Friday, December 14, 2018

सवाई २०१८- दिवस ३


पं. उल्हास कशाळकर

संख्याशास्त्रात कुठलाही निर्णय घेतल्यावर दोन प्रकारच्या चुका होतात हे मान्य केलेलं आहे. कलाकारांच्या बाबतीत बोलायचं तर त्या चुका खालील प्रकारे असू शकतात.
 १. चांगल्या कलाकारांची कला न ऐकणे
 २. वाईट कलाकारांची कला ऐकणे
ज्या वेळेस आपल्याला कलाकारांबद्दल माहीत असत त्यावेळी दुसरी चुक होतच नाही. वेळ नसणे/दुसरं काम यामुळे पहिली चुक होऊ शकते.
ज्या वेळेस आपल्याला कलाकारांबद्दल माहीत नसतं त्यावेळी दोन्ही चुका होऊ शकतात. वयाच्या पोक्तपणा मुळे म्हणा किंवा गेले ३-४ वर्षातील सवाईच्या अनुभवाने म्हणा, मी सवाईत "अशा" अपरिचित कलाकारांना टाळतो. त्यामुळे 'वाईट कलाकारांची कला ऐकणे' ही चुक होतंच नाही. कधी कधी छान कलाकार हातातून निसटतो. नशीब आपलं.
पं. उल्हास कशाळकरांच्याबाबती म्हणायचं झालं तर पहिल्या प्रकाराचीच चुक होऊ शकते. ती म्हणजे 'चांगल्या कलाकारांची कला न ऐकणे'
काल ती चुक काही झाली नाही. बरोबर योग्य वेळी सवाईच्या मंडपात आलो. तंबोरा व तबला लावताना ऐकणे हे पण त्या गाण ऐकण्या इतकंच महत्त्वाचं असतं. नेहमीप्रमाणे तबल्याला तालयोगी पं. सुरेश तळवळकर. या दोन कलाकाराचं मिश्रण अजबच आहे.
कशाळकरांनी बसंतबहार रागाने सुरुवात केली. एकतर त्या रागाची स्वःताची एक नजाकत आहे. एकमेकांत अडकत जाणारे स्वर साखळीसारखे रसिकांना दाखवता आले तरच तो राग पूर्णपणे दाखवता आला असं मला वाटतं. कशाळकरांनी सुरवातीलाच ती अपेक्षा पूर्ण होणार यांचे संकेत दिले. रागाची सौंदर्यस्थळ दाखवण्यात त्यांची हातोटी आहेच. एकमेकांत अडकत जाणार स्वर म्हणजे एखाद्या रुपवतीने चालताना माग वळून बघावं असं वाटतं होतं. तशाच प्रकारचा अनुभव कशाळकरांनी जागोजागी दिला.
कशाळकरांनी दाखवलेला 'म' त्यांच्या विचाराच्या गहरेपणाची खोली  दाखवत होता. नेहमीप्रमाणे बहारदार ताना या रागाची मजा आणखीन वाढवत होत्या.
तालयोगींची साथ म्हणजे गायकाला व गाण्याला धरुन स्वःताचे वैशिष्टय दाखवणारी. आजकाल साथीचे तबलेवाले स्वःताला एकल तबला वादनासाठी बोलावले आहे अशा थाटात वाजवत असतात. त्यावेळी तालयोगींची साथ ही खर्‍या अर्थाने साथ म्हणून समर्पक वाटते.
त्यानंतर त्यांनी खमाज रागात एक बंदिश सादर केली. एक रसिक म्हणुन मला खमाज हा बसतंबहराच्या पुढे फिक्का वाटला.
एखाद्या वेळेस बंद सभागृहात बसतंबहार नंतर खमाज बराही वाटेल. पण सवाईमध्ये तो राग मात्र थोडा फिक्का वाटला. कशाळकरांनसारख्या ज्येष्ठ व श्रेष्ठ गायकाने हे राग का निवडले, त्यामागे काही तरी विशेष विचार असणारच. असो.
जन्माने पुणेकर असल्यामुळे, सवाईमध्ये शेवटच्या भजनांच्या दोन ओळी झाल्यावर उठून चालत भजन ऐकणे हे आम्ही आमचं कर्तव्य मानतो. पण कशाळकरांनी 'या झोपडीत माझ्या' हे तुकडोजी महाराजाचं भजन सुरु केलं आणि उठून चालायचे विसरूनच गेलो. पूर्ण भजन एका जागेवर बसुन ऐकलं.
एका कार्यक्रमात पूर्ण प्रवेशिकेचे पैसे वसूल.




No comments:

Post a Comment