Sunday, July 22, 2018

अभंगाची दिंडी - दिवस १८

संत ज्ञानेश्वर माऊली
खालील दोन ओळी ज्या प्रार्थनेतून (अभंग)  येतात मला वाटतं याशिवाय चांगली विश्वप्रार्थना होऊ शकत नाही. ही प्रार्थना ज्या दिवशी विश्वप्रार्थना होईल त्या दिवशी मराठी झेंडे खर्‍याअर्थाने अटकेपार फडकले असे म्हणता येईल.

चंद्रमे जे अलांछन। मार्तंड जे तापहीन ।
ते सर्वांही सदा सज्जन । सोयरे होतु ।।

वाक्यार्थ: कोणताही डाग नसलेले चंद्र व ताप नसलेले सूर्यासारखे असणारे सज्जनांचे सर्वांचे मित्र आहेत.
भावार्थ: माऊलीनी चंद्र व सूर्याच रूपक म्हणून उपयोगिल आहे. चंद्र म्हणजे कलाकार जो लांछन विरहित आहे. सूर्य म्हणजे नेता (राजकारणी, समाजकारणी, कार्यालयातील अधिकारी) हे तापहिन आहेत. म्हणजेच यांच्या जवळ जाताना अंग भाजत नाही. हे सज्जनाचे मित्र असतील तर ते राज्य आदर्श राज्य असेल.

राम कृष्ण हरी

Saturday, July 21, 2018

अभंगाची दिंडी - दिवस १७

संत बहेणाबाई
बहेणाबाई कुलकर्णी यांचे अभंगात आपल्याच मनाची परिस्थितीचे वर्णन केले आहे की काय असे वाटते. त्यांचे माया व ब्रह्म या विषयीचे अभंग अप्रतिम आहेत.
ज्यांना देवाविषयी विचारायला जातो त्याला अभिमान झाला आहे. ज्यांना माहीत आहे ते सांगत नाहीत. कोणी सांगत ध्यान करा तर कोणी उपासना तर कोणी मंत्र तर कोणी तिर्थाटन.

जेथे पुसो जावे तेथे अभिमान । आपुलेचि ज्ञान प्रतिष्ठी तो ॥१॥
जाणोनि अंतरी न सांगती कोणी । कोणाचे वचनी स्थिर राहो ॥२॥
लय हे लक्षण सांगती धारणा । नाना उपासना नाना मंत्र ॥३॥
एक ते संगती पंचमुद्रा जप । एंव खटाटोप आसनाचा ॥४॥
एक ते सांगती तीर्थे तपे व्रत । एक ते अनंत पूजाविधि ॥५॥
बहेणि म्हणे आता नव्हे स्थिर मन । जेथे तेथे गुण अविद्येचा ॥६॥

याच बहेणाबाई यातून सुटण्याचा मार्ग पण सांगतात.

माया हे सावेव किंवा निरावेव । न कळे याचे ठाव कोणेपरी ॥५॥
बहेणि म्हणे याचे कर्म कळावया । वोळंगावे पाया सद्गुरूच्या ॥६॥

सावेव— साकार
निरावेव -निराकार
ओळगणे: आश्रय घेणे

Friday, July 20, 2018

अभंगाची दिंडी - दिवस १६

संत कान्होपात्रा

कानोपात्रांचे फारच कमी अभंग प्रकाशित आहेत. पण जे आहेत ते सर्व आर्ततेने विठ्ठलाला मारलेली हाक आहे.
स्वःताला गरिबांचा कैवारी म्हणवून घेत असशील तर मग माझ्यावर होणारे अत्याचार हे तुझ्यावरच होत नाही का? सिंहाच्या तोंडांतील घास कोल्हा पळवून नेत असेल तर लाज सिंहाला वाटली पाहिजे?  माझा देहच मी तुला अर्पण करत आहे. स्वःताच्या नावासाठी तरी त्याचा संभाळ कर.

पतित पावन म्हणविसी आधी । तरी का उपाधी भक्तांमागे ।।१।।
तुझे म्हणविता दुजे अंगसंग । उणेपणा सांग कोणाकडे ।।२।।
सिंहाचें भातुकें जंबुकें पै नेतां । थोराचिया माथा लाज वाटे ।।३।।
म्हणे कान्होपात्रा देह समर्पणें। करावा जतन ब्रीदासाठी ।।४।।

अंगसंग: अत्याचार
भातुकें: घास, अन्न
जंबुकें: कोल्हा 

Thursday, July 19, 2018

अभंगाची दिंडी - दिवस १५


संत सावतामाळी महाराज
अतिशय साधी, सरळ व गेयता असलेल्या रचना करण्यासाठी सावता महाराज प्रसिद्ध आहेत. सर्वजण "आपला" दिवस शोधण्यात आयुष्य खर्ची घालतात तर संतासाठी "त्यांचा" दिवस कोणता हे महाराज खालील अभंगातून सांगतात.

समयासी सादर व्हावें । देव ठेविले तैसें रहावें ॥धृ०॥
कोणे दिवशीं बसून हत्तीवर । कोणे दिवशीं पालखी सुभेदार ।
कोणे दिवशीं पायांचा चाकर । चालून जावें ॥ १ ॥
कोणे दिवशीं बसून याचीं मन । कोणें दिवशीं घरांत नाहीं धान्य ।
कोणे दिवशीं द्रव्याचें सांठवण । कोठें साठवावें ॥ २ ॥
कोणे दिवशीं यम येती चालून । कोणे दिवशी प्राण जाती घेऊन ।
कोणे दिवशीं स्मशानीं जाऊन । एकटें रहावें ॥ ३ ॥
कोणे दिवशीं होईल सद्‌गुरूची कृपा । कोणे दिवशीं चुकती जन्माच्या खेपा ।
कोणें दिवशीं सावत्याच्या बापा । दर्शन द्यावें ॥ ४ ॥

Wednesday, July 18, 2018

अभंगाची दिंडी - दिवस १४

संत एकनाथ महाराज
महाराज सद्‍गुरुंची लक्षण सांगत आहेत. गुरू व सद्‍गुरु यामध्ये फरक आहे. ज्याला अभिमान झाला किंवा जो ज्ञान पैशासाठी विकतो किंवा लंपट आहे अशा व्यक्तीला सद्‍गुरु म्हणता येणार नाही. मग "सद्‍गुरु कोण?" हे महाराज खालील अभंगात सांगतात.

शिष्ये करावे माझे भजन । ऐसे वांछी जरी गुरुचे मन ।
तो गुरुत्वा मुकला जाण । अभिमाने पूर्ण नागवला ॥
जगी दाटुगा ज्ञानाभिमान । धनालागी विकती ज्ञान ।
ते जाण शिश्नोदरपरायण । तेथे अर्धक्षण ज्ञान न थारे ॥
मुख्यत्वे गुरुचे लक्षण । ज्ञान असोनि निरभिमान ।
सर्वांगी शांतीचे भूषण । तो सद्‍गुरु पूर्ण परब्रह्म ॥

दाटुगा— श्रेष्ठ; मोठा.
शिश्नोदरपरायण- लंपट 

Tuesday, July 17, 2018

अभंगाची दिंडी - दिवस १३

संत तुकाराम महाराज
महाराज पांडुरंगावर श्रद्धा कशी असावी यासाठी अतिशय समर्पक दुष्टांत देत आहेत. हंड्यावर हंडे ठेवलेली स्त्री भले आपल्या मैत्रिणीशी बोलत असेल पण तिचं लक्ष हंड्यावरच असत. गरीब जेवणाच्या निमंत्रणासाठी आसुसलेला असतो. सावकार दिवसरात्र येण्यार्‍या व्याजाचा विचार आणि हिशोब करत असतो. तसंच मी या संसारात असलो तरी तुझ्या निमंत्रणाची वाट दिवसरात्र पाहत आहे. ते निमंत्रण म्हणजे, 'तुझ्याच चरणी ध्यान लागण्याचं आहे.'

दुडीवरी दुडी । चाले मोकळी गुजरी ॥१॥
ध्यान लागो ऐसें हरी । तुझे चरणीं तैशापरी ॥ध्रु.॥
आवंतण्याची आस । जैसी लागे दुर्बळासी ॥२॥
लोभ्या कळांतराची आस । बोटें मोजी दिवस मास ॥३॥
तुका म्हणे पंढरीनाथा । मजला आणिक नको व्यथा ॥४॥

आवंतण: आमंत्रण; बोलावणें
कळांतर: व्याज

Monday, July 16, 2018

अभंगाची दिंडी - दिवस १२


संत ज्ञानेश्वर माऊली

जैशी स्वप्ना स्वप्नीं महिमा । तमीं मानू असे तमा । तेंवि अज्ञाना गरिमा । अज्ञानींचि ॥३॥
कोल्हेरीचे  असिवारु । न येती धारकीं धरुं । नये लेणां शृंगारु । वोडंबरीचा ॥४॥
हे जाणणेयाच्या घरीं । खोंचिलेंही आन न करी । काई चांदिणां उठे लहरी । मृगजळाची ॥५॥
आणि ज्ञानहि जें म्हणिजे । तें अज्ञानचि पां दुजें । एक लपऊनी दाविजे । एक नव्हे ॥६॥
अमृतानुभव
आत्मज्ञानाचे महत्त्व सांगताना माऊली म्हणतात.
स्वप्नाचे महत्त्व स्वप्नातच, आणि अंधाराचे महत्त्व अंधारातच त्याचप्रमाणे अज्ञानाची थोरवी अज्ञानातच. मातीचे घोडे रणांगणावर नेता येत नाही. मंत्राने केलेले (खोटे)  दागिने घालून मिरवता येत नाही. त्याचप्रमाणे अज्ञानाला ज्ञान म्हणून मिरवता येत नाही. चांदण्यांमुळे (चंद्रामुळे) मृगजळाला लाटा निर्माण होतात का? ही सर्व उदाहरणे देण्यासाठी उच्चकोटीची बुद्धिमत्ता लागते (आधी मृगजळ त्यात लाटा) पण माऊली त्याहूनही एक वाक्य सांगून स्वःताची अलौकिक बुद्धिमत्ता दाखवून देतात.
ज्याला आपण ज्ञान म्हणतो ते पण एक अज्ञानच आहे. ज्ञान आणि अज्ञान या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत.

कोल्हेरी: कृत्रिम मातीची चित्रे
असिवार: घोडेस्वार
धारकी धरणें- मोठ्या संकटांत, पेचांत आणणे
वोडंबरी: गारुडविद्या; जादूगिरी