Saturday, November 24, 2018

तामिळनाडू २०१८ -भाग - ३

प्रलयानंतर प्रथम जीवसृष्टी निर्माण झालेलं शहर म्हणजे कुंभकोणम.

११ नोव्हेंबरला सकाळी आम्ही श्रीरंगम् सोडले व कुंभकोणमला दुपारी बारा वाजता पोहचलो. जेवण करून मंदिर बघण्यासाठी तयार झालो. तोपर्यंत तेथील लोकांनी सांगितले की तमिळनाडूतील सर्व मंदिरे ही एक ते चार बंद असतात. पुण्यातील एक  दुकान दुपारी बंद असते तर काय विनोद होतात! येथे तर मंदिरे बंद असतात म्हणजे किती विनोद तामिळभाषेत होत  असतील?
 दुपारची थोडी विश्रांती घेऊन साधारण दोन-अडीचला, आम्ही दारासुरमला (दरशुराम, Darasuram) निघालो. दारासुरम कुंभकोणम पासून  चार, पाच किलोमीटरवर वसलेले गाव. येथील चोला राजांनी बांधलेले ऐरावतेश्वर हे मंदिर प्रसिद्ध. चोला राजाची सध्या तीन मंदिरे उपलब्ध आहे. त्यातील दोन मंदिरे आम्ही या प्रवासात पाहणार होतो. त्यापैकी हे पहिलं. रंगनाथस्वामीच्या मंदिराला मी चोला राजाचे मंदिर मानत नाही. ते मंदिर चोला राजांनी बांधायला सुरुवात केली पण पुढे अनेक वेगवेगळ्या राजवटींनी त्यावर आपला ठसा उमठवला आहे.
पण ऐरावतेश्वर हे चोलाराजाचेच मंदिर आहे.
 चोला राजाच्या मंदिर बांधण्याची काही  वैशिष्ट्ये आहेत. त्यामध्ये
१. गोपूराची उंची कळसापेक्षा लहान
२. कळसावर केलेले सुंदर नक्षीकाम
३. देवाचे वाहन देवापासून बऱ्याच अंतरावर 
४. उपदेवासाठी स्वतंत्र मंदिर
सदर वैशिष्ठे पाठ करा, परीक्षेला प्रश्न येणार आहे.  ही सर्व वैशिष्ट्ये याही मंदिरात दिसून येतात.

पौराणिक माहिती
ऐरावत हा इंद्राचा पांढरा हत्ती. दुर्वास मुनींच्या शापामुळे तो काळा पडला. शंकरांच्या सांगण्यावरून हत्तीने जवळच असलेल्या तळ्यावर स्नान केले व तो पूर्वीसारखा पांढरा झाला म्हणूनच या शंकराला ऐरावतेश्वर असे म्हटले जाते. तसेच यमाच्या ही अंगाचा दाह होऊ लागला. त्याने शंकराची प्रार्थना केली व शंकरांनी त्याला येथील याच तळ्यात स्नान करण्यास सांगितले व तसे केल्यावर त्याचा दाह कमी झाला. बायको/नव-यांच्या दाहापासून मुक्ती मिळण्यासाठी कुठे स्नान करावे? असा प्रश्न सुज्ञ वाचकांसारखा मलापण पडला होता.

ऐतिहासिक माहिती
मंदिराचे बांधकाम  चोला राजा “राजाराजा” दोन याच्या काळात झाले असावे. चोला मंदिराच्या पद्धतीनुसार नंदी मंदिरापासून बराच दूर आहे.  नंदीच्या मागे सात पायऱ्या आहेत. या पायऱ्यांना संगीत पायऱ्या असे म्हटले जाते. पायऱ्यांवर विशिष्ट पद्धतीने दगडाचा आघात केलास, ‘सा,रे,ग,म,प,ध,नि,सा’ असा आवाज उत्पन्न होतो. सदर पायऱ्यांना संरक्षक जाळी  ( मराठीत कंपाउंड)असल्यामुळे यातून येणारा आवाज ऐकू शकलो नाही.


 मंदिरात प्रवेश केल्या केल्या भिंतीवर दोन मूर्ती आहेत. या द्वारपाल असण्याचा अनेक लोकांचा गैरसमज होऊ शकतो. पण त्या आहेत स्कंद व पद्म निधी. या दोन्हीही समुद्र व गोड्या पाण्याचा जलाशय यांचे रक्षण करणा-या देवता आहेत. चोला राजासाठी पाणी हे अत्यंत महत्वाचे होते. चोला राजाचे राज्य अनेक देशांत होते. जसे की इंडोनेशिया, जावा, सुमात्रा.  त्यामुळे  स्कंद व पद्म निधीला महत्वाचे स्थान आहे.  त्यावेळी समुद्र ओलांडून जायला बंदीपण नव्हती.


त्याच्यापुढे ‘अर्धनारीनटेश्वराची’ मूर्ती आहे.
सभामंडप रथाच्या आकाराप्रमाणे बनवला असून घोडे ओढत आहे अशी उपमा कलाकारांनी दगडातून दाखवली आहे.
हे घोडे व रथांची चाके सहा वेगवेगळ्या दगडांपासून बनवलेली आहेत. सर्वसाधारणपणे एकाच दगडातून बनवायची पद्धत त्याकाळी रुढ होती. आणि अशाच पद्धतीची मूर्ती कोणार्क मध्येही आहे.


आतील खांबांवर वेगवेगळ्या प्रसंगांची चित्रे आहे जसं की मदन दहन  किंवा शिवाचे लग्न, गणपतीचे लग्न. मंदिराच्या पाठीमागे लिंगोद्भव  देवाची मूर्ती आहे. यांची कथा पण फारच सुंदर आहे. पण ती पुन्हा कधीतरी.

दृष्टिभ्रम करणाऱ्या अनेक मूर्ती या मंदिरात आहेत जसे की हत्ती आणि बैल (बदामीला ही हेच शिल्प आहे), एकच डोके, दोन हात व  सहा पाय असलेली मूर्ती, मृदुंग वाजवणारे तीन लोक पण पाय मात्र चार या व अशा अनेक दृष्टीभ्रम करणाऱ्या मूर्ती मंदिरात आहेत. 
हत्तीच्या धडावर हात ठेवून फोटो बघा व नंतर बैलाच्या धडावर हात ठेवून बघा





कैलास पर्वत हलवणा-या रावणाचीही मूर्ती या मंदिरात आहे. पण वेरूळच्या येथील असलेली गुणवत्ता व सुबकता या मूर्तीमध्ये दिसत नाही.
ऐरावतेश्वराचे दर्शन घेऊन आम्ही कुंभकोणम बघण्यासाठी कुंभकोणम मध्ये परत आलो. येथे अनेक मंदिरे आहेत. हे मंदिरांचे शहर म्हणूनच ओळखले जाते.  येथे शंकरांची १२  मंदिरे आहेत. विष्षूची ५ मंदिरे आहेत.
या सर्वात महत्त्वाचे मंदिर म्हणजे  ‘आदी  कुंभेश्वर’. प्रलय होण्याच्या आधी ब्रह्मदेवाने वेगवेगळ्या जातीचे प्राणी एका कुंभात भरून ठेवले होते व त्याच बरोबर अमृतही ठेवले होते.  हा कुंभ त्यांनी कैलास पर्वतावर ठेवला होता. प्रलयामुळे तो कुंभ कैलास पर्वतावरून खाली आला आणि तो तसाच समुद्राला जातो की काय असे सर्व देवांना वाटले. शंकराने भिल्लाच्या रूपात या  कुंभांचा कोन फोडून जीवसृष्टी परत एकदा निर्माण केली.  तेच हे ठिकाण -कुंभकोणम.  या ठिकाणी असलेले शंकराचे लिंग हे शंकरांनी स्वतः स्थापन केलेले आहे. त्यामुळे त्याला विषेश महत्व आहे. मंदिरात पोहोचेपर्यंत ६ वाजले होते. यावेळेस आम्हाला येथील आरती बघायला मिळाली.  ही आरती अतिशय नयनरम्य होती. त्यानंतर शेजारील मंत्राबिंका (मंगला अंबिका?) ची पण आरती झाली. हे मंदिर साधारण ७व्या शतकांतील असावे. हे जरी चोला राजांनी बांधलेले असले तरी यांची देखरेख मदुराईच्या नायकांनी केली होती.
तेथूनच जवळ असण्या-या  ‘शारंगपाणी’या विष्णूच्या मंदिरात गेलो. मंदिर अतिशय छान आहे. परत खोलीवर आलो.

दुस-या दिवशी पाहिलेले, नटराज (चिंदबरम) व तरंगबडी हे नंतरच्या भागात…

No comments:

Post a Comment