Sunday, June 9, 2019

केल्याने देशाटन - हिमाचल प्रदेश -२


      सकाळी पाच किंवा त्याआधीच एक विशिष्ट आवाज सारखा येऊ लागला. माझ्यासाठी असा आवाज म्हणजे मोबाईलचा गजर असण्याची शक्यता जास्त असते. डोळे उघडून नीट बघितल्यावर लक्षात आलं, हा आवाज मोबाईलचा नसून, एका पक्ष्याचा आहे. एक सारखा सतत येणारा आवाज. सकाळची याहून सुंदर सुरुवात काय असू शकेल?
ट्रेक करता येणार नसल्यामुळे, आम्ही परत डलहौसीच्या बाजूने, मनात योजलेली ठिकाणे बघण्याचे ठरवले. काही नियम हे मोडण्यासाठीच केले जातात, जसे की आपण स्वतः कुठलीही छोटी गाडी भाड्याने घ्यायची नाही, महामंडळ झिंदाबाद. पण डलहौसीच्या जवळची ठिकाणं बसने बघणं शक्य नव्हतं. म्हणून गाडी भाड्याने घेऊन जवळची ठिकाणे बघण्याचे ठरवले. कारमधून आमचा प्रवास सुरु झाला.

पंचफुला म्हणजे इथे अजित सिंग (भगतसिंह यांचे काका) यांचे स्मारक आहे. 'पगडी संभाल जट्टा' अशी घोषणा त्यांनी दिली होती. तसेच येथे पाच वेगवेगळे झरे एकत्र येऊन त्याचा एक मोठा झरा बनतो. तेथून जवळ असलेल्या सातफुला या ठिकाणावर गेलो. पण या ठिकाणी सध्या पाणी नव्हते. येथे असणारे पाणी औषधी आहे असे येथील लोकांचे मत आहे.

          मग आम्ही धानकुंडला गेलो. आमच्या ट्रेक मधले हे ठिकाण. हे ठिकाण या भागातील सर्वात उंच ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहे. डलहौसीवरुन धानकुंडला येण्यासाठी एक डोंगर चढून, एका डोंगरास वळसा घालावा लागतो. डोंगराच्या वर पवणादेवीचे मंदिर आहे. तेथून कैलासाचे दर्शन घेता येते. ज्याला कैलासाला जाणे शक्य नसते, त्याने इथूनच कैलासाचे दर्शन घ्यावे असे येथील लोक सांगतात. आम्ही डोंगर चढायला सुरुवात केली, डोंगराच्या वर एक छत्रीच्या आकाराचे बांधकाम दिसत होते. त्याच्याकडे चालत असताना आम्हाला वाटले, तेच मंदिर असणार. पण जवळ जाऊन बघितल्यावर, तेथे एक सुरजकुमार नावाचा व्यक्ती पाणीपुरीचा स्टॉल लावून  बसला होता. एवढ्या उंचीवर पाणीपुरी मिळणे म्हणजे एक विशेषच. आम्ही तिथे पाणीपुरीचा आस्वाद घेतला. सूरजने आम्हाला सांगितलं, 'मंदिर खूप जवळ आहे. तुम्ही सर्वजण आरामत जाऊ शकता.' आम्ही पाणीपुरी खाऊन परत हळूहळू चालायला सुरुवात केली. एका डोंगराला वळसा घालून दुसरा डोंगर चढलो पण मंदिर काही दिसत नव्हते. पण आम्ही चालत राहिलो, शेवटी एकदाचे मंदिर दिसले. मग चालायला थोडा हुरूप आला. शेवटी कसेबसे आम्ही मंदिरापाशी येऊन पोहचलो. मंदिर लहान आहे. येथील स्थानिक लोकांसाठी हे फार जागृत मंदिर असावे असे वाटते. मंदिराच्या शेजारून कैलास पर्वताचे दर्शन होते. या भागातील हे सर्वात उंच ठिकाण आहे. ह्या डोंगराच्या शेजारच्या डोंगरावर लष्कराची छावणी आहे. तेथे आपल्याला जाता येत नाही. मंदिराच्या भोवतालचे डोंगर व द-या फारच सुंदर होत्या. या ठिकाणावरून दिसणारे दृश्य खरोखरच विहंगम आहे. दर्शन घेऊन, आम्ही डोंगर उतरायला सुरुवात केली. जेवढा त्रास चढताना झाला होता. त्या मानाने फारच लवकर आम्ही डोंगर उतरून पायथ्याशी आलो. येताना परत एकदा पाणीपुरी खाल्ली. आमचा ड्रायव्हर आमची वाट बघत होतो.






त्यानंतर तो आम्हाला 'कालाटॉप' या अभयारण्यात घेऊन गेला. या अभयारण्याचे क्षेत्रफळ  साधारण तीस किलोमीटर वर्ग आहे. मला वैयक्तिक फार काही विशेष वाटलं नाही पण हा ज्याचा त्याचा बघण्याचा दृष्टिकोन. फार वेळ न दवडता आम्ही तिथूनच खजार येथे गेलो. या भागाला मिनी स्वित्झर्लंड असेही म्हणतात. खरोखरच येथे असणारे मैदान त्यावरची हिरवळ, भोवतालची दाट झाडी. यामुळे हे दृश्य हे परदेशातील दृश्याच्या तोडीचेच वाटत होते. गवतावर लोळणे आणि गवतावर बसणे यासारखा आनंद, कितीही मऊ खुर्चीवर बसून आजपर्यंत मला मिळालेला नाही. येथे एक प्राचीन नागमंदिर आहे. सहसा नाग मंदिरे फारशी आढळत नाहीत. नाग मंदिर व मधोमध असणारे तळे स्थानिक लोकांसाठी श्रद्धेचा विषय आहे.







 खजार बघून आम्ही परत डलहौसीला व तेथून बनीखेतला आलो. त्यावेळेस सहा वाजले होते. कालचीच गाडी आज आम्हाला परत मिळेल अशी आमची अपेक्षा होती. पण तिथे गेल्यावर लक्षात आलं की ती खाजगी (प्रायव्हेट) गाडी होती. आज निवडणूक असल्यामुळे, ती गाडी येणार नाही. आता येथून कुठली गाडी आहे? गाडी आहे का नाही? असा प्रश्न मला पडला. पण इथल्या लोकांनी सांगितलं 'सात वाजता अजून एक बस आहे.' आणि नसली तर इथे एखाद्या हॉटेलमध्ये रहायचे असं ठरवले. पण एक तास वाट बघितल्यानंतर, सात वाजता आम्हाला शिमल्याला जाणारी गाडी मिळाली. नऊ सव्वानऊपर्यंत आम्ही चुवाडीला पोहोचलो. अंशुमन आमच्या सर्वांची वाट बघत स्टँडवर उभे होतेच. परत एकदा मस्तपैकी घरगुती जेवणाचा आनंद घेऊन आम्ही झोपी गेलो.

 दुसऱ्या दिवशी आम्ही तिथून धर्मशाळेला जाणार होतो. त्यामुळे सकाळी दहा अकरा वाजता निघायचं असा बेत ठरला होता. पहाटे चार, पाच वाजता परत त्या पक्ष्याने आपला गजर सुरू केला.  यावेळेस तो कुठे आहे? कसा आहे? हे बघण्यासाठी मी पलंगावरून उठलो आणि बाहेर येऊन पाहू लागलो. त्या पक्षाचा येणाऱ्या एकसारखा आवाज.


मनात अनेक विचारांना जाग करत होता. असं म्हणतात “ज्ञानाने शब्द समजतात पण अनुभवांनी अर्थ” याआधी 'कुणी जाल का सांगाल का' ही कविता/गीत शेकडो वेळा ऐकले होते. पण त्या कवितेचा अर्थ, आजच्या अनुभवामुळे अधिकच खोल झाला.

कुणि जाल का, सांगाल का, सुचवाल का ह्या कोकिळा?
रात्री तरी गाऊ नको, खुलवू नको अपुला गळा

 एका विचारातून दुसऱ्या विचारतात मन सहज प्रवेश करत. या गाण्याबद्दल असं म्हणतात की कवी अनिल एकदा कुमारजींच्या घरी राहायला होते. रात्री मुकुलजींनी स्वान्तसुखाय गाणं सुरू केले. शेजारच्या खोलीत झोपलेले अनिल पटकन लिहून गेले “कुणि जाल का, सांगाल का, सुचवाल का ह्या कोकिळा?”. मन या आवाजावरून, कविता आणि तेथून मुकुलजींच गाणं असा प्रवास करत होतं. मुकुलजींचे सकाळचे राग ऐकण्याची इच्छा झाली. लगेच तसे राग लावले. जगभर फिरण्यार्‍या मनाला शांतता लाभली. सकाळची सुरुवात अतिशय सुंदर झाली. अतिशय शांत वातावरण, सकाळचे राग, मुकुलजींचा आवाज, हातात चहाचा कप, अद्भुत निसर्ग. अजून काय पाहिजे? मला सांगा, 'सुख म्हणजे नक्की काय असतं?' असो.

  सकाळी अंघोळ करून आम्ही धर्मशाळेला जाण्यासाठी निघालो. जाताना परत नूरपूर लागलं. धर्मशाळा हे पायथ्याशी असलेल्या गाव. डोंगरमथ्याच्या गावाचे नाव मैक्लोडगंज. धर्मशाळेवरून गाडीने मैक्लोडगंजला गेलो. इथ राहण्याची सोय हॉटेलात असली तरी ते घरगुती पद्धतीचे होते. सामान टाकून दुपारचं जेवण थोडं उशिराच केलं.
गावाच्या मध्यावर असलेल्या मंदिरात मणिचक्र (तिबेटी भाषाः मनीचोसखोर) फिरवण्यात आम्हाला मज्जा आली. मनी म्हणजे चिंतामणी, चोस म्हणजे धर्म व खोर म्हणजे चक्र. धर्मांचे चक्र जे फिरवल्यावर चिंता जातात व मन शांत होते असे चक्र. या चक्रावर 'ॐ मणिपद्मे हुम्' असं लिहलेले असत. याचा उपयोग ध्यानासाठी चांगला होतो असे महायान शाखेची श्रद्धा आहे.  तिथून जवळ असलेला धबधबा बघण्यासाठी आम्ही चालत निघालो.



रस्त्यावरून जाताना दिसणारे निसर्गसौंदर्य अवर्णनीय होते. संध्याकाळी घरच्यांना खरेदी करायची होती. मी मात्र जवळच असलेल्या एका कट्ट्यावर निवांत बसलो. जवळ बसलेल्या बुद्ध भिक्खुंबरोबर संवाद सुरू केला. ते कर्नाटकातून आले होते. गप्पांच्या नादात वेळ कसा गेला हे कळलंच नाही.





जेवण करून झोपण्यासाठी गेलो. सकाळची झालेली संगीतमय सुरुवात, संगीतानेच शेवट करावी असं वाटतं होते. गुलामअलीची 'दोस्त बनकर भी नहीं', मेहंदी हसनयांची 'बात करनी मुझे मुश्किल कभी' गजल ऐकून संगीतमय दिवसाचा शेवट केला..

Saturday, June 8, 2019

केल्याने देशाटन - हिमाचल प्रदेश -१

सध्या कामानिमित्त पुणे-दिल्लीवारी चालू आहे. दर सोमवारी विमानात बसायचं, काम करायचं, हॉटेलात रहायचं आणि परत शुक्रवारी पुण्यात यायचं हा माझा आठवडाक्रम ( दिनक्रमाच्या धर्तीवर) गेले कित्येक महिने चालू होता/आहे. नेहमीप्रमाणे याही वेळेस मे महिन्यात कुठे तरी फिरायला जायचा बेत आखला होता. दिल्लीपासून जवळच असं एखादं ठिकाण मी शोधत होतो. "हिमाचल प्रदेश" या नावावर मी येऊन स्थिरावलो.
 आमच्या गावाच्या रथाच्या यात्रेत जास्त साखर घातलेला पेढा मिळायचा, मला तो पेढा नेहमीच्या पेढ्यांपेक्षा जास्त आवडायचा. माझी आजी याला 'भिकेचे डोहाळे' म्हणाायची.  मला असेच 'भिकेचे डोहाळे' प्रत्येक सहलीमध्ये लागतात. जसे की घरगुती पद्धतीचं रहाणं (Home stay), फिरायला राज्य परिवहन मंडळाच्या बस व जायला-यायला रेल्वेचा वापर. एक तर ह्यामुळे पैसे वाचतात व तेथील लोक कसे आहेत, कसे राहतात हे जवळून पहायला मिळत. नाही तर आपण प्रवास कशासाठी करतो? पुणे-दिल्लीवारीमुळे वैतागलेल्या माझ्या मनाने 'भिकेचे डोहाळे' पुरवायचेच असा दृढ निश्चय केला होता.
हिमाचल


हिमाचल प्रदेश निवडला पण 'तेथे कुठे?' हा नेहमीचाच प्रश्न. सहसा मी काही परिचित, काही अपरिचित तर काही नव्याने सुरू असणारी प्रेक्षणीय स्थळ एकत्र करून त्याची भेळ करण्याचा प्रयत्न करतो. यामध्ये कुठल्याही एका जिन्नसाचे प्रमाण जास्त झाले तर भेळेची मज्जा निघून जाते, म्हणून नियोजन योग्य प्रकारे करावे लागते.
 सर्वसाधारण हिमाचल प्रदेश चार वेगवेगळ्या भागात विभागता येतो. धऊलधर (धवलधर) विभाग, बियास विभाग, सतलज विभाग आणि आदिवासी विभाग. यामधील सतलज विभागात सिमला येते. तो भाग काही वर्षेपूर्वी बघितला असल्यामुळे तिथे जाण्याचं टाळलं. घरातील मंडळींबरोबर आदिवासी विभागात जाण अवघड असल्यामुळे तो भाग ही रद्द करावा लागला. रहाता राहिले धऊल विभाग आणि बियास विभाग.

या दोन विभागातील काही प्रसिद्ध, अप्रसिद्ध व काही नव्याने होऊ घातलेल्या पर्यटन स्थळांना भेट देण्याच्या सहलीचे नियोजन केले. माझ्या हातात, १८ मे २८ मे असे साधारण दहा दिवस होते. त्यानुसार नियोजन करून, सहलीचा श्रीगणेशा १८ तारखेला केला.
 मी दिल्लीत असल्यामुळे, माझा प्रवास जरी दिल्लीतून सुरू झाला तरी माझ्या घरच्यांनी आधीपासून म्हणजे सोळा तारखेपासून पुण्यातून जम्मूतावीने प्रवास सुरू केला. मी त्यांना दिल्लीत सतरा तारखेला संध्याकाळी भेटलो. माझ्यासाठी सहल सतरा तारखेला सुरू झाली.
 १८ तारखेला, सकाळी सात-आठ वाजता, आम्ही पठाणकोटला पोचलो. नावावरून खूप मोठे स्टेशन असेल असं वाटलं होत. पण स्टेशन तसं फार मोठं नव्हत. गाडीतून उतरल्यावर डाव्या बाजूला एक मार्ग आहे आणि उजव्या बाजूला स्टेशनमधून बाहेर पडण्याचा मार्ग. एक-दोन लोकांना विचारून आम्ही स्टेशनमधून बाहेर आलो. आम्हाला जायचं होतं चुवाडीला. त्यासाठी रिक्षात बसलो, आणि रिक्षाने आम्हाला स्टेशनच्या दुसर्‍याबाजुला आणून सोडलं. जे अंतर आम्ही सहज चालत येऊ शकत होतो. ते रिक्षातून आलो. चला म्हणजे सहलीची खर्‍या 'अर्थाने' सुरुवात झाली.
 चुवाडी हे गाव चंबा पासून पन्नास किलोमीटर अंतरावरील ठिकाण. हे ठिकाण निवडण्यामागे दोन कारण होते. एक म्हणजे हे फारसं प्रसिद्ध नसलेलं ठिकाण, या ठिकाणावरून डलहौसीला जाणारा एक मार्ग आहे. तसेच या ठिकाणाहून एक पाच किलोमीटरचा अतिशय साधा ट्रेक करता येतो. हा ट्रेक आहे, जोट पास (Jot Pass) ते धानीकुंड/धानकुंड (Dainkund Peak). एकूण अंतर ५.२ कि.मी. समुद्रापासून उंची २४५० ते २७५०. म्हणजेच जास्त चढ नसलेला असा हा ट्रेक.
पठानकोटवरून नुरपुरमार्गे चुवाडीला साधारण दहा वाजेपर्यंत पोचलो. दोन दिवसाच्या प्रवासाचा थकवा काढला आणि बाहेर जाण्यास सिद्ध झालो. येथे आम्ही अंशुमन शर्मांच्या घरी राहणार होतो. दोन दिवस आम्ही त्यांचे पाहुणे होतो. घराचा खालचा मजला अंशुमनसाठी आणि वरचा मजला आमच्यासारख्या पाहुण्यांसाठी. अंशुमनचे घर गावापासून थोडे दूर असल्यामुळे येथे एक वेगळ्या प्रकारचे शांत वातावरण होते. चला पहिले काही दिवस तरी हॉटेलपासून मुक्तता.
 प्रवासाचा बेत ठरवताना, बेत (म्हणजे मराठीत प्लॅन) अ , बेत आ आणि बेत ज्ञ असे अनेक बेत ठरवावे लागतात. आज डलहौसी, तर उद्या ट्रेक असा बेत 'अ' ठरला होता. पण अंशुमननी सांगितलं, चम्बां घाटात दरड कोसळली आहे, त्यामुळे तो घाट ५ दिवस बंद आहे.
असो आजचा हा बेत डलहौसी बघण्याचा होता म्हणून आम्ही अंशुमन यांच्या घरातून निघालो. अंशुमन यांनी आम्हाला त्यांच्या घरापासून जवळच असणाऱ्या लाहडू (म्हणजे फक्त १० किमी) या ठिकाणापर्यंत त्यांच्या गाडीने सोडले. गाडीने लाहडूपर्यंत पोहचलो पण तोपर्यंत बस तेथून पुढे निघून गेली होती. अंशुमननी क्षणाचाही न विचार करता, आम्हाला परत गाडीत बसायला सांगितले. पुढे गेलेल्या गाडीचा पाठलाग सुरू झाला. आमची इच्छित गाडी आमच्या अगदी नजरे समोर होती. ती घाटाच्या दुसर्‍या टोकाला असल्यामुळे आमच्यातील अंतर फक्त २० कि.मी. होते.  पुढच्या वीस मिनिटात हिमाचलमधील चित्रविचित्र घाटांच्या डोंगरातून अंशुमन यांनी गाडी पळवत, गाडी उडत नाही म्हणून फक्त मी पळवत असे म्हणालो. खरं तर गाडी उडवतच, आम्हाला वीस मिनिटांत त्यांनी बसपुढे नेऊन उभे केले. आम्हा सर्वांना बसमध्ये बसून देऊन अंशुमनभाऊ परत आपल्या घराकडे निघून गेले. अंशुमनच्या जागी पुणेरी माणूस असता तर!!!! लाहडूपर्यत कसं जायचं यांच्यावर १० मिनिट सुंदर व्याख्यान दिल असत.
डलहौसीकडे जाताना




आमचा पुढचा प्रवास बसने सुरू झाला. वाटेत बसलेले अतिशय रम्य डोंगर, लांबवर दिसणार्‍या धरणाचा पाणीसाठा यामुळे हे वातावरण अतिशय निसर्गरम्य होतेच त्याचबरोबर आजूबाजूच्या माणसांशी संवाद साधणे हे ही मजेशीर होते.









डलहौसी
डलहौसी रस्त्यावरुन
आम्ही साधारण दोन अडीच वाजता डलहौसीला पोहोचलो. सर्वांना भूक लागलेली असल्यामुळे दुपारचे जेवण करून आम्ही डलहौसी बघायला सुरुवात केली. डलहौसी हे डोंगरावर वसलेले, थंड हवेचे ठिकाण. या ठिकाणाची निर्मिती डलहौसीसाठी केली होती असे येथील लोक सांगतात पण स्वतः डलहौसी येथे कधीच रहायला आले नाहीत. सुभाष चौक, गांधी चौक, एक-दोन चर्च अशा प्रेक्षणीय स्थळांचे हे गाव. शहराभोवती असलेल्या गोल रस्त्यावरून कारण नसताना फिरत राहणे हेच डलहौसीचे वैशिष्ट्य. डलहौसी रस्त्यावरून आम्ही फिरायला सुरुवात केली, डोंगरावरून दिसणारे नयनरम्य सृष्टिसौंदर्ये असले तरी आजूबाजूने जाणाऱ्या वाहनामुळे या सृष्टिसौंदर्याला थोडेसे गालबोट लागत होते.

परत येताना
संध्याकाळी डलहौसी बघून आम्ही बनिखेत(Banikhet) म्हणजेच डलहौसीच्या पायथ्याशी असलेल्या गावापाशी आलो. सहा वाजता एक बस चुवाडीला जाणारी होती. बसमध्ये बसून आम्ही चुवाडीला निघालो, दुसऱ्या दिवशी हिमाचलमधील मतदान असल्यामुळे मतदानासाठी प्रशासन काय काय सोय करतात याची माहिती आजूबाजूचे प्रवासी देत होते. काही ठिकाणी मतदान केंद्रावर मतदान अधिकारी तीन ते चार दिवस जातात हे ऐकून मी थक्क झालो.  संध्याकाळी आठ वाजता आम्ही चुवाडीला पोहोचलो. गावातील लाईट गेली असल्यामुळे अंधार पडला होता. अंशुमन यांच्या घराकडे जाताना रस्त्यात अनेक काजवे चमकत होते. आमच्यासारख्या शहरात राहणाऱ्यांना खरोखर चमकणारे काजवे बघून खूप आश्चर्य वाटलं. खूप वाटतं असूनसुद्धा हे दृश्य चित्रांकित करता आलं नाही. जेवण तयार होण्यास वेळ असल्यामुळे आम्ही घराच्या गच्चीत बसून आकाश निरीक्षण करत होतो. आयुष्यात मंगळ लाल दिसतो हे प्रत्यक्षात कधी बघितलेच नव्हते. पण तेथून लालसर दिसणार मंगळ, तेजस्वी शुक्राची चांदणी व पौर्णिमेचा चंद्र हे बघितल्यामुळे हिमाचलमधल्या पृथ्वीवरील सौंदर्याप्रमाणेच अवकाशातील     सौंदर्यायाचाही आनंद घेता आला.

सुर्य नव्हे चंद्र

घरगुती पद्धतीच्या 'खट्टे मीठ्ठे कद्दू' व 'कढी पकोड्या'वर आडवा हात मारून आम्ही झोपी गेलो.

Friday, February 8, 2019

शून्य


मी लहान होतो त्या वेळेस
माझ्या आईने विचारला प्रश्न मला एक
एका झाडावर पक्षी पाच
एक मारला बंदुकीने उरले किती सांग
मी माझी लहानशी बोटे आणि त्याहून ही लहानस डोक्यांनी
खूप वेळ विचार करुन
तिला म्हणालो उत्तर आहे चार
तिने मला हसतच जवळ घेतले
बाळ जगात सगळ्याच वजाबाक्या पाच वजा एक चार होत नाहीत
काही वेळेस पाच वजा एक पाचच असते
तर काही वेळेस पाच वजा एक शून्य

आज तू गेल्यावर मला जाणवत
काही वेळेस पाच वजा एक पाचच  तर काही वेळेस पाच वजा एक .....

मूळ पंजाबी कवी अज्ञात
स्वैर भाषांतर : कल्याण

Friday, December 14, 2018

सवाई २०१८- दिवस ३


पं. उल्हास कशाळकर

संख्याशास्त्रात कुठलाही निर्णय घेतल्यावर दोन प्रकारच्या चुका होतात हे मान्य केलेलं आहे. कलाकारांच्या बाबतीत बोलायचं तर त्या चुका खालील प्रकारे असू शकतात.
 १. चांगल्या कलाकारांची कला न ऐकणे
 २. वाईट कलाकारांची कला ऐकणे
ज्या वेळेस आपल्याला कलाकारांबद्दल माहीत असत त्यावेळी दुसरी चुक होतच नाही. वेळ नसणे/दुसरं काम यामुळे पहिली चुक होऊ शकते.
ज्या वेळेस आपल्याला कलाकारांबद्दल माहीत नसतं त्यावेळी दोन्ही चुका होऊ शकतात. वयाच्या पोक्तपणा मुळे म्हणा किंवा गेले ३-४ वर्षातील सवाईच्या अनुभवाने म्हणा, मी सवाईत "अशा" अपरिचित कलाकारांना टाळतो. त्यामुळे 'वाईट कलाकारांची कला ऐकणे' ही चुक होतंच नाही. कधी कधी छान कलाकार हातातून निसटतो. नशीब आपलं.
पं. उल्हास कशाळकरांच्याबाबती म्हणायचं झालं तर पहिल्या प्रकाराचीच चुक होऊ शकते. ती म्हणजे 'चांगल्या कलाकारांची कला न ऐकणे'
काल ती चुक काही झाली नाही. बरोबर योग्य वेळी सवाईच्या मंडपात आलो. तंबोरा व तबला लावताना ऐकणे हे पण त्या गाण ऐकण्या इतकंच महत्त्वाचं असतं. नेहमीप्रमाणे तबल्याला तालयोगी पं. सुरेश तळवळकर. या दोन कलाकाराचं मिश्रण अजबच आहे.
कशाळकरांनी बसंतबहार रागाने सुरुवात केली. एकतर त्या रागाची स्वःताची एक नजाकत आहे. एकमेकांत अडकत जाणारे स्वर साखळीसारखे रसिकांना दाखवता आले तरच तो राग पूर्णपणे दाखवता आला असं मला वाटतं. कशाळकरांनी सुरवातीलाच ती अपेक्षा पूर्ण होणार यांचे संकेत दिले. रागाची सौंदर्यस्थळ दाखवण्यात त्यांची हातोटी आहेच. एकमेकांत अडकत जाणार स्वर म्हणजे एखाद्या रुपवतीने चालताना माग वळून बघावं असं वाटतं होतं. तशाच प्रकारचा अनुभव कशाळकरांनी जागोजागी दिला.
कशाळकरांनी दाखवलेला 'म' त्यांच्या विचाराच्या गहरेपणाची खोली  दाखवत होता. नेहमीप्रमाणे बहारदार ताना या रागाची मजा आणखीन वाढवत होत्या.
तालयोगींची साथ म्हणजे गायकाला व गाण्याला धरुन स्वःताचे वैशिष्टय दाखवणारी. आजकाल साथीचे तबलेवाले स्वःताला एकल तबला वादनासाठी बोलावले आहे अशा थाटात वाजवत असतात. त्यावेळी तालयोगींची साथ ही खर्‍या अर्थाने साथ म्हणून समर्पक वाटते.
त्यानंतर त्यांनी खमाज रागात एक बंदिश सादर केली. एक रसिक म्हणुन मला खमाज हा बसतंबहराच्या पुढे फिक्का वाटला.
एखाद्या वेळेस बंद सभागृहात बसतंबहार नंतर खमाज बराही वाटेल. पण सवाईमध्ये तो राग मात्र थोडा फिक्का वाटला. कशाळकरांनसारख्या ज्येष्ठ व श्रेष्ठ गायकाने हे राग का निवडले, त्यामागे काही तरी विशेष विचार असणारच. असो.
जन्माने पुणेकर असल्यामुळे, सवाईमध्ये शेवटच्या भजनांच्या दोन ओळी झाल्यावर उठून चालत भजन ऐकणे हे आम्ही आमचं कर्तव्य मानतो. पण कशाळकरांनी 'या झोपडीत माझ्या' हे तुकडोजी महाराजाचं भजन सुरु केलं आणि उठून चालायचे विसरूनच गेलो. पूर्ण भजन एका जागेवर बसुन ऐकलं.
एका कार्यक्रमात पूर्ण प्रवेशिकेचे पैसे वसूल.




Thursday, December 6, 2018

तामिळनाडू २०१८ -भाग - ६

१५ तारखेला तंजावर सोडले. तिरची, नमक्कल मार्गे सालेमला (उच्चार सेला) पोहचलो. हे अंतर बरच म्हणजे २१२ कि.मी होतं. सात ते बारा अशा पाच तासात पोहचलो. येरकड हे गाव सालेमपासून ३०-३५ किमी अंतरावर आहे. मी पश्चिम घाटातील अनेक थंड हवेची ठिकाणे पाहिली आहेत, पण हे पूर्व(?)घाटातील थंड हवेचे ठिकाण.
बेंगळुरूपासून जवळ असल्याने तेथील लोकांच्यात हे प्रसिद्ध आहे. पण महाराष्ट्रातील अनेकांना या थंड हवेच्या ठिकाणाबद्दल माहिती नसेल.  फारसे प्रसिद्ध नसलेले पण निसर्ग सौंदर्याने भरलेले असे हे ठिकाण.
गावाच्या मधोमध एक तळ, तामिळनाडू पर्यटन विभागाने छान बोटीची सोय ठेवली आहे. हाॅटेलवर सामान टाकून लगेच तळ्यावर गेलो. छानपैकी नौकाविहार (बोंटीग) केल्यावर जवळच असणारे उद्यान बघितले.

छोटेखानी पण उत्तम व्यवस्थापन असणारे उद्यान. समोरच असण्यार्‍या मत्स्यगृहात गेलो. अतिशय वाईट. बिलकूल जाऊ नये असं वर्णन या मत्स्यगृहाचं करता येईल. येथे अनेक प्रेक्षणीय स्थळे (म्हणजे Points बरं का!!!) आहेत. असल्या(?) स्थळांच्या मागे लागणारा मी नाही. अशा गावात नुसतं भटकत राहीलं तरी एक वेगळे समाधान मिळतं. असेच भटकत आम्ही दोन, चार स्थळं पाहिली.
दुसर्‍या दिवशी सकाळी खोलीच्या सज्जात (बाल्कनीत) ढग. अप्रतिम. मस्तपैकी काॅफी पीत ढग बघत बसणे हा एक छान अनुभव होता.

नाष्टा करुन परत एकदा गावाचा फेरफटका मारला.  “एक चित्र शंभर वाक्यांच्या इतकं असतं” असे म्हणतात, म्हणून पांढ-यावर काळं करण्यापेक्षा पांढ-यावर रंगीत करणारी जास्त छायाचित्र टाकत आहे.












संध्याकाळी सालेमला जायला निघालो व रात्री तिथून पुण्याला यायला निघालो दुसर्‍यां दिवशी पुण्याला पोहचलो.

समारोप

एकंदर ४००० कि.मी. हा प्रवास साधारण १५ दिवसात पूर्ण केला. या सहलीसाठी तिरुपती, पोंडीचेरी, चिदंबरम, तरंगबडी, कुंभकोणम, तंजावर व येरकड हा जास्त चांगला मार्ग आहे.
आमच्या सहलीची सुरवात श्री अरविदो आश्रमांनी केली. मन प्रसन्न व शांत करणारे ठिकाण. तिरुपती म्हणजे हुकुमाचा एक्का. कधीही जावा. तिरची येथील रंगनाथस्वामीचे वैष्णव मंदिर बघितले. जिथे रुढी हजारो वर्षांपासून चालू आहेत. पण स्वामींना रंगीत लुंगी नेसवून ‘बदल’ अनिवार्य आहे हे पण बघितले. कुंभकोणम मधील ऐरावतेश्वर म्हणजे दागिन्यावर केलेली बारीक कलाकुसर. दृष्टिभ्रम करणारी लेणी. वा क्या बात है! पण हे करणारा ही शेवटी कलाकार. प्रत्येक वेळेस उच्चाप्रतीची कला कशी निर्माण होईल? हेच येथील कैलास लेण्याने दाखवले.
तरंगबडीचा किल्ला व समुद्र तसाच पिचावरच्या समुद्रतटिय वनस्पती बघुन आपण निर्सगापुढे किती क्षुद्र आहोत हे दिसतं. नटराजाच्या देवळात भेटणारा वैष्णव 'श्रीनिवास' हा पण आताच्या जगात आहे. याच भान होतं. तंजावरच बहृदेश्वर म्हणजे मागं म्हटल्याप्रमाणे कळस. अशा राजाच्या, स्थापत्यशास्त्रज्ञांच्या समोर आपण किती खुजे आहोत यांचा पुन्हा प्रत्यय येतो. येरकडचं निसर्ग सौंदर्य नक्कीच पहाण्यासारखे आहे. हे सगळे पाहून परत महाराष्ट्रांत यावस वाटतं हे महाराष्ट्रांच “सौंदर्य” आहे.
हा सर्व प्रवास रेल्वे आणि राज्य परिवहन मंडळाच्या बसने केला. भाषेची समस्या सोडून देता येथील माणसांनी खुप मदत केली. गुगल तर रोड सांगेलच पण अनोळखी माणसाला पत्ता विचारण्याची मज्जा काही औरच. असे अनेक प्रसंग या सहलीत आले.
जीवनाचा प्रवास तर असाच चालू राहील. या प्रवासात परत कधी प्रवास केला तर तो प्रवास घेऊन नक्कीच तुमच्या भेटीला परत येईन.

इति लेखनसीमा




Thursday, November 29, 2018

तामिळनाडू २०१८ -भाग - ५

सहलीचा कळस, मंदिराचा कळस, चोल राजवटीचा कळस

१३ नोव्हेंबरला कुंभकोणम सोडलं. तंजावरजवळच होतं. ९,९ः३० ला तंजावरला पोहचलो. हॉटेलवर सामान टाकले व  बृहदेश्वर बघण्यासाठी निघालो. हे मंदिर म्हणजे चोल राजाच्या राजवटीतील सर्व मंदिराचा स्थापत्यांच्या दृष्टीने कळसच आहे.
या मंदिरात मदुराईचे नायक, तंजावरचे मराठे व विजयनगरच्या राज्यांनी थोडी फार भर घातली पण त्यांनी चोला राजाच्या वैशिष्टयात काही बदल केले नाहीत.
हे मंदिर चोला राजा राजा १ (९४७-१०१४) ने बांधले आहे. त्यांने ९८५ ते १०१४ असे तीस वर्ष राज्य केले. याच राजाने चोला राज्याला सुवर्णकाळ दाखवला. हे मंदिर १००३ ते १०१० अशा विक्रमी सात वर्षात बांधले गेले. मंदिराला अनेक वैशिष्ट्ये आहेत. या मंदिराचा कळस म्हणजे कळसच.
या मंदिराला दोन गोपूरे आहेत. पहिले  गोपूर आहे पाच मजली आहे. हे राजा राजा २ यांनी बांधले. आतील गोपूर तीन मजली आहे. हे राजा राजा १ यांनी बांधले. बाहेरील गोपूर मोठे व आतील लहान का? हा प्रश्न पडणे अगदी स्वाभाविक आहे. पण त्या प्रश्नाचे उत्तर तुम्ही शोधण्यात जास्त गंमत आहे.
पहिल्या गोपूरावर अनेक मुर्ती व वेगवेगळे प्रसंग कोरलेले आहेत. शंकर आणि कालीमाता यांच्यातील नृत्यस्पर्धेचे चित्र आहे. ही गोष्ट खरच खूप मनोरंजक आहे. वेळेच्या अभावी ती सांगत नाही.
या गोपूराचा भार खूप जास्त आहे. आणि आधी सांगितल्याप्रमाणे हे सात वर्षात बांधलेलं मंदिर आहे म्हणून मंदिर बांधणाऱ्या स्थापक शास्त्रज्ञांनी हा भार सांभाळण्यासाठी दोन भिंतींचा वापर केलेला आहे. हीच पद्धत मंदिराच्या कळसासाठी पण वापरली आहे.
आपण आत गेल्यावर महा अजस्त्र असा नंदी आहे. त्यांच वजन २५ टन आहे. हा नंदी चोला राजांचा  नसून, तो विजयनगरच्या साम्राज्याने बांधलेला आहे. मंदिराच्या बाहेर असण्या-या नंदीच्या मंडपावर निळ्या रंगाची नक्षी तंजावरच्या भोसल्यांनी काढलेली आहे. सहसा जुन्या चित्रात निळ्यारंगात नक्षी बघायला मिळत नाही.


  हा नंदी एवढा मोठा का? त्यासाठी मंदिराच्या आतील लिंगाचा आकार बघावा लागेल.   शंकरांची पिंड १३ फूट उंच आणि अकरा फूट परिघ असलेली आहे. ही जगातील सर्वात मोठी पूजा  केली जाणारी पिंड आहे. एवढ्या मोठ्या देवासाठी एवढ्या मोठ्या नंदीची गरजच आहे. हो की नाही? मंदिराच्या गाभा-याचा दरवाजा मात्र पिंडीपेक्षा लहान आहे.  मग पिंड आत कशी नेली? का आधी पिंड मग दरवाजा?
मंदिराविषयी सांगण्यासारख्या खूप गोष्टी आहेत पण वेळेअभावी मी त्यातल्या फक्त तीनच अतिशय महत्त्वाच्या गोष्टी सांगणार आहे.

कळस
मंदिराचा कळस म्हणजे मला वाटतं राजाच्या वैज्ञानिक कल्पकतेचा उच्चांक आहे. चोला राजाच्या पद्धतीनुसार कळसाची उंची प्रचंड आहे. जी गोपूरापेक्षा ही जास्त आहे. कळसावर दिसणारा हा घुमट साधारण अठरा टनाचा आहे. प्रश्न हा आहे की अठरा टनाचा हा घुमट चढवला कसा असेल?


त्यासंबंधी दोन शक्यता आहेत. एक तर प्रवणमार्ग किंवा चढण ( मराठीत रॅम्प) बांधायचा. पिरामिडवगैरे साठी हीच पद्धत वापरली जाायची. कळसाची उंची साधारण १०० फूट आहे. त्यासाठी प्रवणमार्ग  ७ कि.मी. लांब बांधावी लागली असेल. दुसरी शक्यता म्हणजे मंदिराच्या चारी बाजूने विटाचे बांधकाम करायचे (थोडे अंतर ठेवून). जशी मंदिराची उंची वाढेल तशी त्या विटाची उंची वाढवायची. विटांची भिंत व मंदिर यामध्ये वाळू भरायची. या पद्धतीत मंदिराच्या लेण्यांवर काम करणा-या कारागिरांसाठी वाळूत उभा राहून काम करणे अतिशय सोपे जाते. हळूहळू मंदिर व विटाच्या भिंतींची उंची वाढवत जायची. ही पद्धत दक्षिणेत मंदिर      बांधणा-यांच्यात जास्त लोकप्रिय होती. मंदिर बांधण्यासाठी लागणारा काळ बघता, दुस-या पद्धतीचा उपयोग झाला असावाअसे वाटते. या विषयातील तज्ञ यावर जास्त प्रकाश टाकू शकतील. पण हा घुमट म्हणजे आपल्या स्थापत्यशास्त्राच्या प्रगतीचे दर्शन घडवणारा आहे.
हा कळस आतून पोकळ आहे असं म्हणतात पण त्यासाठी मंदिराच्या आतून बघावे लागेल. ते शक्य नव्हते.  हा अजस्त्र कळस उभा करण्यासाठी भिंतीचा पाया खुप खोल लागेल. परंतु कमी वेळ असल्यामुळे मंदिर     बांधण्या-यांनी वेगळीच युक्ती वापरली आहे. ती म्हणजे चार ऐवजी आठ भिंती. एका दिशेला एकाऐवजी दोन भिंती बांधल्या व त्यामध्ये थोडी जागा ठेवली. भौतिक शास्त्राच्या नियमाप्रमाणे अशावेळेस  प्रत्येक भिंतींवरचा भार एकदम कमी होतो. गोपूराला पण हीच पद्धत वापरली आहे.
कळसावर कैलासाचे शिल्प कोरले आहे. त्यामुळे मंदिरात शिरताना आपण कैलासात गेल्याचा भास होतो. म्हणजे जिवंतपणी कैलासवासी.

बाहेरील भिंतींवरील लिखाण
सर्वसाधारणपणे आपल्याकडे मंदिर किंवा लेणी केव्हा बांधली यांचा अंदाज करावा लागतो. तो साधारण शतकात असतो. म्हणजे ७व्या शतकातील मंदिर. पण या मंदिराबाबत असं करण्याची गरज नाही. राजा राजाने हे मंदिर केव्हा बांधायला सुरवात केली? केव्हा बांधून झालं? यांची पूर्ण माहिती कोरुन ठेवली आहे. खालील चित्र पहा.
 येथे असे १०००च्या वर परिच्छेद आहेत.
यामध्ये मंदिराचे उत्पन्न, खर्च, ताळेबंद कसा करावा यांची माहिती दिली आहे. या मंदिरासाठी कुणी व किती देणगी दिली हे लिहलेले आहे. यामध्ये अनेक राजवंशीय स्त्रियांचा उल्लेख आहे. राजा राजा १ च्या काळात स्त्रियांना मालमत्ता स्वःताच्या नावाने विकत घेता व देता येत होती. आज पासून १००० वर्षापूर्वी. जरा विचार करा त्यावेळी इतर देशातील स्त्रियांची अवस्था काय होती!
या भिंतीवर कोणते सण, उत्सव साजरे करावेत याबद्दल पण लिहले आहे. भारतीयांमध्ये लिहण्यापेक्षा पाठ करुन गोष्टी पुढच्या पिढीला देण्याची मानसिकता जास्त होती.  तिथे ही उदाहरणे म्हणजे हाताच्या बोटावर (एकाच हाताच्या) मोजण्याइतकीच आहेत.  भारतात माझ्या माहितीप्रमाणे सम्राट आशोकांनतंर राजा राजा१ हा एकमेव राजा होऊन गेला, ज्याने इतक्या बारकाईने लिखाण करुन ठेवले आहे.


इतर वैशिष्ठे

मंदिराच्या मागे गणेशाचे मंदिर आहे. या मंदिरासाठी तंजावरच्या भोसल्यांनी मदत केली होती. या मंदिराच्या भिंतीवर त्याबद्दल माहिती वाचायला मिळती. आणि ती पण मराठीत. हे छायाचित्र पहा. मराठी माणूस कुठं पर्यत पोहोचला होता!



मंदिराच्या दक्षिणेला एक लेणं आहे. त्यांच चित्र खाली देत आहे.

परदेशी पाहुण्याचं चित्र या मंदिरावर कसं याच उत्तर इतिहासाला माहीत नाही. हे लेणे आधीपासून होतं  का नंतर केव्हा बसवलं याच संशोधन होणं गरजेचे आहे.

मंदिराबद्दल सांगण्यासारख्या खुप गोष्टी आहेत जसं चंडिकेश्वर- उपदेवता, शंकर काली नृत्य स्पर्धा, बाहेरील तटबंदी पण वेळेच्या अभावी त्यांची माहिती देत नाही.

१२ः३० पर्यंत मंदिर बघून झाले होते.  त्यानंतर मराठा दरबार, सरस्वती ग्रंथालय बघायला गेलो. येथील सरस्वती ग्रंथालय जगभर प्रसिद्ध आहे. इंग्रजांचे व तंजावरच्या शेवटच्या भोसल्यांचे संबंध बरेच चांगले होते. ज्या वेळेस राज्य खालसा करायची वेळ आली त्यावेळेस भोसल्यांनी इंग्रजांना एक विनंती केली, त्यांनी इंग्रजांना सांगितले की या सरस्वती ग्रंथालयातील एकाही पुस्तकाला इंग्रजांनी हात लावून नये. त्याप्रमाणे इंग्रजांनी त्यांची विनंती मान्य केली व या ग्रंथालयाच्या एकाही पुस्तकाला इंग्रजांनी हात लावला नाही. या ग्रंथालयात आजही अनेक दुर्मिळ पुस्तके आहेत. त्या काळात मोडी भाषेत पत्रव्यवहार चालायचा. ती सर्व कागदपत्रे आज ही जपून ठेवलेली आहेत. मला वाटतं त्यातील कित्येक कागद अजून वाचले पण गेले नसतील. ते वाचले तर मराठा इतिहासातील अनेक गोष्टीवरील पडदा उघडला जाईल. मराठा दरबारांचे नूतनीकरण चालले असल्यामुळे त्या दरबारातील सर्व वस्तू वरती ठेवल्या होत्या. तेथे तंजावर या विषयावर एक माहितीपट दाखवला जातो. पण हा कार्यक्रम पूर्णपणे तामिळ भाषेत होता. त्यामुळे तो काहीच समजला नाही. मला मराठा दरबार, सरस्वती ग्रंथालय याच्याकडून खूप अपेक्षा होत्या. मी माझ्या सहलीतला एक पूर्ण दिवस यासाठी राखून ठेवला होता. पण दोन ते तीन तासात हे सर्व बघून झाले. एकतर हा सर्व भाग उपेक्षित आहे असं मला वाटतं. जेवढे लक्ष या ठिकाणी द्यायला पाहिजे होतं तेवढं लक्ष दिले गेलेले नाही. येथील बृहदेश्वर मंदिर अप्रतिम होतं आणि या मंदिरामुळे येथील माझा एक दिवस अगदी सत्कारणी लागला.
बरेच दिवसापासून पेपर डोसा खाण्याची इच्छा होती म्हणून मागवला. तो हा असा आला.
 

आचा-याला जाऊन बक्षिशी देण्याची इच्छा होती पण नंतर हा डोसा घशातून उतरला नसता म्हणून ती बक्षिशी वेटर (मराठी शब्द?  वाढप्या)मार्फत पाठवली.
दुस-यादिवशी काय बघायचं हेच ठरवत होतो. आयत्यावेळेची बघण्याची ठिकाणे माझ्याकडे होती. कालीमेरे (Calimere) नावाचे एक पक्षी अभयारण्य जवळच होतो. पण त्यावेळेस 'गज' नावाचे वादळ येणार असल्याची पूर्वसूचना मिळाल्यामुळे तो बेत रद्द केला.
१४ नोव्हेंबरला अनाईकराई (Anaikarai) ६० किलोमीटरवर असलेल्या कावेरी नदीवरील हे धरण पहायला गेलो. हा भाग अतिश्य निसर्गरम्य आहे. तेवढ्यासाठी जाऊन बघण्यासारखे  नसला तरी वेळ असल्यास बघण्यासारखे  आहे. विषेश म्हणजे धरणाची भिंत ही वाहतुकीसाठी खुली आहे.
यरकौड (Yercaud) या थंड हवेच्या ठिकाणी जाण्यासाठी १५ नोव्हेंबरला तंजावर सोडले. ते पुढच्या भागात....

Monday, November 26, 2018

तामिळनाडू २०१८ -भाग - ४

गाणारा समुद्र आणि नाचणारा शंकर

१२ नोव्हेंबरला कुंभकोणम सोडलं परत येण्यासाठी. तेथून मयलाधुराई (Mayiladuthurai)  म्हणून जवळच असणा-या गावात गेलो. तेथून तरंगबडीला (Tharangambadi) बस असतात अस कळलं. तरंगबडीची बस मयलाधुराईच्या दुस-या स्थानकावरुन सुटते. ते स्थानक जवळच होते. चालतच त्या बसस्थानकावर गेलो. तेथून कराईकलची बस पकडली. कराईकलला जाणारे दोन मार्ग आहेत. एक तरंगबडी मार्गे तर दुसरा नालादाई(Nalladai) मार्गे. आम्ही पहिला मार्ग निवडला.
तरंगबडीला डच वसाहत होती. १६२० ला डच येथे आले, त्यांनी मदुराईच्या नायकांबरोबर (बहुदा रघुनाथ) करार केला व येथे किल्ला बांधला. त्यावेळेस त्यासाठी रु. ३१११/वर्ष असा करार झाला. ही रक्कम त्याकाळी फारच मोठी होती. त्यामुळे डचांना ८ कि.मी लांबी  ४ कि.मी. रुंदीची जागा मिळाली. त्यांनी तेथे दन्सबोर्ग (Dansborg) नावाचा किल्ला बांधाला.


सोन्याच्या पट्टीवर झालेला करार

डचांचा अंदाज होता, हे क्षेत्र व्यापारासाठी, जहाज वाहतुकीसाठी उपयोगी पडेल. त्यानुसार त्याकाळात अनेक जहाजे, मिशनरी या भागात आले. त्यांची पूर्ण माहिती किल्ल्यात आजसुद्धा पहायला मिळते. खालील फोटोमध्ये त्याकाळात या किल्ल्यावर थांबलेल्या जहाजांची माहिती मिळते.




हा किल्ला पुर्णपणे डच पद्धतीमध्ये बांधला आहे. डचांनी येथे त्याकाळात छापखानापण सुरु केला होता. त्यात तामिळमध्ये बायबल छापले जायचे. हा भारतातील पहिला छापखाना आहे.  किल्ला व वस्तुसंग्रहालय छान आहे.  हळूहळू कोलकत्याचा वापर वाढल्याने हे फार मोठे बंदर म्हणून डचांना विकसित करता आले नाही.  १८४५ मध्ये हा किल्ला डचांनी इंग्रजांना विकला.


तरंगबडी म्हणजे जेथे लाटा गातात ते गाव. आणि खरोखरच येथील लाटा गाणं म्हणत आहेत असं वाटत. समुद्रकाठ फारच छान आहे. मस्तपैकी दोन चार तास बसण्याची (???) इच्छा होती.






पण गाणा-या समुद्रानंतर नाचणारा शंकर बोलवत असल्याने अर्धा तासातच परत निघावे लागले.
तेथून तडक (डायरेक्ट मराठीत) चिदंबरमची गाडी मिळाली. जेवण करुन साधारण १ः३० वाजले होते. १ ते ४ मंदिर बंद असणार म्हणुन जवळच असलेल्या पिचावरम या गावी जायचं ठरवले. पिचावर, समुद्रतटीय वनस्पतीच्या (Mangrove forest) जंगलासाठी प्रसिद्ध आहे. तामिळनाडू पर्यटन विभागाने येथे नावेची(boat) सोय ठेवली आहे. एक,दोन, चार तास अशी नाव आरक्षित करता येते. दोन तासाची नाव आरक्षित करणे फायद्याचे आहे. नावेत बसल्यावर नावाड्याला १०० रुपये देउन नाव जोरात चालवायला सांगा म्हणजे तुम्ही ख-या अर्थांनी समुद्रतटीय वनस्पतीचे जंगल बघू शकता. नाव त्या जंगलामधून जाते. हा चित्तथरारक अनुभव आहे. नेहमीप्रमाणे स्वसंरक्षणांची साधने [स्वसंरक्षक जाकीट (life-jackets)] अद्ययावत नाहीत. त्यामुळे येथे जरा जपूनच प्रवास केलेला बरा. पिचावरमला निरीक्षण मनोरा [यापेक्षा चांगला मराठी शब्द सुचतो आहे का?? वॉच टॉवर]  आहे. त्यावरुन जवळपासचा निसर्ग छान दिसतो. छायाचित्र काढण्यासाठी योग्य असे ठिकाण.






पिचावरमचा मनसोक्त आनंद घेतल्यावर चिंदबरमला परत आलो. वेळ साधारण ५, ५ः३० ची होती. येथील आरती बघायला मिळाली.
शंकराची नटराजाची मूर्ती बघायला मिळेल असं वाटले होतं. पण देवाला घातलेल्या असंख्य दागिन्यामुळे तो नटराज आहे हेच मला कळेना. जवळच उभ्या असलेल्या एका तरुण व्यक्तीला विचारलं "हेच मुख्य मंदिर का?” “हो” त्या व्यक्तीचं उत्तर. त्यांच्याशी बोलता बोलता त्यानं आपल नाव 'श्रीनिवास' सांगितले. श्रीनिवासने मला खुप माहिती दिली. जस की मुख्य मंदिरातील पुजारी स्फटिक लिंगाला अभिषेक घालतो आहे. कधी दूध, मध, दही तर कधी भस्म. श्रीनिवास माहिती सांगत होता. मी अतिशय लक्षपूर्वक ऐकत होतो. स्फटिक मूर्तीला अभिषेक झाला की जवळच असलेल्या विष्णूची आरती सुरु होईल. ती पूर्ण झाल्यावर नंतर थोड्या वेळाने नटराजाची आरती सुरु होईल. मग तो मला विष्णू मंदिरापुढे घेऊन गेला. आरती सुरु झाली, संपली. देवाला नैवेद्यपण झाला. जवळपास माझ्यासारखे सर्वजण विष्णू मंदिरातून नटराज मंदिराकडे फिरुन आरतीची वाट पाहू लागले. पण श्रीनिवास मात्र विष्णूसमोरच उभा होता. थोड्यावेळात विष्णू मंदिराचे दार उघडले, हा दर्शनपण घेऊन आला. तोपर्यंत नटराजाची आरती सुरु झाली नव्हती. श्रीनिवासने परत एकदा विष्णूला नमस्कार केला आणि मंदिराच्या बाहेर पण पडला. थोडंसं विचित्र वाटलं. एखाद्याची श्रद्धा फक्त आणि फक्त विष्णूवरच असू शकते हे समजुन घेण्याएवढा समंजसपणा माझ्यात आला होता. शैव व वैष्णव यांच्यातील वाद बहुतांशी संपला असला तरी असा कधी तरी दिसतो. असो.
 नटराजाची साग्रसंगीत आरती झाली.  शिवाची लिंगाच्या स्वरुपात अनेक मंदिरे आहेत. पण मूर्तीच्या स्वरुपात फारच कमी मंदिरे आहेत. नटराज हे त्यापैकी एक.  आधी सांगितल्याप्रमाणे स्फटिक लिंगाच्या स्वरुपात पण देवाची पुजा होते. ते स्फटिक लिंग आपल्याला सहसा बघायला मिळत नाही. आरतीची वेळ असल्यामुळे ते लिंग पाहण्याचे सौभाग्य आम्हाला मिळाले. आरतीमुळे मन अतिशय प्रसन्न झालं. पण तोपर्यत घड्याळात किती वाजले हे बघायचं राहून गेलं. आणि लक्षात आलं अरे, ७ वाजले. अजून आपल्याला कुभकोणमला परत जायचे आहे. मग बसस्थानकावरून आम्ही परत कुभकोणमला आलो. रात्रीचे १० वाजले होते. उपाहारगृह चालू होती. डोसा खाऊन झोपलो. उद्या आणि परवा आम्ही तंजावरला जाणार होतो. चोलाराजच सर्वात उत्तम मंदिर व मराठा दरबार बघायला. हे सर्व पुढच्या लेखात