Thursday, November 22, 2018

तामिळनाडू २०१८ -भाग -२

रंगनाथस्वामीमंदिराची माहिती जरा सविस्तर देत आहे.

पौराणिक माहिती
श्रीरामांच्या राज्याभिषेकाला बिभीषणापण आले होते. त्यांना आपल्या जवळची विष्णूची मूर्ती रामाने देऊ केली. ती मूर्ती घेऊन ते श्रीलंकेकडे निघाले असताना, श्रीरंगम् येथे थांबले. काही कारणाने ही मूर्ती इथेच थांबली. त्या मूर्तीला कुणालाही उचलता येईल. बिभीषणांना विष्णूने दृष्टांत दिला, मी कायमच तुझ्या राजधानीकडे म्हणजे दक्षिणेकडे पाहत राहीन, मला कावेरीच्या काठावर राहू दे. त्यामुळे मंदिर दक्षिणाभिमुख आहे.

वैष्णव संप्रदायात विष्णूच्या १०८ मंदिरांना अनन्य साधारण महत्त्व आहे. त्यापैकी १०५ मंदिरे भारतात आहेत. एक मंदिर नेपाळमध्ये असून, राहिलेली दोन मंदिरे ही पृथ्वीच्या बाहेर आहेत असे मानले जाते. त्यापैकी एकाला क्षीरसागर म्हणजे दुधाचा सागर दुसरे परमपदम म्हणजेच वैकुंठ असे म्हणतात. या सर्व मंदिरांमध्ये जे मंदिर 'आदी' मंदिर म्हणजेच मुख्य मंदिर आहे, ते म्हणजे हे  रंगनाथस्वामी मंदिर. त्यामुळे या मंदिराला वैष्णवांच्या दृष्टीने अनन्यसाधारण महत्त्व आहे. या मंदिराचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे इथे असलेले विश्वकसेनाचे स्वतंत्र मंदिर. विश्वकसेना हा विष्णूचा मुख्य सेनापती आहे. मुख्य उत्सवाच्या एक दिवस आधी विश्वकसेना पूर्ण गावात फिरतातवाटेत असणाऱ्या सर्व दुष्ट वाईट शक्तींचा नाश करतात मुख्यमुर्तीसाठी रस्त्या सुरक्षित  होतो, असा येथील लोकांचा समज आहे. आणि उत्सवाच्या दिवशी हा विश्वकसेना संपूर्ण जगावर विष्णूच्या नावाने राज्य करतो. विश्वकसेनासाठी (उपदेवता) स्वतंत्र मंदिर हे चोला राजाच्या मंदिर बांधण्यातील एक वैशिष्टय आहे.

ऐतिहासिक माहिती
चोला राजाराजाराजा दोन (११४६- ११७३) ला दृष्टांत झाला व त्याप्रमाणे त्याने ह्या जागेवर खणून पाहता त्याला विष्णूची मूर्ती सापडली. त्याने येथे विष्णूचे मंदिर बांधले. साधारण हा  आकराशे ते बाराशेच्या आसपासचा काळ असावा. या नंतरच्या काळात मदुराईचा नायक, सुंदर पांड्या यांने या मंदिरासाठी 'गजकतुलावारा' केली. 'गजकतुलावारा' याचा अर्थ आपले व एक हत्तीच्या वजनाइतके सोन्या-चांदीचे दान मंदिरासाठी करायचे. त्यासाठी त्याने दोन नावांचा(boats) वापर केला. ती गोष्ट मोठी मनोरंजक व वैज्ञानिक आहे. गजकतुलावारा केल्यामुळे सुंदर पांड्याला हेमचंद्रा असेही म्हणू लागले. हेमचंद्रा याचा अर्थ मंदिरावर सोन चढवणारा. नंतरच्या काळात येथे अनेक मुसलमान राजांनी आक्रमण केली. त्यामधील एक दिल्लीचा सुलतान मलिक काफुर(?-१३१६). याने या देवळावर आक्रमण करुन येथील खजिना व त्याचबरोबर विष्णूची मूर्तीही पळवून नेली. ही मूर्ती त्याची मुलगी सुलतानी खेळण्यातील बाहुलीप्रमाणे वापरायची. या बाहुलीसाठी तिने कपडेही शिवून घेतले होते. ती बाहुली सतत तिच्या जवळ असायची. येथील लोकांनी राजाची मर्जी सांभाळून (नृत्य,कला दाखवून) त्याच्याकडून ती मूर्ती परत मागून घेतली. ही मूर्ती घेऊन ते श्रीरंगमला परत येत होतो. आपल्याकडील मूर्ती नाही हे सुलतानीला समजल्यावर ती तडकश्रीरंगम्ला आली. पण तोपर्यंत  मूर्ती तेथे आली नव्हती. हे पाहून तिने मंदिरातच आपले प्राण अर्पण केलेमुख्य पुजाऱ्याच्या स्वप्नात जाऊन विष्णूने सांगितले की ती पण माझी भक्त आहे आणि तिचा योग्य तो सन्मान केला जावा. त्यावेळेस पासून तिच्यासाठी मंदिराच्या आवारातच एक भिंत तयार करण्यात आली आजसुद्धा विष्णूला दाल (दाळ), रोटीचा प्रसाद दाखवला जातो. तसेच सकाळच्या वेळेस विष्णूला रंगीत लुंगीही नेसवली जाते. (या कथेबद्दल अनेक मते कथा आहेत). यानंतर विजयनगरच्या राजाने या मंदिराला विशेष अर्थसाहाय्य करून मंदिराचा फार मोठ्या प्रमाणात कायाकल्प केला. मंदिरातील शेवटच्या गोपूराचे बांधकाम अगदी अलीकडे म्हणजे १९८७ पर्यंत होत होते.

मंदिराची माहिती
आधी सांगितल्याप्रमाणे हे जगातील (पूजा केले जाणारे) सर्वात मोठे मंदिर आहे. मंदिर १५६ एकरावर पसरलेले आहे. साधारण १० किक्रेटच्या मैदाना इतके. या मंदिराला २१ गोपूर आहेत. त्यातील एक गोपूर २३७ फूट उंचीचे आहे




चोला नंतरच्या काळात  मंदिरांच्या गोपूरांची उंची ही मंदिराच्या कळसापेक्षा जास्त ठेवण्याची प्रथा रुढ झाली. सदर मंदिराचा विस्तार नंतरच्याच काळात जास्त झाला असल्याने, गोपूराची उंची जास्त आहे. दक्षिणेकडे मंदिराच्या कळसाला विमान असे म्हटले जाते. या कळसाला नाव देण्याचीही पद्धत आहे. जसं तिरुपतीच्या कळसाला आनंदनिलया किंवा कांचीपुरमच्या कळसाला पुण्याकोटी म्हणतात. तर या मंदिराच्या कळसाला प्रणवकार असे म्हणतात.
मघाशी सांगितल्याप्रमाणे विष्णूची महत्त्वाची १०८ मंदिरे आहेतत्यातील एक म्हणजे परमपदम(वैकुंठ).  या वैकुंठाला जाण्याचा एक मार्ग या मंदिरातून आहे.
मंदिराच्या मागच्या बाजूला एक सजवलेला  दरवाजा   त्या दरवाज्यावर असलेल्या दोन पाली आणि दारासमोर जमिनीवर केलेली पाच बीळे. या पाच बीळांत पाच बोटे घालून, पालीकडं बघत देवाला वैकुंठाचे दार उघडण्याची विनंती करणारे भाविक आज पण तुम्ही पाहू शकता. वैकुंठ एकादशीला या दरवाजातून जो जातो तो वैकुंठाला पोहोचतो अशी मान्यता आहे.

  पाच बीळे पाली या प्रतीकं असावीत. जो व्यक्ती आपल्या पंचेंद्रियांना काबूत करतो देवाच्या पायापाशी पालीप्रमाणे घट्ट धरुन बसतो. तो जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून सुटका करुन वैकुंठाला पोहचतो.
  मंदिराबद्दल अजूनही खूप माहिती आहे. जसे की रामानुजन, धन्वंतरी, सहस्त्र खांभाचे मंदिर , हग्रीव. पण ती माहिती लिहल्यास वाचकांना कंटाळा येईल. म्हणून ती माहिती देत नाही. कुणी हे मंदिर बघण्यासाठी जाणार असेल किंवा ही माहिती पाहिजे असल्यास मला सांगा.

मंदिर बघण्यात जवळजवळ दोन, तीन तास वेळ गेला. मंदिरापासून चेटराम (Chatram) बसस्थानकावर गेलो. तेथुन कालानाई (Kallanai) धरण बघण्यासाठी गेलो. या धरणाचे वैशिष्ट म्हणजे, हे चोला राजा करीकलन यांनी इसवीसन २०० व्या शतकात बांधले होते. म्हणजे आजपासून जवळजवळ आठशे वर्षांपूर्वी. धरणाची लांबी १००० फूट असून  उंची ६५ फूट होती. या धरणामुळे आजूबाजूच्या ७०००० एकर जमिनीला पाण्याचा पुरवठा मिळाल होता


    

















चोला राजे हे  शेतीला प्रोत्साहन देणारे होते. इंग्रजांच्या काळात याच मॉडेलचा वापर करून या धरणाची उंची दोन फूटाने वाढवण्यात आली. पूर्वीची उंची ६५ फूट होती ती आता ६७फूट आहे. या धरणाजवळ आजही तुम्ही सर अर्थर कॉटन यांचा पुतळा बघू शकता. राजा करीकलन अश्वारुढपुतळा बागेत बसवला आहे. पण हे धरण राजा करीकलन यांनी बांधले होते, असा नामोल्लेख पण कुठे नव्हता. कित्येक स्थानिक पर्यटकांचा समज असा होता की हे धरण  सर अर्थर कॉटन यांनी बांधलं. मला वाटतं हीच आपली शोकांतिका आहे. असो.






















हे धरण बघून आम्ही परत चेटराम बसस्थानकावर आलो. येथून  जवळच 'रॉक फोर्ट' (दगडावरील) गणपतीचे मंदिर आहे. मंदिरात जाण्यासाठी ३५०-४०० पायर्‍या आहेत


मंदिराच्या वर गेलं की पूर्ण तिरची आणि श्रीरंगम् शहराचे विहंगम दृश्य दिसतं



या मंदिराच्या गणपतीची आख्यायिका गोकर्ण महाबळेश्वरशी साधर्म्य सांगणारी आहे
श्रीरंगस्वामी यांची मूर्ती, ज्यावेळेस विभीषण श्रीलंकेत घेऊन चालले होते. त्यावेळेस ते संध्याकाळी स्नानसंध्या करण्यासाठी कावेरीच्या काठावर थांबले. जवळच असलेल्या गुराख्याच्या रूपातील गणपतीला विष्णूची मूर्ती दिली विभीषण स्नानसंध्या करु लागले. गणपतीने याचा फायदा घेऊन मूर्ती खाली ठेवली. आपली मूर्तीची चुकीच्या ठिकाणी स्थापन झालेली पाहून बिभीषण चिडले त्या गुराख्याच्या मागे धावून लागले. गुराखी येथे जवळच असलेल्या या दगडावर जाऊन बसला. बिभीषण त्याच्यामागे पळत जाऊन त्यानी त्या गुराख्याच्या डोक्यात एक बुक्की मारलीत्यावेळेस गुराखी आपल्या मूळ स्वरूपात म्हणजेच गणपतीच्या स्वरूपात येऊन दर्शन दिले. बिभीषणांनी गणपतीची माफी मागितली. गणपतीने श्रीरंग स्वामींचे मंदिर कावेरी तटावरच असावे असे बिभीषणाला सांगितले. मंदिरात गणपतीचे दर्शन घेऊन आम्ही परत खोलीवर आलो.

तंजावर जवळच होते, पण मला तंजावरला दोन दिवस लागतील असे वाटले. म्हणून आधी कुंभकोणम बघण्यासाठी ११ नोव्हेंबरला निघालो. कुंभकोणमबद्द्ल पुढील लेखात.

No comments:

Post a Comment