Saturday, February 13, 2016

छद्मविरोधाची सहल : कोस्टल कर्नाटक

द्वैतवाद व अद्वैतवाद हे  वेदान्त (वेदाचे सार) चे दोन प्रमुख विचार आहेत. परस्पर विरोधी मत असणारे हे विचार. अद्वैतवादात सर्वजण एकच आहेत, तर द्वैतवादात भेद असणे हेच महत्वाचे आहे. दोन विरोधी मते, पण दोन्ही मतप्रवाहात मोक्षस्थिती मिळाल्याची अनेक उदाहरणे आहेत. हे छद्मविरोधाचे पहिले उदाहरण.
छद्मविरोधाचे दुसरे उदाहरण म्हणजे हिंदू धर्मातील अनेक पंथ जसे, शैव- जे फक्त शंकरालाच सर्वश्रेष्ठ मानतात, वैष्णव- जे फक्त विष्णूलाच परमेश्वर मानतात, शाक्त- जे देवीलाच मानतात व शेवटी गाणपत्य- जे गणपतीलाच सर्वश्रेष्ठ मानतात या पंथांमध्ये असणारे पुरातन काळापासूनचे वाद सर्वश्रुत आहेतच.
छद्मविरोधाचे तिसरे उदाहरण हे थोडे आधुनिक व सामाजिक आहे, ते म्हणजे महाराष्ट्र व कर्नाटक सीमावाद. सीमेलगतची अनेक गावे आजही या वादात होरपळून निघत आहेत.
आता तुम्ही म्हणाल या वादाचां आणि 'कोस्टल कर्नाटक' या सहलीचा काय संबंध?
       २७ जानेवारी २०१६ रोजी आमची सहल सुरू झाली. संकष्टी असल्यामुळे बराच जणाचा उपवास होता. त्यामुळे रात्री रेल्वेतच आरती करून उपवास सोडला. २०१३ पर्यंत भारतातील सर्वांत मोठा बोगदा (करबुडे ६.५ किमी ) व आताचा दोन नंबरचा बोगदा रात्रीच येऊन गेला. सकाळी गोव्यापासुन सृष्टी सौंदर्य बघत सकाळी १० वाजता उडप्पीला पोहचलो. मठापासुन जवळच लॉज होता. सर्वजण आवरुन कृष्णमठाचे दर्शन घेण्यासाठी निघालो.
कनकदासासाठी मंदिर फिरले अशी आख्यायिका येथे प्रसिद्ध आहे. त्याच कनकदासाच्या खिडकीतून पहिल्यांदा दर्शन घेऊन मंदिरात गेलो. मंदिरातील वातावरण अतिशय थंड व प्रसन्न होते. मध्वाचार्ययांनी कृष्णमठाची स्थापना १३व्या शतकात केली. ते द्वैतवादचे समर्थक होते.
कृष्णमठाच्या भोवती  पेजावरा, पुट्टिगे, पलिमारु, अडामारु, सोढे, कनियूरु, शिरुर व कृष्णापुरा असे आठ मठ आहेत.  दर दोन वर्षातून कृष्णाची सेवा करण्याची संधी पुढील मठाला मिळते. या विधीला 'पर्याय' असे म्हटले जाते. हा पर्याय दर दोन वर्षांनी होत असतो. आमचा योग असा की या वर्षी हा 'पर्याय' या संक्रांतीला होता. हा पर्याय यांच वर्षी संक्रांतीला बदला होता. त्यामुळे अजुन  सुध्दा अनेक कार्यक्रम चालू होते. आमच्या सर्वांच्या नशिबाने त्या संध्याकाळी मोठ्यारथाची प्रदक्षिणा होणार होती. म्हणून आम्ही थोडी विश्रांती घेऊन साधारणपणे ६:३० वाजता मंदिरात परत आलो.
रथ उत्सवाच्या आधी आंतरराष्ट्रीय कृष्णभावनामृत संघ (इस्कॉन), 'हरे कृष्ण हरे कृष्ण, कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम हरे राम राम राम हरे हरे' या मुलमंत्रावर  भजन करत नृत्याचा आनंद घेत होते. आम्हापैकी ब-याच लोकांनी यात उत्स्फूर्तपणे भाग घेतला. सर्वांनीच या नृत्याचा मनसोक्त आनंद लुटला. ज्याप्रमाणे भक्तीला वयाचं बंधन नसत त्या प्रमाणे त्याला देशाचंसुध्दा बंधन नसत. त्या नृत्यात आम्हाबरोबर अनेक परदेशी पाहूणेपण सहभागी झाले होते.
साधारणपणे ८ वाजता रथाने प्रदक्षिणा घालण्यास सुरुवात केली. खरोखर ते दृश्य नयनरम्य होते. रथाच्या पुढे जय विजययांच्या मोठ्या प्रतिमा चालत होत्या. हा सोहळा आम्हाला मिळालेला अनपेक्षित असा बोनस होता. त्यानंतर रात्रीचे जेवण करून आम्ही परत निवासस्थानी आलो.
दुस-या दिवशी (२८ जानेवारी २०१६) रोजी सकाळी दारापुढे एक छानशी ५० सिटर गाडी उभी होती. हिच गाडी आम्हाला पुढील ३-४ दिवसाची सोबत करणार होती.  द्वैतवादचं समर्थन करणार उडप्पी आम्ही सकाळी सात वाजता सोडल. वाटेत नाष्टाकरुन आम्ही मुरुडेश्वरला आलो. कन्दुका टेकडीवरील हे मंदिर तीन बाजूने अरबी समुद्राने वेढलेले आहे. मंदिरासमोरील गोपुर २४९ फुट उंचीचे आहे. हे जगातील सर्वात मोठे गोपुर आहे.  तसेच मंदिराच्या मागील बाजूची शंकराची मुर्ती १२३ फुट उंचीची असून ती जगातील दोन नंबरची उंच शिव मुर्ती आहे. आत्मलिंगातील काही भागापासुन या शंकराची स्थापना झाली आहे. मंदिराच्या बाहेर आम्ही सर्वानी एक एकत्र (ग्रुप) फोटो काढला.

   मुरुडेश्वरवरून आम्ही गोकर्णला जायला निघालो. साधारण ४-५ वाजता गोकर्णाला पोहचलो. निवासाची सोय मंदिरासमोर असल्याने  व त्या ठिकाणी गाडी जात नसल्याने सर्व सामान टेम्पोत टाकुन आम्ही रिक्षेतुन निवासस्थानी पोहोचलो. गुरुजींनी गोकर्णबद्दल माहिती सांगितली, ती ऐकून आम्ही समुद्रस्नानासाठी गेलो. समुद्रस्नानाची मज्जा काही औरच! त्यानंतर गुरुजींनी, संकल्पासहित अथर्वशीर्ष व रुद्राचे आवर्तन करून यथासांग पद्धतीने अभिषेक केला.आम्ही सर्वजण दर्शनासाठी निघालो. प्रथम गणपतीचे व नंतर  महाबलेश्वर म्हणजेच शंकराच्या आत्मलिंगाचे दर्शन घेतले. आत्मलिंगाची स्थापना करण्यात विष्णूचा फारमोठा हातभार होता. आत्मलिंग जमिनीत असुन त्यांचा काहीभाग हाताला लागतो. आत्मलिंगाच्या बाजूने शाळिग्राम आहे. हे विष्णूचे प्रतीक आहे. त्यानंतर आम्ही पार्वतीचे दर्शन घेतले. छद्मविरोधाच्या दुस-या उदाहरणातील सर्व पंथ (शैव, वैष्णव, शाक्त व गाणपत्य) येथे गुणागोविंदाने नांदताना दिसतात.त्यामुळे पंथातील विरोध हा वरवरचा, आभासी आहे हे जाणवते. मुक्कामाच्या शेजारीच जेवणाची सोय केली होती, महाराष्ट्रीयनपद्धतीचे जेवण अतिशय रुचकर होते.
 तिसरे दिवशी( २९ जानेवारी २०१६) रोजी सकाळी लवकरच गोकर्ण सोडायचे ठरवले होते. सकाळी ५:३० वाजता आम्ही शिरसीकडे जाण्यास सुरुवात केली. शिरसीत मरीकांम्बा(रेणूका) मातेचे दर्शन घेतले. मंदिर अतिशय भव्य होते. समोरच असलेल्या हॉटेलमध्ये नाष्टा केला. नाष्टयातील वडे अतिशय चवदार होते.
शिरसीवरून आम्ही वरदपुरला निघालो. श्रीधरस्वामी महाराष्ट्रातील, पण समाधी मात्र कर्नाटकात आहे. कर्नाटकातून महाराष्ट्रात आलेली अनेक उदाहरणे आहेत जसे भारतरत्न पं. भिमसेन जोशी, सर्व शेट्टी, अनेक इतरही. पण महाराष्ट्रातून कर्नाटकात गेलेली फारच कमी उदाहरणे आहेत, श्रीधरस्वामी हे त्यांतील एक. छद्मविरोधाच्या तिसरे उदाहरण हे आभासी आहे असंच दाखवणारे श्रीधरस्वामीचे कार्य.

 श्रीधरस्वामींची समाधी अतिशय नयनरम्य परिसरात आहे. समाधीपर्यंत जाण्यासाठी २०० ते २५० पाय-या आहेत. समाधीपाशीच आम्ही दोन, तीन भजने म्हणून प्रसादासाठी परत खाली उतरलो व  श्रृंगेरीसाठी प्रयाण केले.
श्रृंगेरीत राहण्याची व्यवस्था ही इतर निवासाच्या व्यवस्थेसारखीच मंदिराजवळ होती. चहा घेऊन लगेच दर्शनासाठी आम्ही बाहेर पडलो. आमच्या सुदैवाने त्यावेळी आरतीची वेळ झाली होती. एकंदर प्रशस्त व प्रसन्न परिसराने आमचे मन मोहून टाकले.
अद्वैतवादाचा पुरस्कार व प्रचार करणा-या शंकराचार्यांनी स्थापन केलेला हाच तो पहिला शारदामठ. छद्मविरोधाच्या पहिल्या उदाहरणातील द्वैतवाद व अद्वैतवाद या दोघांचे दर्शन घेण्याची संधी आम्हाला मिळाली होती. शारदापीठ व आदिशंकराचार्यांची समाधी बघितली. काही मंडळी सध्याच्या शंकराचार्यांचे दर्शन घेण्यासाठी गेली. शंकराचार्यांचे दर्शन व प्रसाद घेऊन सर्वजण निवांत झोपली.
           सकाळी उठून गरम उसळत्या पाण्याने आंघोळकरुन सर्वजण होनारेडूच्या अन्नपुर्णचे दर्शन घेण्यासाठी निघालो. जाताना चहा, कॉफीच्या बागा व निसर्गसौंदर्य बघत आम्ही आठ वाजता अन्नपुर्णेच्या मंदिरात पोहचलो. देवीची मुर्ती अतिशय सुबक असून निवांत दर्शन घेता आले. तिथेच नाष्टाकरून आम्ही धर्मस्थळकडे जाण्यासाठी ११:३० वाजता निघालो. २:३० दर्शन बंद होते, व जाण्यासाठी साधारण ३ ते ४ तास लागतात. कारण वाटेत कुद्रेमुखचे जंगल आहे. धर्मस्थळच्या मंजूनाथाचे दर्शन कसे होईल यांची चिंता सर्वानाच लागून राहिली होती. आम्ही २:३० वाजता मंदिराजवळ पोहचलो व लगेच दर्शनाच्या रांगेला लागलो. रविवार असल्याने २:३० ला बंद होणारे दर्शन ३:३० ला झाले त्यामुळे आम्हाला दर्शन घेता आले ही मंजूनाथाचीच कृपा. दर्शनाची रांग बरीच मोठी होती पण रांग पुढे पुढे सरकत असल्याने त्रास जाणवला नाही. मंजूनाथाचे दर्शन घेऊन ३:४५ ला बाहेर आलो व लगेच प्रसाद घेऊन सुब्रमण्याच्या दर्शनासाठी निघालो.
         सुब्रमण्याचे मंदिर सर्प व नाग दोष काढण्यासाठी संपुर्ण दक्षिण भारतात प्रसिद्ध आहे. पुन्हा एकदा आमच्या सुदैवाने इथे रात्रीचा पालखीचा सोहळा आम्हाला बघायला मिळाला. या पालखीपुढे हत्तीने केलेले नृत्य बघून आम्ही विस्मयचकित झालो. सुब्रमण्याचे दर्शन घेऊन आम्ही वाटेत जेवणकरून हसनला मुक्कामाला गेलो.
सकाळी लवकर उठून जवळ असलेल्या तिपतूर या स्टेशनवरुन चालुक्य एक्सप्रेस गाडी पकडली. ग़ाडी पकडताना आमची थोडी त्रेधात्रिपीट उडाली पण सर्वजण व्यवस्थित गाडीत बसले. गाडीत नेहमीप्रमाणे भेंड्या खेळायला सुरवात केली. राष्ट्रीयस्तरावरील फुटबॉल विजेता महाराष्ट्राचा संघ याच गाडीतून प्रवास करत होता. त्या संघातील खेळाडू व शिक्षक आमच्या बरोबर भेंडयांमध्ये सामील झाले. रात्रीच्या मुक्कामाची सोय सांगलीत केली होती. महाराष्ट्रीयन पद्धतीचे जेवण करुन समाधान झाले.
सकाळी कोयना एक्सप्रेसने लोणंदला उतरुन भाकरी, ठेचा, कांदा, पिठलं असं मराठमोळ जेवण करून आपापल्या घरी गेलो.
द्वैतवाद व अद्वैतवादासाठी उडप्पी व श्रृंगेरी, विविध पंथांसाठी गोकर्ण व मराठी कन्नड वादासाठी श्रीधरस्वामी, या सर्व ठिकाणांची साखळी या सहलीत गुंफली गेली असल्यामुळे बाह्यरंगी एकमेकांच्या विरोधी वाटणारी मते ही अंतरंगातून एकच आहेत असा संदेश मिळाला. मला वाटत हिच या यात्रेची सफलता असल्यामुळे ही यात्रा आमच्या चिरस्मरणात राहील. जसं श्री. अरूण जोशी आपल्या निरोपाच्या कवितेत म्हणतात तस,
विसरून जा मला, पण यात्रेस याद ठेवा

दिधला असे तुम्हाला, अनमोल हाच ठेवा

No comments:

Post a Comment