Tuesday, November 20, 2018

तामिळनाडू २०१८ -भाग -१

Don't follow my path follow my direction.
असं कुणीतरी म्हटलेलं आहे. आता हे कुणीतरी म्हणजे एखाद्या वेळेस मीच असू शकतो. ब्लॉगची सुरुवात इंग्लिश मध्ये केल्यावर वाचण्याची शक्यता जास्त असते म्हणून मी सुरुवातीला इंग्लिश वाक्य  टाकलं.
साधारण तीन महिन्यापूर्वी मला तिरुपतीच्या सुप्रभातच्या दर्शनाची सोडत (म्हणजेच मराठीतली लॉटरी) लागली.
आणि मग सहलीचे नियोजन सुरू झाले. तिरुपतीच्या दर्शनाची वेळ निश्चित असल्यामुळे बाकीच्या गोष्टी त्यानुसार जुळवून घ्याव्या लागल्या. त्यामुळे मी जसा प्रवास केला तसा करु नका, शेवटी मी योग्य असा प्रवासाचा मार्ग देणार आहे.  म्हणूनच Don't follow my path follow my direction.

सहलीची सुरुवात पुदुचेरीने केली.  पुदुचेरीची गाडी पुण्याहून रात्री बारा वाजता होती (४ नोव्हेंबर २०१८). नेहमीप्रमाणे  गाडीत पत्त्यांचे डाव झाले. गाडी व स्टेशने बरीच स्वच्छ होती.  प्रवास करत सकाळी साडेआठ वाजता (६ नोव्हेंबर २०१८) पुदुचेरी येथे पोहचलो. रेल्वेस्टेशनापासून श्री अरविंदो आश्रम साधारण एक किलोमीटरवर आहे.  सर्व सामान घेऊन आम्ही श्री अरविंदो  आश्रमात पोहोचलो. आश्रमाच्या समोरच समुद्र असल्यामुळे सर्व सामान खोलीत टाकून, आम्ही पहिल्यांदा समुद्रस्नानासाठी गेलो.  दोन-तीन तास मस्तपैकी समुद्रात मनसोक्त खेळल्यानंतर खोलीवर येऊन आंघोळ केली. समुद्रकिनारा आपल्यापेक्षा (म्हणजेच कोकण किना-यापेक्षा) खूपच स्वच्छ आहे पण समुद्र थोडासा उथळ असल्यामुळे समुद्रात जास्त आत जाता आले नाही. आम्ही आश्रमात जाण्यासाठी तयार झालो.

आधी पोटाबा आणि मग विठोबा या प्रमाणे येथे जवळच असलेल्या उपहारगृहात (A2B) जेवण-खाण करून मग दर्शनासाठी आश्रमात निघालो. आश्रमाच्या खोल्या  घेतल्यामुळे त्या आश्रमाच्या जवळच होत्या.  चालतच  श्री अरविंदो आश्रमात गेलो. जवळपास पन्नास ते साठ माणसे समाधी जवळ होती, पण तरीही असलेली शांतता बघून मन आध्यात्मिक वातावरणात बुडून गेल. खरं तर "समाधी शांतता"  (“स्मशान शांतता” च्या धर्तीवर) असा मराठीत शब्द असता तर तो वापरला असता.   या शांततेसाठी मला दुसरा चांगला शब्द सुचत नाही. समाधीजवळ १०-१५ मिनिटं बसलो, पण मनाला जी शांतता मिळाली ती शब्दात काही वर्णन करता येत नाही. आश्रमातून बाहेर आल्यावर २-४ मिनिट कुणीच कुणाशी बोलले नाही. अगदी परत परत घेण्यासारखा अनुभव.

येथे जवळच एक अतिशय सुंदर असे गणपतीचे मंदिर आहे.  मंदिरापाशी गेल्यावर लक्षात आलं की मंदिर दुपारी १ ते ४ बंद असतं. पुण्यात राहत असल्यामुळे या गोष्टीच फारस विशेष वाटलं नाही.
आधी झालेली पोटाची मनसोक्त पूजा व नंतरची मनाची पूजा यामुळे आम्ही सर्व भारावून गेलो. लगेच काही बघण्यासारखे नसल्याने  सर्वांनी खोलीवर जाऊन ध्यानमग्न अवस्थेत योगीक निद्रा घेतली काही लोक याला झोपणे असंही म्हणतात. 
संध्याकाळी विनायक मंदिर बघून,  आम्ही पुळणीवर म्हणजेच ज्याला आपण मराठीत बीच म्हणतो तेथे फिरायला गेलो. जवळच असलेले फ्रेंच मेमोरियल पाहिले व किनाऱ्यावर संध्याकाळपर्यंत भटकत राहिलो. 
विनायक मंदिरात छतावर काढलेले चित्र




दुस-या दिवशी सकाळी लवकर उठून ओरोविलला रिक्षाने गेलो.  ओरोविल शहरापासून बारा किलोमीटरवर  आहे.  ओरोविलला उषानगरीपण म्हणतात. पण येथे  ओरोविल याच नावाने जास्त प्रसिध्द आहे. या शहराची स्थापना मीरा रिचर्ड  (म्हणजेच "मां") यांनी १९६८ साली केली. मां या श्री योगी अरविंदाच्या इतक्याच आध्यात्मिक उंचीवर पोहचलेल्या योगी स्त्री होत्या.  ओरोविल येथे सर्व स्त्री-पुरुष, सर्व जाती, राजनैतीक विचारसरणी व राष्ट्रीयता याला काहीच महत्व नाही. हे मानवतेचे गाव आहे.
येथे ध्यानासाठी मातृमंदिर आहे. मातृमंदिराच्या आत जाण्यासाठी पास एक-दोन दिवस आधीच घ्यावा लागतो.  ही जागा "प्रशांत क्षेत्र" म्हणून ओळखली जाते. मातृमंदिराला बारा पाकळ्या आहेत. भविष्यात आजूबाजूला झरे, बाग करण्याचा विचार आहे.  मातृमंदिराकडे जाताना मार्गात असलेल्या पाट्या अप्रतिम होत्या. 
मातृमंदिर

'मां'नी काढलेली काही चित्रे सुध्दा जवळाच्या दालनात लावलेली आहेत.  'मां'नी 'योगी व सर्वसामान्य माणसाचा मोक्षापर्यंत जाण्याचा मार्ग' हे चित्र अप्रतिम.

ओरोविल बघून परत खोलीवर आलो. येताना पुदुचेरी वस्तुसंग्रहालय बघितले.  संग्रहालय छान आहे. 
संध्याकाळचा वेळ रिकामा होता. गावातच असलेली बाग बघण्यासाठी गेलो. बागेची जागा आणि असलेल्या सुविधा छान आहे पण बाग पूर्णपणे दुर्लक्षित असल्याने तिला 'दुर्लक्षित बाग' असेही म्हणता येईल. बागेतील  मत्स्यगृह म्हणजे अॅक्वॅरियम फक्त चांगले आहे.
आठ नोव्हेंबरला सकाळी पुदुचेरी सोडले. पुदुचेरीवरून कांचीपुरम मार्गे तिरुपतीला पोचतो.
                            

 तिरुपतीला पोहोचण्यास साधारण संध्याकाळचे साडेपाच वाजले होते.  खोली आधीच आरक्षित  केलेली  होती. रात्री साडेबारा एक वाजता उठून अंघोळ करून आम्ही सुप्रभातमच्या रांगेत उभा राहिलो.  देवळापाशी पोहोचेपर्यंत तीन-साडेतीन वाजले होते. देवाचे दार ब्रह्ममुहूर्तावर, आपल्यासमोर उघडल्यानंतर सुप्रभातम् म्हणून देवाला उठवतात  आणि आलेल्या सर्व भक्तगणांना देवाचे दर्शन घेण्यासाठी गाभार्‍यापर्यंत जाऊ देतात. या वेळेस बालाजीच्या अंगावर फक्त उत्तरीय (एकच वस्त्र) असल्यामुळे बालाजीची शाळीग्रामाची मूर्ती बघण्याचे सौभाग्य फक्त आणि फक्त सुप्रभातमच्या वेळेस मिळत. हे दर्शन अतिशय विलोभनीय असतं. हे दर्शन घेऊन आम्ही तिथून बाहेर पडलो बाहेर येताना एक छोटा लाडू प्रसाद दिला जातो. त्यानंतर अकरा वाजता नेहमीचे दर्शन घेतले. त्या दर्शनाला ह्या वेळेस फार काही उशीर लागला नाही. साडेबारा-एक पर्यंत आमचे दर्शन झालं. प्रसाद घेऊन आम्ही खोलीवर दोन वाजेपर्यत पोहचलो. 
तिरुमलावरुन आम्ही संध्याकाळी तिरुपतीला आलो. तिरुपतीहून घरातील बाकीची मंडळी परत पुण्याला आली. आम्ही तिकडून रेणुगुंटाला आलो व तिरुचीनापल्लीला (तिरचीला) जाणा-या रेल्वेत बसलो. सकाळी सात वाजता तिरचीला पोचलो. या जंक्शनवरुन 3 स्टेशन पुढे असलेल्या श्रीरंगम् या गावी गेलो. श्रीरंगम् हे गाव म्हणजे दोन नद्यांच्या मधल्या जमिनीवर (बेटावर) वसलेलं गाव. 

राहायची सोय आधीच केली असल्यामुळे आम्ही तेथे पोचलो. सकाळी आंघोळ करुन आम्ही दर्शनासाठी निघालो. येथे 'रंगनाथस्वामी ' यांचे मंदिर आहे. या मंदिरात विष्णू शेषावर पहुडलेला आहे. हे जगातील पूजाअर्चा चालू असलेले सर्वात  मोठे मंदिर आहे. या मंदिराबाबत पुढच्या लेखांत.

No comments:

Post a Comment