Monday, November 26, 2018

तामिळनाडू २०१८ -भाग - ४

गाणारा समुद्र आणि नाचणारा शंकर

१२ नोव्हेंबरला कुंभकोणम सोडलं परत येण्यासाठी. तेथून मयलाधुराई (Mayiladuthurai)  म्हणून जवळच असणा-या गावात गेलो. तेथून तरंगबडीला (Tharangambadi) बस असतात अस कळलं. तरंगबडीची बस मयलाधुराईच्या दुस-या स्थानकावरुन सुटते. ते स्थानक जवळच होते. चालतच त्या बसस्थानकावर गेलो. तेथून कराईकलची बस पकडली. कराईकलला जाणारे दोन मार्ग आहेत. एक तरंगबडी मार्गे तर दुसरा नालादाई(Nalladai) मार्गे. आम्ही पहिला मार्ग निवडला.
तरंगबडीला डच वसाहत होती. १६२० ला डच येथे आले, त्यांनी मदुराईच्या नायकांबरोबर (बहुदा रघुनाथ) करार केला व येथे किल्ला बांधला. त्यावेळेस त्यासाठी रु. ३१११/वर्ष असा करार झाला. ही रक्कम त्याकाळी फारच मोठी होती. त्यामुळे डचांना ८ कि.मी लांबी  ४ कि.मी. रुंदीची जागा मिळाली. त्यांनी तेथे दन्सबोर्ग (Dansborg) नावाचा किल्ला बांधाला.


सोन्याच्या पट्टीवर झालेला करार

डचांचा अंदाज होता, हे क्षेत्र व्यापारासाठी, जहाज वाहतुकीसाठी उपयोगी पडेल. त्यानुसार त्याकाळात अनेक जहाजे, मिशनरी या भागात आले. त्यांची पूर्ण माहिती किल्ल्यात आजसुद्धा पहायला मिळते. खालील फोटोमध्ये त्याकाळात या किल्ल्यावर थांबलेल्या जहाजांची माहिती मिळते.




हा किल्ला पुर्णपणे डच पद्धतीमध्ये बांधला आहे. डचांनी येथे त्याकाळात छापखानापण सुरु केला होता. त्यात तामिळमध्ये बायबल छापले जायचे. हा भारतातील पहिला छापखाना आहे.  किल्ला व वस्तुसंग्रहालय छान आहे.  हळूहळू कोलकत्याचा वापर वाढल्याने हे फार मोठे बंदर म्हणून डचांना विकसित करता आले नाही.  १८४५ मध्ये हा किल्ला डचांनी इंग्रजांना विकला.


तरंगबडी म्हणजे जेथे लाटा गातात ते गाव. आणि खरोखरच येथील लाटा गाणं म्हणत आहेत असं वाटत. समुद्रकाठ फारच छान आहे. मस्तपैकी दोन चार तास बसण्याची (???) इच्छा होती.






पण गाणा-या समुद्रानंतर नाचणारा शंकर बोलवत असल्याने अर्धा तासातच परत निघावे लागले.
तेथून तडक (डायरेक्ट मराठीत) चिदंबरमची गाडी मिळाली. जेवण करुन साधारण १ः३० वाजले होते. १ ते ४ मंदिर बंद असणार म्हणुन जवळच असलेल्या पिचावरम या गावी जायचं ठरवले. पिचावर, समुद्रतटीय वनस्पतीच्या (Mangrove forest) जंगलासाठी प्रसिद्ध आहे. तामिळनाडू पर्यटन विभागाने येथे नावेची(boat) सोय ठेवली आहे. एक,दोन, चार तास अशी नाव आरक्षित करता येते. दोन तासाची नाव आरक्षित करणे फायद्याचे आहे. नावेत बसल्यावर नावाड्याला १०० रुपये देउन नाव जोरात चालवायला सांगा म्हणजे तुम्ही ख-या अर्थांनी समुद्रतटीय वनस्पतीचे जंगल बघू शकता. नाव त्या जंगलामधून जाते. हा चित्तथरारक अनुभव आहे. नेहमीप्रमाणे स्वसंरक्षणांची साधने [स्वसंरक्षक जाकीट (life-jackets)] अद्ययावत नाहीत. त्यामुळे येथे जरा जपूनच प्रवास केलेला बरा. पिचावरमला निरीक्षण मनोरा [यापेक्षा चांगला मराठी शब्द सुचतो आहे का?? वॉच टॉवर]  आहे. त्यावरुन जवळपासचा निसर्ग छान दिसतो. छायाचित्र काढण्यासाठी योग्य असे ठिकाण.






पिचावरमचा मनसोक्त आनंद घेतल्यावर चिंदबरमला परत आलो. वेळ साधारण ५, ५ः३० ची होती. येथील आरती बघायला मिळाली.
शंकराची नटराजाची मूर्ती बघायला मिळेल असं वाटले होतं. पण देवाला घातलेल्या असंख्य दागिन्यामुळे तो नटराज आहे हेच मला कळेना. जवळच उभ्या असलेल्या एका तरुण व्यक्तीला विचारलं "हेच मुख्य मंदिर का?” “हो” त्या व्यक्तीचं उत्तर. त्यांच्याशी बोलता बोलता त्यानं आपल नाव 'श्रीनिवास' सांगितले. श्रीनिवासने मला खुप माहिती दिली. जस की मुख्य मंदिरातील पुजारी स्फटिक लिंगाला अभिषेक घालतो आहे. कधी दूध, मध, दही तर कधी भस्म. श्रीनिवास माहिती सांगत होता. मी अतिशय लक्षपूर्वक ऐकत होतो. स्फटिक मूर्तीला अभिषेक झाला की जवळच असलेल्या विष्णूची आरती सुरु होईल. ती पूर्ण झाल्यावर नंतर थोड्या वेळाने नटराजाची आरती सुरु होईल. मग तो मला विष्णू मंदिरापुढे घेऊन गेला. आरती सुरु झाली, संपली. देवाला नैवेद्यपण झाला. जवळपास माझ्यासारखे सर्वजण विष्णू मंदिरातून नटराज मंदिराकडे फिरुन आरतीची वाट पाहू लागले. पण श्रीनिवास मात्र विष्णूसमोरच उभा होता. थोड्यावेळात विष्णू मंदिराचे दार उघडले, हा दर्शनपण घेऊन आला. तोपर्यंत नटराजाची आरती सुरु झाली नव्हती. श्रीनिवासने परत एकदा विष्णूला नमस्कार केला आणि मंदिराच्या बाहेर पण पडला. थोडंसं विचित्र वाटलं. एखाद्याची श्रद्धा फक्त आणि फक्त विष्णूवरच असू शकते हे समजुन घेण्याएवढा समंजसपणा माझ्यात आला होता. शैव व वैष्णव यांच्यातील वाद बहुतांशी संपला असला तरी असा कधी तरी दिसतो. असो.
 नटराजाची साग्रसंगीत आरती झाली.  शिवाची लिंगाच्या स्वरुपात अनेक मंदिरे आहेत. पण मूर्तीच्या स्वरुपात फारच कमी मंदिरे आहेत. नटराज हे त्यापैकी एक.  आधी सांगितल्याप्रमाणे स्फटिक लिंगाच्या स्वरुपात पण देवाची पुजा होते. ते स्फटिक लिंग आपल्याला सहसा बघायला मिळत नाही. आरतीची वेळ असल्यामुळे ते लिंग पाहण्याचे सौभाग्य आम्हाला मिळाले. आरतीमुळे मन अतिशय प्रसन्न झालं. पण तोपर्यत घड्याळात किती वाजले हे बघायचं राहून गेलं. आणि लक्षात आलं अरे, ७ वाजले. अजून आपल्याला कुभकोणमला परत जायचे आहे. मग बसस्थानकावरून आम्ही परत कुभकोणमला आलो. रात्रीचे १० वाजले होते. उपाहारगृह चालू होती. डोसा खाऊन झोपलो. उद्या आणि परवा आम्ही तंजावरला जाणार होतो. चोलाराजच सर्वात उत्तम मंदिर व मराठा दरबार बघायला. हे सर्व पुढच्या लेखात

No comments:

Post a Comment