Tuesday, December 12, 2017

थर्टीफस्ट देवीची कहाणी

ऐका थर्टीफस्ट देवी तुमची कहाणी.

आटपाट नगर होतं. तिथं एक आय.टी. कामगार ऐटीत राहत होता. सकाळी उठायचा आॅफिसात जायचा, कोडींग करायचा, नको असलेल्या मिटींगला पण जायचा, वर्षाशेवटी बाॅसची बोलणीपण खायचा. मनातून सतत खट्टू असायचा. पुढं एके दिवशी काय झालं?

त्यांच कंपनीत सुरेश जाॅईन झाला. तोही सकाळी उठायचा, कोडींग करायचा, नको असलेल्या मिटींगला पण जायचा. वर्षाशेवटी बाॅसची बोलणीपण खायचा. पण तो मनातून आनंदी होता. रमेशला हे विशेष वाटलं. आपण असे दुःखी व सुरेश असा सुखी? रमेशने काय केलं? रमेशने एके दिवशी सुरेशला विचारलं "दादा हे असं का? तुम्ही पण आॅफिसात येता मी पण आॅफिसात येतो. तुम्ही पण कोडींग  करता मी पण कोडींग  करतो. तुम्हाला पण बाॅसची बोलणी खावी लागतात मला पण. मग तुम्ही आनंदी कसे व मी दुःखी का?" 

सुरेश काय म्हणाला? ऐका.  “मी थर्टीफस्ट देवीचा  वसा  घेतला आहे. म्हणून मी सतत आनंदी असतो.” "हा वसा  कसा घ्यायचा?" "तुला रे वसा कशाला हवा? उतशील, मातशील, घेतला वसा टाकून देशील.” रमेश म्हणाला, “उतत नाहीं, मातत नाहीं, घेतला वसा टाकीत नाहीं.” “वर्षाखेर येईल, तेव्हां मौन्यानं (मुकाट्यानं) उशिरा उठावं, स्नान न केल तर उत्तम, दुपारचे जेवण व नाष्टा हा एकत्रचं करावं. पुन्हा एकदा निद्रादेवीला आव्हान करावं. संध्याकाळपर्यंत अंथरुणातून उठूच नये. मग पाच मित्रांना घरी बोलवावं. त्यांना खाऊ पिऊ घालावं. रात्री १२ पर्यंत सर्वांनी जागरण करावं. मग एक जानेवारीला संपूर्ण करावं. संपूर्णाला काय करावं? सर्वांना चहा, नाष्टा देऊन बोळवण करावी. मित्राच्या घरी फोन करुन रात्री किती काम केलं हे सांगावं ते शक्य नसेल तर तसा SMS तरी करावा, ते ही शक्य नसेल तर मित्रास तसेच पाठवावे.”

रमेशने वसा घेताला. थर्टीफस्टला पाच मित्रांना बोलावले. त्यांना खाऊ पिऊ घातले. मग गप्पा मारता मारता सर्वांनी स्वःताला होणारा त्रास एकमेकांना सांगितला. रमेशाला दुस-याचा त्रास ऐकून बरे वाटले. अशा रितीने रमेशला थर्टीफस्ट देवी प्रसन्न झाली.

सुरेश, रमेश यांना थर्टीफस्ट देवी प्रसन्न झाली, तशी तुम्हां आम्हां होवों. ही साठां उत्तराची कहाणी, पांचां उत्तरीं सुफळ संपूर्ण.

© कल्याण जोशी

तळटीपः सदर व्रताचे उद्यापन करावयांचे असल्यास चारच मित्रांना बोलवावे. पाचवा मी एका पायावर तयार आहे.