सकाळी पाच किंवा त्याआधीच एक विशिष्ट आवाज सारखा येऊ लागला. माझ्यासाठी असा आवाज म्हणजे मोबाईलचा गजर असण्याची शक्यता जास्त असते. डोळे उघडून नीट बघितल्यावर लक्षात आलं, हा आवाज मोबाईलचा नसून, एका पक्ष्याचा आहे. एक सारखा सतत येणारा आवाज. सकाळची याहून सुंदर सुरुवात काय असू शकेल?
ट्रेक करता येणार नसल्यामुळे, आम्ही परत डलहौसीच्या बाजूने, मनात योजलेली ठिकाणे बघण्याचे ठरवले. काही नियम हे मोडण्यासाठीच केले जातात, जसे की आपण स्वतः कुठलीही छोटी गाडी भाड्याने घ्यायची नाही, महामंडळ झिंदाबाद. पण डलहौसीच्या जवळची ठिकाणं बसने बघणं शक्य नव्हतं. म्हणून गाडी भाड्याने घेऊन जवळची ठिकाणे बघण्याचे ठरवले. कारमधून आमचा प्रवास सुरु झाला.


त्यानंतर तो आम्हाला 'कालाटॉप' या अभयारण्यात घेऊन गेला. या अभयारण्याचे क्षेत्रफळ साधारण तीस किलोमीटर वर्ग आहे. मला वैयक्तिक फार काही विशेष वाटलं नाही पण हा ज्याचा त्याचा बघण्याचा दृष्टिकोन. फार वेळ न दवडता आम्ही तिथूनच खजार येथे गेलो. या भागाला मिनी स्वित्झर्लंड असेही म्हणतात. खरोखरच येथे असणारे मैदान त्यावरची हिरवळ, भोवतालची दाट झाडी. यामुळे हे दृश्य हे परदेशातील दृश्याच्या तोडीचेच वाटत होते. गवतावर लोळणे आणि गवतावर बसणे यासारखा आनंद, कितीही मऊ खुर्चीवर बसून आजपर्यंत मला मिळालेला नाही. येथे एक प्राचीन नागमंदिर आहे. सहसा नाग मंदिरे फारशी आढळत नाहीत. नाग मंदिर व मधोमध असणारे तळे स्थानिक लोकांसाठी श्रद्धेचा विषय आहे.
खजार बघून आम्ही परत डलहौसीला व तेथून बनीखेतला आलो. त्यावेळेस सहा वाजले होते. कालचीच गाडी आज आम्हाला परत मिळेल अशी आमची अपेक्षा होती. पण तिथे गेल्यावर लक्षात आलं की ती खाजगी (प्रायव्हेट) गाडी होती. आज निवडणूक असल्यामुळे, ती गाडी येणार नाही. आता येथून कुठली गाडी आहे? गाडी आहे का नाही? असा प्रश्न मला पडला. पण इथल्या लोकांनी सांगितलं 'सात वाजता अजून एक बस आहे.' आणि नसली तर इथे एखाद्या हॉटेलमध्ये रहायचे असं ठरवले. पण एक तास वाट बघितल्यानंतर, सात वाजता आम्हाला शिमल्याला जाणारी गाडी मिळाली. नऊ सव्वानऊपर्यंत आम्ही चुवाडीला पोहोचलो. अंशुमन आमच्या सर्वांची वाट बघत स्टँडवर उभे होतेच. परत एकदा मस्तपैकी घरगुती जेवणाचा आनंद घेऊन आम्ही झोपी गेलो.
दुसऱ्या दिवशी आम्ही तिथून धर्मशाळेला जाणार होतो. त्यामुळे सकाळी दहा अकरा वाजता निघायचं असा बेत ठरला होता. पहाटे चार, पाच वाजता परत त्या पक्ष्याने आपला गजर सुरू केला. यावेळेस तो कुठे आहे? कसा आहे? हे बघण्यासाठी मी पलंगावरून उठलो आणि बाहेर येऊन पाहू लागलो. त्या पक्षाचा येणाऱ्या एकसारखा आवाज.
मनात अनेक विचारांना जाग करत होता. असं म्हणतात “ज्ञानाने शब्द समजतात पण अनुभवांनी अर्थ” याआधी 'कुणी जाल का सांगाल का' ही कविता/गीत शेकडो वेळा ऐकले होते. पण त्या कवितेचा अर्थ, आजच्या अनुभवामुळे अधिकच खोल झाला.
कुणि जाल का, सांगाल का, सुचवाल का ह्या कोकिळा?
रात्री तरी गाऊ नको, खुलवू नको अपुला गळा
एका विचारातून दुसऱ्या विचारतात मन सहज प्रवेश करत. या गाण्याबद्दल असं म्हणतात की कवी अनिल एकदा कुमारजींच्या घरी राहायला होते. रात्री मुकुलजींनी स्वान्तसुखाय गाणं सुरू केले. शेजारच्या खोलीत झोपलेले अनिल पटकन लिहून गेले “कुणि जाल का, सांगाल का, सुचवाल का ह्या कोकिळा?”. मन या आवाजावरून, कविता आणि तेथून मुकुलजींच गाणं असा प्रवास करत होतं. मुकुलजींचे सकाळचे राग ऐकण्याची इच्छा झाली. लगेच तसे राग लावले. जगभर फिरण्यार्या मनाला शांतता लाभली. सकाळची सुरुवात अतिशय सुंदर झाली. अतिशय शांत वातावरण, सकाळचे राग, मुकुलजींचा आवाज, हातात चहाचा कप, अद्भुत निसर्ग. अजून काय पाहिजे? मला सांगा, 'सुख म्हणजे नक्की काय असतं?' असो.
सकाळी अंघोळ करून आम्ही धर्मशाळेला जाण्यासाठी निघालो. जाताना परत नूरपूर लागलं. धर्मशाळा हे पायथ्याशी असलेल्या गाव. डोंगरमथ्याच्या गावाचे नाव मैक्लोडगंज. धर्मशाळेवरून गाडीने मैक्लोडगंजला गेलो. इथ राहण्याची सोय हॉटेलात असली तरी ते घरगुती पद्धतीचे होते. सामान टाकून दुपारचं जेवण थोडं उशिराच केलं.

रस्त्यावरून जाताना दिसणारे निसर्गसौंदर्य अवर्णनीय होते. संध्याकाळी घरच्यांना खरेदी करायची होती. मी मात्र जवळच असलेल्या एका कट्ट्यावर निवांत बसलो. जवळ बसलेल्या बुद्ध भिक्खुंबरोबर संवाद सुरू केला. ते कर्नाटकातून आले होते. गप्पांच्या नादात वेळ कसा गेला हे कळलंच नाही.
जेवण करून झोपण्यासाठी गेलो. सकाळची झालेली संगीतमय सुरुवात, संगीतानेच शेवट करावी असं वाटतं होते. गुलामअलीची 'दोस्त बनकर भी नहीं', मेहंदी हसनयांची 'बात करनी मुझे मुश्किल कभी' गजल ऐकून संगीतमय दिवसाचा शेवट केला..
No comments:
Post a Comment