Thursday, November 29, 2018

तामिळनाडू २०१८ -भाग - ५

सहलीचा कळस, मंदिराचा कळस, चोल राजवटीचा कळस

१३ नोव्हेंबरला कुंभकोणम सोडलं. तंजावरजवळच होतं. ९,९ः३० ला तंजावरला पोहचलो. हॉटेलवर सामान टाकले व  बृहदेश्वर बघण्यासाठी निघालो. हे मंदिर म्हणजे चोल राजाच्या राजवटीतील सर्व मंदिराचा स्थापत्यांच्या दृष्टीने कळसच आहे.
या मंदिरात मदुराईचे नायक, तंजावरचे मराठे व विजयनगरच्या राज्यांनी थोडी फार भर घातली पण त्यांनी चोला राजाच्या वैशिष्टयात काही बदल केले नाहीत.
हे मंदिर चोला राजा राजा १ (९४७-१०१४) ने बांधले आहे. त्यांने ९८५ ते १०१४ असे तीस वर्ष राज्य केले. याच राजाने चोला राज्याला सुवर्णकाळ दाखवला. हे मंदिर १००३ ते १०१० अशा विक्रमी सात वर्षात बांधले गेले. मंदिराला अनेक वैशिष्ट्ये आहेत. या मंदिराचा कळस म्हणजे कळसच.
या मंदिराला दोन गोपूरे आहेत. पहिले  गोपूर आहे पाच मजली आहे. हे राजा राजा २ यांनी बांधले. आतील गोपूर तीन मजली आहे. हे राजा राजा १ यांनी बांधले. बाहेरील गोपूर मोठे व आतील लहान का? हा प्रश्न पडणे अगदी स्वाभाविक आहे. पण त्या प्रश्नाचे उत्तर तुम्ही शोधण्यात जास्त गंमत आहे.
पहिल्या गोपूरावर अनेक मुर्ती व वेगवेगळे प्रसंग कोरलेले आहेत. शंकर आणि कालीमाता यांच्यातील नृत्यस्पर्धेचे चित्र आहे. ही गोष्ट खरच खूप मनोरंजक आहे. वेळेच्या अभावी ती सांगत नाही.
या गोपूराचा भार खूप जास्त आहे. आणि आधी सांगितल्याप्रमाणे हे सात वर्षात बांधलेलं मंदिर आहे म्हणून मंदिर बांधणाऱ्या स्थापक शास्त्रज्ञांनी हा भार सांभाळण्यासाठी दोन भिंतींचा वापर केलेला आहे. हीच पद्धत मंदिराच्या कळसासाठी पण वापरली आहे.
आपण आत गेल्यावर महा अजस्त्र असा नंदी आहे. त्यांच वजन २५ टन आहे. हा नंदी चोला राजांचा  नसून, तो विजयनगरच्या साम्राज्याने बांधलेला आहे. मंदिराच्या बाहेर असण्या-या नंदीच्या मंडपावर निळ्या रंगाची नक्षी तंजावरच्या भोसल्यांनी काढलेली आहे. सहसा जुन्या चित्रात निळ्यारंगात नक्षी बघायला मिळत नाही.


  हा नंदी एवढा मोठा का? त्यासाठी मंदिराच्या आतील लिंगाचा आकार बघावा लागेल.   शंकरांची पिंड १३ फूट उंच आणि अकरा फूट परिघ असलेली आहे. ही जगातील सर्वात मोठी पूजा  केली जाणारी पिंड आहे. एवढ्या मोठ्या देवासाठी एवढ्या मोठ्या नंदीची गरजच आहे. हो की नाही? मंदिराच्या गाभा-याचा दरवाजा मात्र पिंडीपेक्षा लहान आहे.  मग पिंड आत कशी नेली? का आधी पिंड मग दरवाजा?
मंदिराविषयी सांगण्यासारख्या खूप गोष्टी आहेत पण वेळेअभावी मी त्यातल्या फक्त तीनच अतिशय महत्त्वाच्या गोष्टी सांगणार आहे.

कळस
मंदिराचा कळस म्हणजे मला वाटतं राजाच्या वैज्ञानिक कल्पकतेचा उच्चांक आहे. चोला राजाच्या पद्धतीनुसार कळसाची उंची प्रचंड आहे. जी गोपूरापेक्षा ही जास्त आहे. कळसावर दिसणारा हा घुमट साधारण अठरा टनाचा आहे. प्रश्न हा आहे की अठरा टनाचा हा घुमट चढवला कसा असेल?


त्यासंबंधी दोन शक्यता आहेत. एक तर प्रवणमार्ग किंवा चढण ( मराठीत रॅम्प) बांधायचा. पिरामिडवगैरे साठी हीच पद्धत वापरली जाायची. कळसाची उंची साधारण १०० फूट आहे. त्यासाठी प्रवणमार्ग  ७ कि.मी. लांब बांधावी लागली असेल. दुसरी शक्यता म्हणजे मंदिराच्या चारी बाजूने विटाचे बांधकाम करायचे (थोडे अंतर ठेवून). जशी मंदिराची उंची वाढेल तशी त्या विटाची उंची वाढवायची. विटांची भिंत व मंदिर यामध्ये वाळू भरायची. या पद्धतीत मंदिराच्या लेण्यांवर काम करणा-या कारागिरांसाठी वाळूत उभा राहून काम करणे अतिशय सोपे जाते. हळूहळू मंदिर व विटाच्या भिंतींची उंची वाढवत जायची. ही पद्धत दक्षिणेत मंदिर      बांधणा-यांच्यात जास्त लोकप्रिय होती. मंदिर बांधण्यासाठी लागणारा काळ बघता, दुस-या पद्धतीचा उपयोग झाला असावाअसे वाटते. या विषयातील तज्ञ यावर जास्त प्रकाश टाकू शकतील. पण हा घुमट म्हणजे आपल्या स्थापत्यशास्त्राच्या प्रगतीचे दर्शन घडवणारा आहे.
हा कळस आतून पोकळ आहे असं म्हणतात पण त्यासाठी मंदिराच्या आतून बघावे लागेल. ते शक्य नव्हते.  हा अजस्त्र कळस उभा करण्यासाठी भिंतीचा पाया खुप खोल लागेल. परंतु कमी वेळ असल्यामुळे मंदिर     बांधण्या-यांनी वेगळीच युक्ती वापरली आहे. ती म्हणजे चार ऐवजी आठ भिंती. एका दिशेला एकाऐवजी दोन भिंती बांधल्या व त्यामध्ये थोडी जागा ठेवली. भौतिक शास्त्राच्या नियमाप्रमाणे अशावेळेस  प्रत्येक भिंतींवरचा भार एकदम कमी होतो. गोपूराला पण हीच पद्धत वापरली आहे.
कळसावर कैलासाचे शिल्प कोरले आहे. त्यामुळे मंदिरात शिरताना आपण कैलासात गेल्याचा भास होतो. म्हणजे जिवंतपणी कैलासवासी.

बाहेरील भिंतींवरील लिखाण
सर्वसाधारणपणे आपल्याकडे मंदिर किंवा लेणी केव्हा बांधली यांचा अंदाज करावा लागतो. तो साधारण शतकात असतो. म्हणजे ७व्या शतकातील मंदिर. पण या मंदिराबाबत असं करण्याची गरज नाही. राजा राजाने हे मंदिर केव्हा बांधायला सुरवात केली? केव्हा बांधून झालं? यांची पूर्ण माहिती कोरुन ठेवली आहे. खालील चित्र पहा.
 येथे असे १०००च्या वर परिच्छेद आहेत.
यामध्ये मंदिराचे उत्पन्न, खर्च, ताळेबंद कसा करावा यांची माहिती दिली आहे. या मंदिरासाठी कुणी व किती देणगी दिली हे लिहलेले आहे. यामध्ये अनेक राजवंशीय स्त्रियांचा उल्लेख आहे. राजा राजा १ च्या काळात स्त्रियांना मालमत्ता स्वःताच्या नावाने विकत घेता व देता येत होती. आज पासून १००० वर्षापूर्वी. जरा विचार करा त्यावेळी इतर देशातील स्त्रियांची अवस्था काय होती!
या भिंतीवर कोणते सण, उत्सव साजरे करावेत याबद्दल पण लिहले आहे. भारतीयांमध्ये लिहण्यापेक्षा पाठ करुन गोष्टी पुढच्या पिढीला देण्याची मानसिकता जास्त होती.  तिथे ही उदाहरणे म्हणजे हाताच्या बोटावर (एकाच हाताच्या) मोजण्याइतकीच आहेत.  भारतात माझ्या माहितीप्रमाणे सम्राट आशोकांनतंर राजा राजा१ हा एकमेव राजा होऊन गेला, ज्याने इतक्या बारकाईने लिखाण करुन ठेवले आहे.


इतर वैशिष्ठे

मंदिराच्या मागे गणेशाचे मंदिर आहे. या मंदिरासाठी तंजावरच्या भोसल्यांनी मदत केली होती. या मंदिराच्या भिंतीवर त्याबद्दल माहिती वाचायला मिळती. आणि ती पण मराठीत. हे छायाचित्र पहा. मराठी माणूस कुठं पर्यत पोहोचला होता!



मंदिराच्या दक्षिणेला एक लेणं आहे. त्यांच चित्र खाली देत आहे.

परदेशी पाहुण्याचं चित्र या मंदिरावर कसं याच उत्तर इतिहासाला माहीत नाही. हे लेणे आधीपासून होतं  का नंतर केव्हा बसवलं याच संशोधन होणं गरजेचे आहे.

मंदिराबद्दल सांगण्यासारख्या खुप गोष्टी आहेत जसं चंडिकेश्वर- उपदेवता, शंकर काली नृत्य स्पर्धा, बाहेरील तटबंदी पण वेळेच्या अभावी त्यांची माहिती देत नाही.

१२ः३० पर्यंत मंदिर बघून झाले होते.  त्यानंतर मराठा दरबार, सरस्वती ग्रंथालय बघायला गेलो. येथील सरस्वती ग्रंथालय जगभर प्रसिद्ध आहे. इंग्रजांचे व तंजावरच्या शेवटच्या भोसल्यांचे संबंध बरेच चांगले होते. ज्या वेळेस राज्य खालसा करायची वेळ आली त्यावेळेस भोसल्यांनी इंग्रजांना एक विनंती केली, त्यांनी इंग्रजांना सांगितले की या सरस्वती ग्रंथालयातील एकाही पुस्तकाला इंग्रजांनी हात लावून नये. त्याप्रमाणे इंग्रजांनी त्यांची विनंती मान्य केली व या ग्रंथालयाच्या एकाही पुस्तकाला इंग्रजांनी हात लावला नाही. या ग्रंथालयात आजही अनेक दुर्मिळ पुस्तके आहेत. त्या काळात मोडी भाषेत पत्रव्यवहार चालायचा. ती सर्व कागदपत्रे आज ही जपून ठेवलेली आहेत. मला वाटतं त्यातील कित्येक कागद अजून वाचले पण गेले नसतील. ते वाचले तर मराठा इतिहासातील अनेक गोष्टीवरील पडदा उघडला जाईल. मराठा दरबारांचे नूतनीकरण चालले असल्यामुळे त्या दरबारातील सर्व वस्तू वरती ठेवल्या होत्या. तेथे तंजावर या विषयावर एक माहितीपट दाखवला जातो. पण हा कार्यक्रम पूर्णपणे तामिळ भाषेत होता. त्यामुळे तो काहीच समजला नाही. मला मराठा दरबार, सरस्वती ग्रंथालय याच्याकडून खूप अपेक्षा होत्या. मी माझ्या सहलीतला एक पूर्ण दिवस यासाठी राखून ठेवला होता. पण दोन ते तीन तासात हे सर्व बघून झाले. एकतर हा सर्व भाग उपेक्षित आहे असं मला वाटतं. जेवढे लक्ष या ठिकाणी द्यायला पाहिजे होतं तेवढं लक्ष दिले गेलेले नाही. येथील बृहदेश्वर मंदिर अप्रतिम होतं आणि या मंदिरामुळे येथील माझा एक दिवस अगदी सत्कारणी लागला.
बरेच दिवसापासून पेपर डोसा खाण्याची इच्छा होती म्हणून मागवला. तो हा असा आला.
 

आचा-याला जाऊन बक्षिशी देण्याची इच्छा होती पण नंतर हा डोसा घशातून उतरला नसता म्हणून ती बक्षिशी वेटर (मराठी शब्द?  वाढप्या)मार्फत पाठवली.
दुस-यादिवशी काय बघायचं हेच ठरवत होतो. आयत्यावेळेची बघण्याची ठिकाणे माझ्याकडे होती. कालीमेरे (Calimere) नावाचे एक पक्षी अभयारण्य जवळच होतो. पण त्यावेळेस 'गज' नावाचे वादळ येणार असल्याची पूर्वसूचना मिळाल्यामुळे तो बेत रद्द केला.
१४ नोव्हेंबरला अनाईकराई (Anaikarai) ६० किलोमीटरवर असलेल्या कावेरी नदीवरील हे धरण पहायला गेलो. हा भाग अतिश्य निसर्गरम्य आहे. तेवढ्यासाठी जाऊन बघण्यासारखे  नसला तरी वेळ असल्यास बघण्यासारखे  आहे. विषेश म्हणजे धरणाची भिंत ही वाहतुकीसाठी खुली आहे.
यरकौड (Yercaud) या थंड हवेच्या ठिकाणी जाण्यासाठी १५ नोव्हेंबरला तंजावर सोडले. ते पुढच्या भागात....

No comments:

Post a Comment