिखेत(Banikhet) म्हणजेच डलहौसीच्या पायथ्याशी असलेल्या गावापाशी आलो. सहा वाजता एक बस चुवाडीला जाणारी होती. बसमध्ये बसून आम्ही चुवाडीला निघालो, दुसऱ्या दिवशी हिमाचलमधील मतदान असल्यामुळे मतदानासाठी प्रशासन काय काय सोय करतात याची माहिती आजूबाजूचे प्रवासी देत होते. काही ठिकाणी मतदान केंद्रावर मतदान अधिकारी तीन ते चार दिवस जातात हे ऐकून मी थक्क झालो.  संध्याकाळी आठ वाजता आम्ही चुवाडीला पोहोचलो. गावातील लाईट गेली असल्यामुळे अंधार पडला होता. अंशुमन यांच्या घराकडे जाताना रस्त्यात अनेक काजवे चमकत होते. आमच्यासारख्या शहरात राहणाऱ्यांना खरोखर चमकणारे काजवे बघून खूप आश्चर्य वाटलं. खूप वाटतं असूनसुद्धा हे दृश्य चित्रांकित करता आलं नाही. जेवण तयार होण्यास वेळ असल्यामुळे आम्ही घराच्या गच्चीत बसून आकाश निरीक्षण करत होतो. आयुष्यात मंगळ लाल दिसतो हे प्रत्यक्षात कधी बघितलेच नव्हते. पण तेथून लालसर दिसणार मंगळ, तेजस्वी शुक्राची चांदणी व पौर्णिमेचा चंद्र हे बघितल्यामुळे हिमाचलमधल्या पृथ्वीवरील सौंदर्याप्रमाणेच अवकाशातील     सौंदर्यायाचाही आनंद घेता आला.

सुर्य नव्हे चंद्र

घरगुती पद्धतीच्या 'खट्टे मीठ्ठे कद्दू' व 'कढी पकोड्या'वर आडवा हात मारून आम्ही झोपी गेलो.

No comments:

Post a Comment